कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, २० जानेवारी, २०२४

कॉर्न मिसळ

 कॉर्न उसळ( मिसळ) ब्रेड:



नमस्कार मंडळी😊

काय काल दिवसभर गोड खाऊन, गोड बोलून कंटाळा आला असेल ना?

आज झटपट मिसळ घेऊन आलेय.

कधीतरी पोळी भाजी नको वाटते पण झणझणीत मिसळ करावी तर कडधान्य भिजलेलं नसतं. अशावेळी ही कॉर्न मिसळ करून बघा.


साहित्य: पाव किलो किंवा एक कप मक्याचे दाणे( फ्रोजन पण मिळतात.), चार कांदे, १५/२० लसूण पाकळ्या, एक वाटी सुकं खोबरं, एक टेबलस्पून तीळ, एक टेबलस्पून खसखस,  एक टीस्पून धने, अर्धा टीस्पून जिरं, दोन तुकडे दालचिनी, पाच सहा लवंगा, २०/२५ मिरी दाणे, तीन हिरवी वेलची, लाल तिखट  एक टीस्पून, काश्मिरी लाल तिखट एक टीस्पून, मीठ, तेल

वरून घ्यायला कांदा, कोथिंबीर, लिंबू, शेव किंवा फरसाण


कृती: कांदे उभे लांब चिरा, सुकं खोबरं किसून घ्या. कॉर्न कुकरमध्ये दहा मिनिटं वाफवा. तीळ, खसखस, खोबरं सगळं वेगवेगळं भाजून घ्या. 

कढईत तेल घेऊन त्यात सगळा खडा मसाला परतून त्यावर कांदा, लसूण घालून परतून घ्या. कांदा, खोबरं, तीळ, खसखस खडे मसाले सगळं गुळगुळीत वाटून घ्या.

एक लीटर पाणी गरम करायला ठेवा.

आता मोठ्या कढईत तर्री साठी तेल तापवा. गॅस मंद करून त्यात काश्मिरी आणि साधं लाल तिखट घाला. लगेच उकळलेले पाणी घाला. आता सगळं वाटप घाला. मीठ आणि लागेल तसं पाणी घाला. 

आता आपले वाफवलेले कॉर्न अर्धे तसेच घाला आणि अर्धे मिक्सरमध्ये अर्धे बोबडे फिरवून कटात घाला. उकळी येऊ द्या. चव बघा लागलं तर तिखट, मीठ वाढवा. झणझणीत झाला पाहिजे.


घेताना मिसळीप्रमाणे फरसाण, कांदा, कोथिंबीर त्यावर कट आणि लिंबू.. अहाहा!! 

बरोबर ब्रेड किंवा पाव काहीही घ्या.


टीप: काही झटपट वगैरे होत नाही🫣 सगळी झटापट करायला तासभर तरी लागतोच.😃😃

हल्ली साधे कॉर्न मिळत नाहीत पण स्वीट कॉर्न असेल तरीही कटात गेल्यावर अजिबात गोड वगैरे लागत नाही. बऱ्याच जणांना हीच शंका येते.

तिखटपणा तुमच्या चवीनुसार कमी जास्त करा.

पण असे पदार्थ झणझणीत हवेतच!

✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा