कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

गूळ पोळी

नवीन वर्षात येणारा पहिला सण संक्रांत... गोडवा आणणारा म्हणून हीच रेसीपी शेअर करतेय जीवनातल्या गोडव्याला सुरुवात करताना!
साहित्य: गूळ दोन वाट्या, तीळ अर्धी वाटी, खसखस पाव वाटी, सुकं खोबरं पाव वाटी, दाण्याचं कूट पाव वाटी, बेसन अर्धी वाटी, तीन चमचे तेल
पारी साठी: दीड वाटी कणिक, सव्वा वाटी मैदा,  पाव वाटी बेसन,एक टेबलस्पून तेल, मीठ, पाणी
लाटण्यासाठी तांदूळ पिठी
कृती: तीळ, खसखस, खोबरं किसून सगळं वेगवेगळे भाजून घ्या. मिक्सरला फिरवून घ्या. भाजलेल्या दाण्याचं कूट मिसळा. बेसन तीन चमचे तेल घालून खमंग भाजा. गूळ बारीक किसून घ्या. बेसन आणि भाजलेले सर्व साहित्य गुळात मिसळा.
कणिक आणि मैदा, बेसन थोडं मीठ एकत्र करा. एक टेबलस्पून तेल तापवून त्यावर घाला. घट्ट पीठ मळा. अर्धा तास ठेवा.
सारण कोरडं वाटत असेल तर दुधाचा हात लावून मळून घ्या. जेवढं पीठ तेवढं सारण घेऊन त्याची गोळी पारीच्या वाटीत भरून तांदळाच्या पिठीवर लाटा
. मध्यम गॅसवर भाजा. साजूक तुपाबरोबर फस्त करा.
टीप:  पोळ्या चिकटू नयेत म्हणून  एक टीप... पोळी टाकताना गूळ दिसत असेल अशी बाजू वर आणि एकसंध पिठाची बाजू खाली ठेवायची तव्यावर, उलटण्या आधी जिथे फुटलीय नक्की चिकटणार असं वाटतंय तिथे तेल सोडून मग परतायची किंवा परतल्यावर बाजूने तेल सोडायचं थोडं यामुळे तव्याला चिकटत नाही☺️ पुढच्या वेळी करून बघा.  
एक नॅपकिन ठेवा जवळ पोळी झाली की लगेच तवा पुसून घ्या, किंचित गूळ बाहेर आला असेल तर पटकन निघतो आणि पुढची पोळी चिकटत नाही.

सुरळीच्या वड्या

सुरळीच्या वड्या:
कधी कधी खूप सारे पदार्थ करताना एखादा राहून जातो. सुरळीच्या वड्या माझी जाऊ रोहिणी छान करते त्यामुळे मी आपली हाताखाली लुडबुड.. पुर्णपणे एकटीने आज पहिल्यांदा केल्या.
साहित्य: एक वाटी बेसन(चणाडाळीचं पीठ), दोन वाट्या पाणी, एक वाटी ताक, मीठ, दोन ओल्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ओलंखोबरं, दोन चमचे तेल, अर्धा चमचा मोहोरी, हिंग
कृती: खोबरं खवून घ्यावं. कोथिंबीर धुवून बारीक चिरावी. मिरच्या वाटून घ्याव्या. खोबरं कोथिंबीर, मिरचीचं वाटप आणि मीठ एकत्र करावं. दोन वाट्या पाणी आणि ताक नॉनस्टीक पॅनमध्ये एकत्र करावं. चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, हिंग घालावं. आता बेसन घालून नीट मिसळावं. गोळी होता कामा नये.
आता मंद गॅसवर मिश्रण सतत ढवळत राहावं. दोन ताटाना तेलाचा हात लावून घ्यावा. मिश्रण शिजत आलं की घट्ट होत जातं. पिठाचा रंग बदलतो.
आता उलथ्याच्या सहाय्याने भराभर ताटावर पसरावे. त्यावर खोबरं कोथिंबीर घालावी.
आता उभ्या रेषा मारून घ्याव्या. अर्ध्यापर्यंत गुंडाळावे.
अश्या पध्दतीने सर्व वड्या गुंडाळून घ्याव्या. मस्त डीश तयार आहे.
वरून तेलाची मोहोरी हिंगाची फोडणी द्यावी.

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की

शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की:
ही चिक्की करायची ठरवलं तेव्हा डोळ्यासमोर आली आमची घारू आत्ते... खरं तर माझ्या आत्याची नणंद.. आमचीच सख्खी आत्या कधी झाली ते कळलंच नाही! काही वेळा सख्ख्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं जास्त जवळचं वाटतं.. तशी घारू आत्ते म्हणजे मायेचा सागर! तिला नुसतं पाहिलं तरी डोळ्यात जाणवायचा फक्त आपलेपणा, प्रेम आणि अगत्य... त्याच धाग्याने नात्यापेक्षा जास्त बांधून ठेवलं होतं तिने! तिच्याकडे जाणारा कोणीही कधीच विन्मुख परत येणारच नाही. माझे बाबा घरचे आंबे घेऊन गेले की न बोलता ती पोळी भाजीचं ताट समोर ठेवायची. बाबांच्या शबनम मध्ये रिक्षाचे पैसे आणि आम्हा मुलांसाठी कसल्या तरी वड्या हळूच सरकवायची. आपल्याला एवढ्या लांबून हा वस्तू आणतो याबद्दल तिला अतिशय कौतुक होतं. मीही रत्नागिरीत कॉलेजमध्ये असताना कधीही वस्तीला रहायची वेळ आली की हक्काने जायची आत्तेकडे! तिच्या 'यावं गं!' या शब्दात माणसं बांधली गेली होती, माणुसकीच्या, प्रेमाच्या धाग्याने!
घारू आत्ते उत्तम सुगरण होती...अनेक प्रकारच्या वड्या ती फार सुंदर करायची. वेगवेगळी लोणची हा तिचा हातखंडा! ती पाच मिनिटांत दुसरं चहा प्यायला कोणी येणार असेल तरी त्याच्यापुरता चहा परत करायची..करून ठेवलेला आवडत नसे तिला. प्रत्येकवेळी चहाची चव सारखीच असायची.. अगदी तिच्या हळुवार, लोभस स्वभावासारखी!
ह्या शेंगदाण्याच्या तिने करून पाठवलेल्या चिक्कीची चव अजून माझ्या जिभेवर तशीच आहे..आज करून झाल्यावर तुकडा खाल्ला आणि  घारुआत्तेच्या प्रेमळ आठवणींसह सगळं झरझर समोर आलं!
साहित्य: अर्धी वाटी साखर, एक वाटी दाण्याचं कूट, अर्धा चमचा तूप
कृती: पोळपाटाला थोडं तूप लावून घ्या. लाटण्याला ही तूप लावा. कढईत साखर आणि तूप घालून मंद गॅसवर ढवळत रहा. दाण्याचं कूट तयार ठेवा. यात अजिबात पाणी वापरायचं नाही. हळूहळू साखरेचे मोठे खडे होतात आणि परत ती विरघळू लागते.
साखर विरघळू द्यायची पण धूर येता कामा नये. साखर पूर्ण विरघळली की कढई खाली उतरून दाण्याचं कूट मिसळून तयार पोळपाटावर गोळा घ्या.
लाटण्याने पटापट पातळ लाटा, लगेच सुरीने रेघा मारा.
पाच मिनिटांत चिक्की सुटते. मस्त कुरकुरीत, खमंग लागते चिक्की!
घारू आत्तेच्या आठवणीत चिक्कीची गोडी थोडी जास्तच वाढलीय....सख्ख्या नात्यांच्या  प्रेमासाठी आतुरतेने वाट पहायला लागणाऱ्या आजच्या जगात प्रेमाची ओंजळ निस्वार्थीपणे रिकामी करणारी घारू आत्ते माणुसकीचा दीपस्तंभ उभा करते...तोही अगदी सहजपणे!

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

कॉर्न चीज बॉल्स

कॉर्न चीज बॉल्स:
साहित्य: मक्याचे दाणे एका कणसाचे साधारणपणे 100 ग्रॅम, एक बटाटा, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, एक कांदा, मूठभर कोथिंबीर, मीठ, तिखट अर्धा चमचा, कॉर्न फ्लोअर, चीज क्यूब, ब्रेड स्लाईस चार पाच, पाणी, तेल
कृती: मक्याचे दाणे दहा मिनिटं वाफवून घ्या.  चाळणीवर काढा. बटाटा शिजवून घ्या. कांदा चिरा. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. आलं लसूण पेस्ट करून घ्या. दाणे कोरडेच थोडे अख्खे वगळून बाकीचे मिक्सरला भरड वाटून घ्या. एका थाळ्यात काढा. बटाटा सोलून कुस्करून घ्या. बारीक केलेल्या दाण्यांत बटाटा, कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, तिखट,मीठ घालून नीट मिक्स करा. ब्रेडचा चुरा करून घ्या.
एका वाटीत चार चमचे कॉर्न फ्लोअर घ्या. त्यात चवीला मीठ आणि थोडं पाणी घालून दाटसर पेस्ट बनवा. चिजचे चौकोनी तुकडे करा. तयार मिश्रण सैल वाटलं तर थोडा ब्रेडचा चुरा मिसळा. थोडं मिश्रण घेऊन गोळा करा. गोळा करत असतानाच त्यात चीज तुकडा ठेवा.  तयार बॉल आधी कॉर्नच्या पेस्टमध्ये घोळवा मग ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून घ्या. तेल तापत ठेवा. तयार बॉल्स तळून घ्या. सॉस सोबत सर्व्ह करा.

संत्रा भात

संत्रा भात:
या सीझनला मिळणारी संत्री खूप दिवस खुणावत होती. आज करण्याचा योग आला.
साहित्य: एक वाटी तांदूळ, एक वाटी साखर , एक वाटी पाणी, दोन वाट्या संत्र्याचा रस( साधारणपणे चार संत्र्याचा), मीठ, तूप दोन चमचे, चार लवंगा, काजूगर दहा बारा, बदाम काप, बेदाणे, केशर सिरप( ऐच्छिक) एक चमचा. संत्र्याच्या फोडी आणि साल सजावटी साठी, वेलची पावडर अर्धा टीस्पून
कृती: संत्री सोलून घ्या. बिया बाजूला करून रस काढा. एका संत्र्याच्या फोडी सोलून सजावटीसाठी ठेवा. रस गाळून घ्या. तांदूळ धुवून निथळत ठेवा. कढईत तूप घाला. त्यात लवंगा घाला, परतून झालं की तांदूळ घाला. परतून घ्या. कुकरच्या डब्यात तांदूळ काढून त्यात एक वाटी पाणी आणि एक वाटी संत्र्याचा रस घालून कुकरमध्ये ठेवून शिजवून घ्या.  भात गार होऊ द्या. काजूगर गरम पाण्यात ठेवा.  बदाम काप करा. बेदाणे स्वच्छ करून घ्या.कढईत साखर आणि एक वाटी संत्र्याचा रस एकत्र करा. चवीपुरते मीठ घाला. गॅसवर ठेवून साखर विरघळू द्या. गॅस बारीक ठेवा. काजूगर, बदाम काप, बेदाणे घाला. वेलची पावडर घाला. केशर सिरप घाला. शिजलेला भात मिक्स करा. मंद गॅसवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. दहा मिनिटांनी गॅस बंद करा. सर्व्ह करताना ताज्या संत्र्याच्या फोडीनी सजवून सर्व्ह करा.
✍🏻 मिनल सरदेशपांडे

बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

ग्रीन राईस

ग्रीन राईस:
हिवाळ्यातल्या भाज्यांसह अजून एक पौष्टिक रेसीपी!
साहित्य: एक वाटी तांदूळ, दोन वाट्या शिजवून पालकपेस्ट, मटार पाव वाटी, ओल्या मिरच्या दोन, कोथिंबीर अर्धी वाटी, आलं लसूणपेस्ट एक टीस्पून, गरम मसाला एक टीस्पून, दोन कांदे, सात आठ मिरी
दाणे, दोन छोटे तुकडे दालचिनी, एक टीस्पून जीरं, तूप एक टेबलस्पून, पाणी दोन वाट्या
कृती: तांदूळ धुवून निथळत ठेवा. कांदा बारीक चिरून घ्या. आलं, लसूण सोलून घ्या. मटार सोलून घ्या. मिरच्यांचे तुकडे करा. कांदा, कोथिंबीर, मिरची, आलं लसूण सर्व एकत्र पेस्ट करा.  पालक निवडून धुवून घ्या. एका पातेल्यात पाणी उकळवा. दहा मिनिटं या उकळत्या पाण्यात पालक बुडवून ठेवा. कढईत तूप तापत ठेवा. त्यात मिरी दाणे, जीरं, दालचिनी घाला. परतून घेऊन त्यात वाटलेली पेस्ट घाला. तूप सुटेपर्यंत परता. गरम मसाला घाला. आता तांदूळ आणि मटार घालून परता. आता दोन वाट्या गरम पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून एक वाफ येऊ द्या. पाण्यात ठेवलेला पालक निथळून घ्या. मिक्सरमध्ये फिरवून घ्या.  दहा मिनिटांनी  भात शिजत आला की पालक पेस्ट मिक्स करा. ढवळून पूर्ण शिजू द्या. गरमागरम ग्रीन राईस टॉमॅटो सारा सोबत किंवा दह्यातल्या कोशिंबिरीसोबत सर्व्ह करा.
✍🏻 मिनल सरदेशपांडे

बीटच्या देठांची कढी

बीटच्या देठांची कढी:
 बीट घ्यायला गेले तर छान पाल्यासह बीट मिळाले. पाल्याची भाजी केली आणि देठ वेगळे ठेवले.
साहित्य: बीटचे देठ एक वाटी शिजवून, दोन वाट्या ताक, अर्धी वाटी ओलं खोबरं, चार पानं कढीलिंब, दोन लसूण पाकळ्या, दोन ओल्या मिरच्या, दोन वाट्या पाणी, दोन टीस्पून डाळीचं पीठ, दोन टीस्पून तूप, चिमूटभर जीरं, हिंग, साखर दोन टीस्पून, मीठ.
कृती: बीटचे देठ धुवून सोलून घ्या. बारीक चिरा. मी वाफवून घेतले, तसेच घेतले तरी चालेल. लसूण सोलून घ्या. मिरची धुवून तुकडे करा. मिरची तिखट असेल तर कमी घ्या.
मिक्सरमध्ये बीटचे देठ, खोबरं, मिरच्या, लसूण एकत्र फिरवा. एक वाटी पाणी घालून परत फिरवा. पातेल्यात गाळण्याने गाळा.परत एक वाटी पाणी घालून चोथा फिरवून गाळा. दोन चमचे साखर, मीठ, कढीलिंब पाने, ताक सर्व गाळलेल्या मिश्रणात घालून ढवळा. थोडं मिश्रण एका वाटीत घेऊन डाळीचं पीठ मिक्स करा. गुठळ्या राहू देऊ नका. तुपाची जीरं आणि थोडी हिंग पावडर घालून फोडणी करा. जेवताना गरम करा. मस्त रंग येतो.😊
✍🏻 मिनल सरदेशपांडे

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

धिरड्याचे पौष्टिक सँडविच:

पौष्टिक सँडविच: फ्युजन रेसीपी:
साहित्य: धिरड्याचे मिश्र पीठ एक वाटी, मेथी धुवून चिरून शिजवून पाव वाटी, तिखट एक चमचा, हळद पाव चमचा, मीठ,चाट मसाला घरचे  तूप
सॅंडविच साठी: घरचा किंवा कोणत्याही कंपनीचा टोमॅटो सॉस, एक बीट वाफवून, एक कांदा स्लाईस, मुळ्याच्या स्लाईस, कोथिंबीर बारीक चिरून, मिरची बारीक तुकडे, लोणी घरचं किंवा बटर, चीज
कृती: मिश्र पिठात शिजलेली मेथी तिखट, मीठ, हळद घालून तुपावर चौकोनी आकारात धिरडी घाला.
दोन्ही बाजू भाजून घ्या. बीट वाफवून सोलून स्लाईस करा. एका धिरड्याला सॉस लावा. दुसऱ्या धिरड्याला घरचे लोणी थोडं मीठ मिसळून लावा. सॉस लावलेल्या धिरड्यावर कांदा बीट आणि मुळ्याचे स्लाइस लावा.
त्यावर कोथिंबीर, मिरचीचे तुकडे घाला. थोडा चाट मसाला भुरभुरा.
आता त्यावर चीज किसा. दुसरा पीस वर ठेवा.
तव्यावर मंद गॅसवर दोन्ही बाजू भाजा. वरून थोडे चीज किसून सॉस बरोबर सर्व्ह करा.
✍🏻 मिनल सरदेशपांडे

मेथी कांदा गोळा भाजी

मेथीकांदा भाजणी पेरून भाजी:
साहित्य: मेथी चिरून एक वाटी, दोन कांदे, भाजणी दोन टेबलस्पून, कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट एक टीस्पून, मीठ, हळद पाव टीस्पून, तेल दोन टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून
कृती: मेथी निवडून स्वच्छ धुवा. बारीक चिरा. कांदे चिरून घ्या. कढईत तेल तापवा. त्यात मोहोरी घाला. ती तडतडली की कांदा घालून परता. मऊ झाला की हळद आणि तिखट घाला. परता. मेथी घालून परता. त्यावर अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवा. मंद गॅसवर मेथी शिजू द्या. पाच मिनिटांत झाकण काढा. चवीनुसार मीठ घाला. भाजणी पेरून भाजी ढवळा आणि झाकण ठेवून छान वाफ येऊ द्या. गरमागरम भाजी आणि भाकरी म्हणजे अहाहा!!!!
टीप: यात भाजणी ऐवजी बेसन वापरू शकता. पण भाजणीचा खमंगपणा येतो.
साखर हवी असल्यास घाला.
✍🏻 मिनल सरदेशपांडे

तुरीच्या ओल्या दाण्यांची उसळ

तुरीच्या ओल्या दाण्यांची उसळ:
या सीझनला हिरव्या भाज्यांची रेलचेल असते. मटार, मुळा, तूर अशा शेंगा खूप येतात. ज्या ऋतूत भाजी मिळते ती त्या ऋतूत अवश्य खावी.
ही घ्या मग सोप्पी रेसीपी😊
साहित्य: पाव की तुरीच्या शेंगा( एक वाटी दाणे), एक टेबलस्पून ओलं खोबरं, एक टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, दोन ओल्या मिरच्या, दोन पाकळ्या लसूण, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद, तेल एक टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून, कोथिंबीर वरून सजवायला, मीठ
कृती: तुरीच्या शेंगा सोलून घ्या. दाणे मीठ आणि पाणी घालून शिजवून घ्या. खोबरं, कोथिंबीर, मिरचीचे तुकडे, सोललेली लसूण एकत्र करा. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटा. तेलाची मोहोरी, हळद घालून फोडणी करा. त्यात तुरीचे दाणे घाला. आता वाटप मिसळा. चवीनुसार मीठ घाला. आधी दाण्यांमध्ये मीठ घातलंय हे लक्षात ठेवा. कांदा लसूण मसाला घाला. उकळी काढा.
गरमागरम पोळी सोबत सर्व्ह करा.
✍🏻 मिनल सरदेशपांडे

मंगळवार, ४ डिसेंबर, २०१८

उपिठाचे कटलेट

उरलेल्या उपिठाचे कटलेट:
भरपूर माणसांच्या जेवणाची सवय असली की दोन माणसांचा अंदाज कसा येणार? मग काय होतं जास्त... जास्त झालं तर त्यातून काहीतरी आवडीचं केलं तर संपणार! बघा कृती...कदाचित यासाठी उपीठ/ उपमा/ सांजा मुद्दाम उरवाल😊
साहित्य: दोन वाट्या उरलेलं उपीठ, एक मध्यम बटाटा, तीन लसूण पाकळ्या, छोटा तुकडा आलं, एक चमचा तिखट, पाव चमचा हळद, कोथिंबीर, मीठ, तेल
कृती: बटाटा शिजवून घ्या. आलं लसूण पेस्ट करा. एका थाळ्यात उपीठ घ्या. त्यात कुस्करून बटाटा, तिखट, मीठ( हे बटाट्या पुरतं घाला, उपिठात सगळं आहेच), हळद, बारीक चिरून कोथिंबीर घाला. छान मळून घ्या. आता छोटे गोळे करून त्याला कटलेटचा आकार द्या.
तव्यावर तेल सोडून शॅलो फ्राय करा. सॉस बरोबर किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.
टीप: १)लहान मुलं घरात असतील तर कटलेटच्या मध्ये  तयार करताना छोटा चिजचा तुकडा ठेवा.
२) मी उपिठात शेंगदाणे घातले होते ते कटलेट मध्ये मधेच छान लागत होते.