कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की

शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की:
ही चिक्की करायची ठरवलं तेव्हा डोळ्यासमोर आली आमची घारू आत्ते... खरं तर माझ्या आत्याची नणंद.. आमचीच सख्खी आत्या कधी झाली ते कळलंच नाही! काही वेळा सख्ख्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं जास्त जवळचं वाटतं.. तशी घारू आत्ते म्हणजे मायेचा सागर! तिला नुसतं पाहिलं तरी डोळ्यात जाणवायचा फक्त आपलेपणा, प्रेम आणि अगत्य... त्याच धाग्याने नात्यापेक्षा जास्त बांधून ठेवलं होतं तिने! तिच्याकडे जाणारा कोणीही कधीच विन्मुख परत येणारच नाही. माझे बाबा घरचे आंबे घेऊन गेले की न बोलता ती पोळी भाजीचं ताट समोर ठेवायची. बाबांच्या शबनम मध्ये रिक्षाचे पैसे आणि आम्हा मुलांसाठी कसल्या तरी वड्या हळूच सरकवायची. आपल्याला एवढ्या लांबून हा वस्तू आणतो याबद्दल तिला अतिशय कौतुक होतं. मीही रत्नागिरीत कॉलेजमध्ये असताना कधीही वस्तीला रहायची वेळ आली की हक्काने जायची आत्तेकडे! तिच्या 'यावं गं!' या शब्दात माणसं बांधली गेली होती, माणुसकीच्या, प्रेमाच्या धाग्याने!
घारू आत्ते उत्तम सुगरण होती...अनेक प्रकारच्या वड्या ती फार सुंदर करायची. वेगवेगळी लोणची हा तिचा हातखंडा! ती पाच मिनिटांत दुसरं चहा प्यायला कोणी येणार असेल तरी त्याच्यापुरता चहा परत करायची..करून ठेवलेला आवडत नसे तिला. प्रत्येकवेळी चहाची चव सारखीच असायची.. अगदी तिच्या हळुवार, लोभस स्वभावासारखी!
ह्या शेंगदाण्याच्या तिने करून पाठवलेल्या चिक्कीची चव अजून माझ्या जिभेवर तशीच आहे..आज करून झाल्यावर तुकडा खाल्ला आणि  घारुआत्तेच्या प्रेमळ आठवणींसह सगळं झरझर समोर आलं!
साहित्य: अर्धी वाटी साखर, एक वाटी दाण्याचं कूट, अर्धा चमचा तूप
कृती: पोळपाटाला थोडं तूप लावून घ्या. लाटण्याला ही तूप लावा. कढईत साखर आणि तूप घालून मंद गॅसवर ढवळत रहा. दाण्याचं कूट तयार ठेवा. यात अजिबात पाणी वापरायचं नाही. हळूहळू साखरेचे मोठे खडे होतात आणि परत ती विरघळू लागते.
साखर विरघळू द्यायची पण धूर येता कामा नये. साखर पूर्ण विरघळली की कढई खाली उतरून दाण्याचं कूट मिसळून तयार पोळपाटावर गोळा घ्या.
लाटण्याने पटापट पातळ लाटा, लगेच सुरीने रेघा मारा.
पाच मिनिटांत चिक्की सुटते. मस्त कुरकुरीत, खमंग लागते चिक्की!
घारू आत्तेच्या आठवणीत चिक्कीची गोडी थोडी जास्तच वाढलीय....सख्ख्या नात्यांच्या  प्रेमासाठी आतुरतेने वाट पहायला लागणाऱ्या आजच्या जगात प्रेमाची ओंजळ निस्वार्थीपणे रिकामी करणारी घारू आत्ते माणुसकीचा दीपस्तंभ उभा करते...तोही अगदी सहजपणे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा