कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

पौष्टिक सार

पौष्टिक सार:
आज भोपळ्याचे भरीत केल्यावर लक्षात आलं भोपळ्याच्या साली तशाच राहिल्यात. रात्रीसाठी काहीतरी पातळ हवं होतंच! केला प्रयोग..मस्तपैकी टेस्टी सार तयार!
साहित्य: चार टॉमेटो, एक वाटी भोपळ्याच्या साली,  दोन टेबलस्पून मुगडाळ, सात आठ मिरी दाणे, एक तुकडा दालचिनी, चार पाकळ्या लसूण, कढीलिंब पाने, सुक्या मिरच्या चार तुकडे, मोहोरी पाव टीस्पून, जीरं पाव टीस्पून, हिंग चिमूटभर, पाणी, मीठ, साखर चार टीस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, तेल दोन टीस्पून
कृती: टॉमेटो धुवून चार भाग करा. भोपळ्याच्या साली चिरुन घ्या. टॉमेटो फोडी, भोपळ्याच्या साली, मिरी, लसूण सोलून, मुगडाळ धुवून आणि दालचिनी एकत्र करून थोडं पाणी घालून शिजवून घ्या. शिजलेलं मिश्रण गार होऊ द्या. आता मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून गाळून घ्या. कढल्यात तेल तापवा. त्यात मोहोरी घाला, ती तडतडली की जीरं, सुक्या मिरच्या आणि हिंग घालून फोडणी गाळलेल्या मिश्रणात घाला. अर्धा लीटर पाणी घाला. साखर, मीठ, कढीलिंबाची पाने आणि लाल तिखट घालून उकळी काढा. चवीप्रमाणे हवं असेल ते वाढवा. मस्त टेस्टी सार तयार आहे!
✍🏻मीनल सरदेशपांडे

रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

वरी तांदळाचा उपमा

वरी तांदुळाचा उपमा:
साहित्य: वरी तांदूळ एक वाटी, पाणी चार वाट्या, एक छोटा बटाटा, तीन ओल्या मिरच्या, तूप दोन टीस्पून, जीरं पाव टीस्पून, शेंगदाणे एक टेबलस्पून( ऐच्छिक),
मीठ, साखर एक टीस्पून, लिंबू  रस एक टीस्पून, आलं किसून पाव टीस्पून
कृती: वरी तांदूळ खमंग भाजून घ्या. बटाटा स्वच्छ धुवून घ्या, काचऱ्या करा. मिरच्या धुवून तुकडे करा. आलं सोलून किसून घ्या.
कढईत तूप तापत ठेवा. जीरं घाला, ते तडतडल्यावर मिरच्या घाला. त्यावर बटाटा आणि शेंगदाणे घालून परता. बटाटा शिजला की त्यात गरम करून चार वाट्या पाणी घाला. चवीनुसार मीठ, साखर, लिंबूरस आणि आलं घालून ढवळा. चव बघून के हवं असेल तर वाढवा. उकळी आली की त्यात भाजलेले वरी तांदूळ घालून नीट ढवळुन झाकण ठेवा. बारीक गॅसवर पाच मिनिटं वाफ येऊ द्या.  वरी तांदूळ छान शिजले की गॅस बंद करा. गरमागरम उपमा दह्यासोबत वाढा.
टीप:  एक वाटी ताक आणि  तीन वाट्या पाणी असंही घालू शकता. मग लिंबाची गरज नाही.
आलं उपासाला खात नसाल तर वगळा.
कोथिंबीर खात असाल तर वरून घाला.
✍🏻मीनल सरदेशपांडे

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

रव्याचे तिखटमीठाचे शंकरपाळे

साहित्यः अर्धी वाटी तेल/ तूप, दीड वाटी पाणी, मीठ, तिखट, ओवा, हळद, बारीक रवा, तळण्यासाठी तेल.
कॄती: प्रथम अर्धी वाटी तेल/ तूप, दीड वाटी पाणी, मीठ, तिखट (चवीनुसार), थोडीशी हळद हे सर्व एकत्र करून उकळावे. आणि गार करण्यास ठेवावे.
पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात मावेल एवढा बारीक रवा मिसळावा. अर्धा तास झाकून ठेवावे.
गोळी करून त्याची पोळी लाटावी. शंकरपाळे कापावेत.
तेलात तळून घ्यावेत. मस्त कुरकुरीत होतात.
टीप: मी तीळ घातले पण ते तेलात बऱ्यापैकी पडतात
वरून मी थोडं लाल तिखट आणि चाट मसाला भुरभुरवला.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

व्हेज कुर्मा

व्हेज कुर्मा:
साहित्य: फ्लॉवर अर्धा की, मटार एक कप,  अर्धा कप काजूगर( कुर्मा),मध्यम कांदे, पाच सहा लसूण पाकळ्या, अर्धा  इंच आलं, अर्धा टीस्पून गरम मसाला, 10 - 12 काजूगर(वाटप साठी) 10 बदाम, दोन चमचे खसखस, एक टेबलस्पून सुकं खोबरं,  2 टेबलस्पून तेल, 2 टीस्पून धने, अर्धा टीस्पून लाल तिखट, मीठ, कोथिंबीर
कृती: फ्लॉवर तुरे काढून मिठाच्या पाण्यात ठेवावेत.  काजूगर कोमट पाण्यात भिजत घालावेत. मटार शिजवून घ्यावेत, फ्लॉवरला वाफ काढावी. खसखस घेऊन त्यात अर्धा कप पाणी घालून दहा मिनिटं उकळावी. टॉमेटो दोन तुकडे करून पाच मिनिटं पाण्यात उकळवा. गार झाल्यावर सोलून बारीक चिरा. कांदा सोलून बारीक चिरा. काजूगर, बदाम, धने, सुकं खोबरं गरम करून घ्या. आलं लसूण, काजूगर, बदाम, सुकं खोबरं, खसखस, धने हे सर्व बारीक वाटून घ्या. कढईत तेल तापवा. कांदा आणि टॉमेटो परतत ठेवा. दोन मिनिटांनी तयार मसाला त्यात घाला. गरम मसाला घालून मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत परतत रहा.
घट्ट पातळ हवं असेल तसं आवडीनुसार  पाणी घाला. मीठ घाला.  लाल तिखट घाला.शिजलेल्या भाज्या  भिजलेले काजूगर घालून मंद गॅसवर पाच मिनिटं उकळू द्या. चव बघून लागेल ते वाढवा.
मी यात गूळ/ साखर घालत नाही, हवी तर चमचाभर साखर घाला.
हिरव्या मिरच्या घालणार असाल तर चार मिरच्या मसाल्यासोबत वाटा. मात्र लाल तिखट वगळा. कोथिंबीरीने सजवून वाढा.
✍🏻मीनल सरदेशपांडे

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

मुगडाळीचा चटका

मुगडाळीचा चटका:

कधी कधी काहीतरी चविष्ट हवं असतं पण रोजच्या कोशिंबीरी, भाजी नको वाटते. त्यासाठी हा पर्याय! माझ्या आजे सासूबाई दह्यातले बरेच प्रकार करायच्या. मला त्यांचा सहवास फार मिळाला नाही त्यामुळे सासूबाईंकडून मला कळलेली ही रेसिपी!
साहित्य: मुगडाळ अर्धी वाटी, दोन ओल्या मिरच्या, मीठ, तूप एक टीस्पून, जीरं पाव टीस्पून, हिंग चिमूटभर, कोथिंबीर एक टेबलस्पून, दही एक वाटी, साखर अर्धा टीस्पून(ऐच्छिक)
कृती: मुगडाळ दोन तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा. दोन तासांनी चाळणीवर काढा. पाणी न घालता डाळ भरडसर वाटून घ्या. कढल्यात तूप तापत ठेवा. ते तापलं की त्यात जीरं, मिरचीचे तुकडे घाला. गॅस बंद करून हिंग घाला. कोथिंबीर धुवून बारीक चिरा. वाटलेल्या डाळीत कोथिंबीर, फोडणी,  चवीनुसार मीठ, साखर आणि दही घालून नीट एकत्र करा. चव बघून काही हवं असेल तर वाढवा.
मस्त चविष्ट चटका तयार आहे.
टीप: हा चटका थोडा तिखट असतो त्यामुळे मिरचीच्या तिखटपणावर आणखी वाढवा.
यात तुम्ही  नुसती चणाडाळ किंवा दोन्ही डाळी मिक्स करून पण घेऊ शकता. रात्रीची वेळ असल्यामुळे मी पचायला हलकी मुगडाळ घेतली.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

कारल्याची कुरकुरीत चटणी

कारल्याची कुरकुरीत चटणी:
 नुकतंच आईचं भरणी श्राद्ध झालं तेव्हा माहेरी गेले होते. वहिनीने ही चटणी केली होती. जेवताना माझी भाची म्हणाली..अगं आत्ते ही अशी चटणी ना सरिता आजी करायची तिला ती आवडायची ना...आज ती येणारे  जेवायला म्हणून आईने केलीय तिच्यासाठी! आज करूया ही कुरकुरीत चटणी!

साहित्य: चार मध्यम कारली( एक कप बारीक चिरून), पाव कप सुकं खोबरं किसून, तीळ एक टेबलस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, तेल दोन टीस्पून, हळद पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, साखर अर्धा टीस्पून, मीठ, आमचूर पावडर चिमूटभर(ऐच्छिक)
कृती: कारलं मध्ये कापून बिया काढून घ्या.अगदी बारीक चिरा. कारल्याच्या फोडींना मीठ लावून ठेवा. खोबरं किसून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. मोहोरी घाला, ती तडतडली की हिंग, हळद घाला. मीठ लावून ठेवलेल्या फोडी पिळून घ्या. फोडणीत त्या फोडी घालून परतत रहा, दहा मिनिटं तरी अधूनमधून परतत राहिलात की फोडी कुरकुरीत होऊ लागतील.
आता त्यात तीळ, खोबरं, मीठ, साखर, तिखट आणि असेल तर आमचूर पावडर घालून पुन्हा पाच मिनिटं परता.
मस्त कुरकुरीत कारल्याची चटणी तयार आहे. मुलं सुध्दा अगदी आवडीने खातात.
टीप: माझी आई काळे तीळ वापरत असे, कोणतेही चालतील.
हिरवी मिरची घालायची असेल तर ती कारल्यासोबत परता.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

काजू पिस्ता रोल:

काजू पिस्ता रोल: 
साहित्य: काजूगर  एक वाटी, साखर अर्धी वाटी, पाणी पाव वाटी, वेलची पावडर

रोलसाठी: पिस्ता 25 ग्रॅम, बदाम 25 ग्रॅम, पिठीसाखर एक टेबलस्पून, दूध अर्धा टेबलस्पून, खाण्याचा हिरवा रंग दोन थेंब, वेलची पावडर






 कृती:

 पिस्ता आणि बदाम वेगवेगळे मिक्सरला लावून भरडसर वाटून घ्यावे, त्यात पिठीसाखर, चिमूटभर वेलची पावडर घालून मिक्स करावे. दुधात कलर घालून ते दूध हळूहळू या मिश्रणात मिक्स करावे. व्यवस्थित रोल होईल एवढे दूध घालावे. मिसळून घेऊन लांब करंगळीएवढे रोल करून ठेवावेत.  काजूगर थोडे थोडे घेऊन पावडर करावी.  अर्धी वाटी साखरेत पाव वाटी पाणी घालून  गॅसवर ठेवावे. साखर विरघळू द्यावी. पूर्ण विरघळली की काजू पावडर आणि चिमूटभर वेलची पावडर घालून मिक्स करावे. दोन मिनिटं शिजवावे. खाली उतरून घोटत रहावे. जाड पिशवी दोन कडा कापून सरळ करावी. त्याला तूप लावावे. काजूचा गोळा घट्ट झाला की पिशवीवर  अर्ध्या भागात काढून घ्यावा, अर्धा भाग त्यावर ठेवून लाटण्याने चौकोनी लाटावे.  लांब चार पट्ट्या कापून घ्याव्या, तयार  पिस्ता रोल त्यावर ठेवून पिशवी सोडवत पट्टी त्याला गुंडाळून घ्यावी. रोल घट्ट वळावेत. आवडीप्रमाणे तुकडे करावेत.

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

अळू अंबाडीची गोळा भाजी

अळू अंबाडीची गोळा भाजी:
साहित्य: अळू चिरून दीड कप( 10 मध्यम पानं), अंबाडीची पानं चिरून अर्धा कप, भाजणी एक कप, लाल तिखट  अर्धा टीस्पून, मीठ, साखर एक टीस्पून, तेल पाव कप, मोहोरी पाव टीस्पून,  हळद पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, सांडगी मिरच्या तीन, पाणी दीड कप, सुक्या मिरच्या चार पाच
कृती: अळूची देठी बाजूला ठेवून पानं स्वच्छ धुवा, बारीक चिरा. अंबाडी धुवून बारीक चिरा. अळू आणि अंबाडी एकत्र करून थोडं पाणी घालून शिजवून घ्या. शिजल्यावर पाणी काढून टाका. आता त्या शिजलेल्या पाल्यात भाजणी, दीड कप पाणी, लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि साखर घालून नीट एकत्र करा, चव बघून काही हवं तर वाढवा.
दोन टीस्पून तेल बाजूला ठेवून बाकीचं कढईत तापत ठेवा. सांडगी मिरची तळून घ्या.  तळलेली मिरची बारीक करा.आता त्या तेलात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. तयार मिश्रण फोडणीत घालून ढवळा, सांडगी मिरची घाला  आणि झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवा. अधेमधे ढवळत रहा. भाजी छान शिजली की बाजूला ठेवलेलं तेल छोट्या कढल्यात घ्या. तेल तापलं की सुकी मिरची, हिंग आणि थोडं लाल तिखट घालून फोडणी तयार भाजीवर घाला.
टीप: अंबाडी नसेल तर अळू शिजताना एक चमचा चिंचेचा कोळ घालून शिजवा.
✍🏻मीनल सरदेशपांडे

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

टॉमेटोचा चटका


ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे, झटपट सोपी!
कधी कधी भाजी आणायची राहून जाते अचानक पाहुणे येतात अशावेळी ही पटकन होणारी चविष्ट भाजी नक्की करून पहा!
साहित्य: 8 पिकलेले टॉमेटो, एक टेबलस्पून शेंगदाणे कूट, एक टेबलस्पून ओलं खोबरं, दोन कांदे( ऐच्छिक), कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट एक टीस्पून (मिरचीच्या तिखटपणावर अवलंबून), पाच ओल्या मिरच्या, गूळ एक टीस्पून, मीठ, तेल  एक टेबलस्पून, मेथी दाणे दहा/बारा, मोहोरी पाव टीस्पून, हळद पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून
कृती: टॉमेटो धुवून त्याच्या कोशिंबीरीसाठी करतो त्यापेक्षा थोडया मोठ्या फोडी करा, बिया काढून टाका. मिरच्या धुवून आवडीप्रमाणे तुकडे करा. कढईत तेल तापत ठेवा. तेल तापलं की मोहोरी घालून ती तडतडली की मेथी दाणे घाला. मिरचीचे तुकडे घालून परता. कांदा घालणार असाल तर आत्ता घालून परतून घ्या. हळद, हिंग घालून परता. टॉमेटो फोडी घालून  दोन मिनिटं परता. आता त्यात गूळ, मीठ, दाण्याचं कूट, ओलं खोबरं घाला. अर्धी वाटी पाणी घाला. गूळ विरघळला की चव बघा, मिरचीचा तिखटपणा आला नसेल तर तिखट किंवा कांदा लसूण मसाला घाला. एक उकळी आली की गॅस बंद करा.
टीप: चटका म्हणून यात मिरच्या असल्या तरी लाल तिखट लागतं, हल्ली ज्या मिरच्या मिळतायत त्या अजिबात तिखट नसतात.
आत्ता गणपती असल्याने मी कांदा आणि कांदा लसूण मसाला घातला नाही पण त्याने चव चांगली येते.
✍🏻 मीनल सरदेशपांडे