कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

अळू अंबाडीची गोळा भाजी

अळू अंबाडीची गोळा भाजी:
साहित्य: अळू चिरून दीड कप( 10 मध्यम पानं), अंबाडीची पानं चिरून अर्धा कप, भाजणी एक कप, लाल तिखट  अर्धा टीस्पून, मीठ, साखर एक टीस्पून, तेल पाव कप, मोहोरी पाव टीस्पून,  हळद पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, सांडगी मिरच्या तीन, पाणी दीड कप, सुक्या मिरच्या चार पाच
कृती: अळूची देठी बाजूला ठेवून पानं स्वच्छ धुवा, बारीक चिरा. अंबाडी धुवून बारीक चिरा. अळू आणि अंबाडी एकत्र करून थोडं पाणी घालून शिजवून घ्या. शिजल्यावर पाणी काढून टाका. आता त्या शिजलेल्या पाल्यात भाजणी, दीड कप पाणी, लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि साखर घालून नीट एकत्र करा, चव बघून काही हवं तर वाढवा.
दोन टीस्पून तेल बाजूला ठेवून बाकीचं कढईत तापत ठेवा. सांडगी मिरची तळून घ्या.  तळलेली मिरची बारीक करा.आता त्या तेलात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. तयार मिश्रण फोडणीत घालून ढवळा, सांडगी मिरची घाला  आणि झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवा. अधेमधे ढवळत रहा. भाजी छान शिजली की बाजूला ठेवलेलं तेल छोट्या कढल्यात घ्या. तेल तापलं की सुकी मिरची, हिंग आणि थोडं लाल तिखट घालून फोडणी तयार भाजीवर घाला.
टीप: अंबाडी नसेल तर अळू शिजताना एक चमचा चिंचेचा कोळ घालून शिजवा.
✍🏻मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा