कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

मुगडाळीचा चटका

मुगडाळीचा चटका:

कधी कधी काहीतरी चविष्ट हवं असतं पण रोजच्या कोशिंबीरी, भाजी नको वाटते. त्यासाठी हा पर्याय! माझ्या आजे सासूबाई दह्यातले बरेच प्रकार करायच्या. मला त्यांचा सहवास फार मिळाला नाही त्यामुळे सासूबाईंकडून मला कळलेली ही रेसिपी!
साहित्य: मुगडाळ अर्धी वाटी, दोन ओल्या मिरच्या, मीठ, तूप एक टीस्पून, जीरं पाव टीस्पून, हिंग चिमूटभर, कोथिंबीर एक टेबलस्पून, दही एक वाटी, साखर अर्धा टीस्पून(ऐच्छिक)
कृती: मुगडाळ दोन तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा. दोन तासांनी चाळणीवर काढा. पाणी न घालता डाळ भरडसर वाटून घ्या. कढल्यात तूप तापत ठेवा. ते तापलं की त्यात जीरं, मिरचीचे तुकडे घाला. गॅस बंद करून हिंग घाला. कोथिंबीर धुवून बारीक चिरा. वाटलेल्या डाळीत कोथिंबीर, फोडणी,  चवीनुसार मीठ, साखर आणि दही घालून नीट एकत्र करा. चव बघून काही हवं असेल तर वाढवा.
मस्त चविष्ट चटका तयार आहे.
टीप: हा चटका थोडा तिखट असतो त्यामुळे मिरचीच्या तिखटपणावर आणखी वाढवा.
यात तुम्ही  नुसती चणाडाळ किंवा दोन्ही डाळी मिक्स करून पण घेऊ शकता. रात्रीची वेळ असल्यामुळे मी पचायला हलकी मुगडाळ घेतली.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा