कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

कारल्याची कुरकुरीत चटणी

कारल्याची कुरकुरीत चटणी:
 नुकतंच आईचं भरणी श्राद्ध झालं तेव्हा माहेरी गेले होते. वहिनीने ही चटणी केली होती. जेवताना माझी भाची म्हणाली..अगं आत्ते ही अशी चटणी ना सरिता आजी करायची तिला ती आवडायची ना...आज ती येणारे  जेवायला म्हणून आईने केलीय तिच्यासाठी! आज करूया ही कुरकुरीत चटणी!

साहित्य: चार मध्यम कारली( एक कप बारीक चिरून), पाव कप सुकं खोबरं किसून, तीळ एक टेबलस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, तेल दोन टीस्पून, हळद पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, साखर अर्धा टीस्पून, मीठ, आमचूर पावडर चिमूटभर(ऐच्छिक)
कृती: कारलं मध्ये कापून बिया काढून घ्या.अगदी बारीक चिरा. कारल्याच्या फोडींना मीठ लावून ठेवा. खोबरं किसून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. मोहोरी घाला, ती तडतडली की हिंग, हळद घाला. मीठ लावून ठेवलेल्या फोडी पिळून घ्या. फोडणीत त्या फोडी घालून परतत रहा, दहा मिनिटं तरी अधूनमधून परतत राहिलात की फोडी कुरकुरीत होऊ लागतील.
आता त्यात तीळ, खोबरं, मीठ, साखर, तिखट आणि असेल तर आमचूर पावडर घालून पुन्हा पाच मिनिटं परता.
मस्त कुरकुरीत कारल्याची चटणी तयार आहे. मुलं सुध्दा अगदी आवडीने खातात.
टीप: माझी आई काळे तीळ वापरत असे, कोणतेही चालतील.
हिरवी मिरची घालायची असेल तर ती कारल्यासोबत परता.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा