कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, ३१ मार्च, २०२१

दुधीच्या सालींची चटणी

 दुधीच्या सालींची चटणी:


साहित्य: दुधीच्या साली एक कप, अर्धा कप ओलं खोबरं,  दोन टेबलस्पून भाजलेले तीळ, अर्धं लिंबू, एक टीस्पून साखर, एक टीस्पून मीठ, ओल्या मिरच्या पाच, जिरं पावडर किंवा जिरं अर्धा टीस्पून, लसूण चार पाकळ्या(ऐच्छिक), तेल एक टीस्पून

कृती: भाजीसाठी आणलेला दुधी सोलून साली एकत्र करा.  तेलावर  मिरच्यांचे तुकडे आणि सालींचे तुकडे परतत ठेवा, दहा मिनिटं परतून गॅस बंद करा. 


दुधीच्या सालीत ओलं खोबरं, मीठ, साखर ,  भाजलेले तीळ, जिरं पावडर एकत्र करा, लिंबू पिळा. आता थोडे थोडे मिक्सरला लागेल तेवढेच पाणी घालून वाटा. चवीनुसार लागेल ते वाढवा.

मस्त पौष्टिक आणि चविष्ट चटणी तयार आहे!

टीप: लसूण घालणार असाल तर चटणी वाटताना घाला.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

मंगळवार, ३० मार्च, २०२१

लेमन आईस टी

 काय मंडळी उन्हाळा स्पेशल पेय रेसिपी देतेय वेगवेगळ्या आवडतायत ना? काही आवडतील काही कोणाला न चालणाऱ्या पण असतील.तरीही ज्या आवडतील त्या नक्की करून बघा, आणि उन्हाळा सुसह्य करा.

 ज्यांना चहा आवडतो त्याना ही रेसिपी नक्की आवडेल. बाहेर जाऊन पिण्या पेक्षा घरीच सोप्या पद्धतीने झटपट चहा नक्की करून बघा.

 

लेमन आईस टी: 


साहित्य: चार ग्लास आईस टी साठी

चार ग्लास पाणी, दोन लिंबं, 1 टीस्पून चहा पावडर,  आठ टीस्पून साखर, बर्फाचे खडे

कृती:  अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यात चार टीस्पून  साखर 1 टीस्पून  चहा पावडर घालून उकळी काढून गाळून घ्या. पूर्ण गार करा. त्यात गार झाल्यावर उरलेलं सगळं गार पाणी घाला, साखर घाला, लिंबू पिळा. 

चव बघून लागली तर साखर वाढवा.

गारेगार करून बर्फाचे खडे घालून सर्व्ह करा. 



कलिंगडाचे सरबत

 कलिंगडाचे सरबत:


साहित्य: 1 कप कलिंगडाच्या फोडी, 1 कप गार पाणी, 1 लिंबू, काळं मीठ, पुदिना पानं पाच सहा, साखर लागल्यास

कृती: कलिंगडाच्या बिया काढून फोडी करा. ज्युसर जार मध्ये कलिंगडाच्या फोडी, एक लिंबाचा रस,  पुदिना,अर्धा टीस्पून काळं मीठ घालून फिरवा. पाणी घालून परत एकदा फिरवा. गाळून घ्या. चव बघून लागली तर साखर घाला.

सोमवार, २९ मार्च, २०२१

चिंचेचे सरबत

 चिंच गुळाचे सरबत:


साहित्य: एक कप गूळ, अर्धा कप साखर, तीन टेबलस्पून चिंचेचा कोळ, जीरं पावडर 1 टीस्पून, धने पावडर अर्धा टीस्पून, काळं मीठ 1 टीस्पून, साधं मीठ चवीनुसार

कृती:  साखर आणि गुळात एक कप पाणी घालून दोन तारी पाक करा. गॅस बंद करून त्यात चिंचेचा कोळ, जीरं पावडर, काळं मीठ, धने पावडर मिक्स करा. मिश्रण गार झालं की फ्रीजमध्ये ठेवा. सरबत करताना एक ग्लास थंड पाणी घेऊन त्यात दीड टेबलस्पून तयार मिश्रण घाला. लागलं तर साधं मीठ घाला. बर्फ घालून गारेगार सर्व्ह करा.


टीप: चिंचेच्या आंबट पणावर गुळाचे प्रमाण कमीजास्त करा.

शनिवार, २७ मार्च, २०२१

पपई मिल्कशेक

पपई/पपया मिल्कशेक:

साहित्य: पपयाच्या फोडी 1 कप, गार दूध 2 कप, साखर 4 टीस्पून, वेलची पावडर चिमूटभर, बर्फाचे खडे

कृती: पपया साल आणि बिया काढून फोडी करा. ज्युसर जार मध्ये पपया च्या फोडी, दूध, साखर आणि वेलची पावडर एकत्र करा. मऊ होईपर्यंत फिरवा. बर्फ घालून गारेगार सर्व्ह करा.


काकडी कैरी/लिंबू सरबत:

 काकडी कैरी/लिंबू सरबत:


साहित्य: 

काकडी दोन, दोन टेबलस्पून कैरी किस किंवा दोन लिंबाचा रस, अर्धा टीस्पून काळं मीठ, अर्धा टीस्पून जीरं पावडर, थोडीशी कोथिंबीर किंवा पुदिना, सहा टीस्पून साखर, साधं मीठ पाव टीस्पून, आलं अर्धा इंच तुकडा, पाणी 1 लीटर

कृती: काकडी सोलून तुकडे करा. एक कैरी किसून घ्या किंवा दोन लिंबाचा रस काढा. आलं सोलून घ्या. ज्युसर जार मध्ये काकडी तुकडे, कैरी किस किंवा लिंबू रस, साखर,दोन्ही मीठ, आलं, जीरं पावडर, दहा बारा पानं कोथिंबीर किंवा पुदिना घाला. एक ग्लास पाणी घाला, आणि सगळं मिश्रण बारीक होईपर्यंत फिरवा. एक भांड्यात घालून उरलेलं पाणी घाला. चव बघून काही हवं तर वाढवा. 


टीप: मला यात पुढे साखर नाही आवडत तुम्हाला हवी तर वाढवा.


गुरुवार, २५ मार्च, २०२१

कॉफी केक

 कॉफी केक:


साहित्य: 4 टीस्पून इन्स्टंट कॉफी पावडर, अर्धा कप दूध, अर्धा कप दही, 1 कप पिठी साखर,, अर्धा कप तेल,  दीड कप मैदा, 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून खायचा सोडा, 1 टीस्पून व्हीनिगर, चिमूटभर मीठ

कृती: कुकरची रिंग आणि शिट्टी काढून घ्या. कुकरमध्ये एक वाटी मीठ पसरा. आता मध्यम गॅसवर कुकर  दहा मिनिटं प्रिहिट करायला ठेवा.

एका भांड्यात तेल पिठीसाखर, दही, व्हॅनिला इसेन्स एकत्र करून फेटून घ्या. मैदा, बेकिंग पावडर, सोडा, कॉफी पावडर एकत्र करून चाळणीने चाळून फेटलेल्या मिश्रणात मिक्स करा. एक दिशेने ढवळत रहा, हळूहळू त्यात  दूध मिक्स करा. केकच्या भांड्याला तेल लावून घ्या. आता तयार मिश्रणात व्हीनिगर घालून मिश्रण पटापट फेटा आणि केकच्या भांड्यात ओता.  मिठावर स्टीलचा स्टॅण्ड ठेवून त्यावर केकचं भांडं ठेवा.

कुकरचं झाकण लावून दहा मिनिटं मध्यम गॅसवर आणि 35 मिनिटं बारीक गॅसवर केक भाजा. 45 मिनिटांनी झाकण उघडून बघा, सूरी घालून त्याला केक चिकटला नाही की केक तयार!


1 कप = 250ml

✍🏻

मीनल सरदेशपांडे

बुधवार, २४ मार्च, २०२१

चिंच गुळाची बाजारी चटणी

 चिंचगुळाची चटणी:  ही चटणी बाहेरून आणलेल्या सामोसा कचोरी सोबत मिळते.

साहित्य:


१) एक कप (250ml) गूळ,

२) पाव कप साखर

३)२ टेबलस्पून चिंचेचा घट्ट कोळ

४)अर्धा टीस्पून शेंदेलोण

५)अर्धा टीस्पून पादेलोण

६) दोन टीस्पून काश्मिरी लाल तिखट

७) अर्धा टीस्पून नेहमीचं लाल तिखट

८) अर्धा टीस्पून धने

९) अर्धा टीस्पून बडीशेप

१०) पाव टीस्पून जीरं

११) अर्धा कप पाणी

कृती:

१) गूळ, साखर आणि पाणी एकत्र करून उकळत ठेवा. 

२) धने, जीरं, बडीशेप गरम करून घ्या, गार करून भरड वाटा.

३) गूळ साखर विरघळली आणि एक तारी पाक झाला की गॅस बंद करून त्यात दोन्ही प्रकारचं मीठ, तिखट, चिंच कोळ आणि मसाला घालून ढवळा.

परत एक कढ काढा.

४) गार करत ठेवा, गार झाल्यावर बरणीत भरून ठेवा.

५) गार झाल्यावर ही चटणी घट्ट होईल.


मंगळवार, १६ मार्च, २०२१

लिंबू पुदिना शिकंजी

 आजची उन्हाळा स्पेशल पेय रेसिपी: लिंबू पुदिना शिकंजी! 


आता बऱ्याच ठिकाणी  सरबताच्या गाडीवर हे लिहिलेलं दिसलं म्हटलं काय असते शिकंजी ते करून पाहू, घ्या बघू गारेगार!

याचा मसाला असतो, थोडं भाजून जीरं चार चमचे, दोन चमचे काळं मीठ, एक चमचा मिरी, अर्धा चमचा साधं मीठ असं एकत्र करून वाटायचं. सब्जा बी भिजत घालायचं. एक ग्लास पाणी, तीन चमचे साखर,  एक चिमूट मीठ, एक लिंबाचा रस आणि मूठभर पुदिना हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं. लागेल तेवढं पाणी घाला. प्यायला देताना सब्जा बी एक चमचा, त्यावर तयार लिंबू पुदिना सरबत त्यावर थोडा मसाला भुरभुरावून द्यायचं.


रविवार, १४ मार्च, २०२१

रव्याची कुरकुरीत भजी

 रव्याची कुरकुरीत भजी:


साहित्य: 1 कप (250 ml)  न भाजलेला रवा, अर्धा कप दही, पाव कप गाजर कीस, पाव कप बारीक चिरलेला कांदा, 1 बटाटा सोलून किसून, 1 टीस्पून आलं, 1 टीस्पून मिरची पेस्ट, पाव कप कोथिंबीर, दोन टेबलस्पून कॉर्न फ्लोअर, मीठ, अर्धा टीस्पून खायचा सोडा, पाणी, तळणीसाठी तेल

कृती: रव्यात किसलेलं गाजर,  बटाटा,कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं मिरची पेस्ट , मीठ आणि दही घाला. अर्धा कप पाणी घाला आणि अर्धा तास  मिश्रण झाकून ठेवा.  आता त्यात कॉर्न फ्लोअर आणि खायचा सोडा मिक्स करा. मिश्रण भज्यांच्या पिठाइतपतच सैल हवं. तळणीसाठी कढईत तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर मध्यम गॅसवर भजी तळून घ्या.


टॉमेटो सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा. जेवताना काहीतरी तळण म्हणूनपन करू शकता.

टीप: यात कांदा न घालता तुमच्या आवडीने कोणत्याही भाज्या घालू शकता.  मला ज्यात त्यात लसूण आवडत नाही तुम्हाला हवी तर घाला. 


भजी मस्त कुरकुरीत होतात नक्की करून पहा.


टॉमेटो ऑम्लेट

 टॉमेटो आम्लेट: 


साहित्य: 3 टॉमेटो, 2 कांदे, दहा लसूण पाकळ्या, चार मिरच्या किंवा 1 टीस्पून लाल तिखट, कोथिंबीर पाव कप, मीठ, बेसन दोन कप, तांदूळ पीठ अर्धा कप, हळद अर्धा टीस्पून, पाणी, तेल

कृती: कांदा, टॉमेटो बारीक चिरून घ्या. लसूण, मिरची अगदी बारीक चिरा. कोथिंबीर धुवून बारीक चिरा.  एका पातेल्यात बेसन, तांदूळ पीठ एकत्र करा. त्यात मिरची, कोथिंबीर, कांदा, टॉमेटो, लसूण, मिरच्या किंवा लाल तिखट, मीठ, हळद सर्व एकत्र करा. हळूहळू पाणी मिक्स करा. खूप जास्त पातळ नको. चव बघून तिखट मीठ वाढवा. तवा तापत ठेवा. तापल्यावर गॅस मंद करून तव्याला तेल लावून घ्या. आता तयार मिश्रण धिरड्या सारखं पसरा.


झाकण ठेवा. दोन मिनिटांनी झाकण काढून बाजू पलटा. आता गॅस मोठा करून बाजूने तेल सोडून ती पण बाजू भाजून घ्या. गरमागरम टॉमेटो आम्लेट लोण्यासोबत सर्व्ह करा.

पडवळ मसाला भाजी

 पडवळ मसाला भाजी: 


साहित्य: अर्धा किलो पडवळ, 1 टेबलस्पून साऊथ इंडियन मसाला, दोन टेबलस्पून ओलं खोबरं, एक टीस्पून साखर, मीठ, दोन टीस्पून तेल, पाव टीस्पून मोहोरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून लाल तिखट, कढीलिंब पाने

कृती: पडवळ धुवुन बिया काढून काचऱ्या करून घ्या. बिया कोवळ्या असतील तर चटका करायला ठेवून द्या. मसाला मी आधी करून ठेवला. कढईत तेल तापत ठेवा. त्यात मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करा. आता पडवळ, कढीलिंबाची पाने घालून परता. झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ येऊ द्या. पडवळ शिजल्यावर त्यात मीठ, साखर, ओलं खोबरं आणि मसाला घालून परतत रहा. बाजूने तेल सुटलं की गॅस बंद करा. 

पोळीबरोबर सर्व्ह करा. 

साऊथ इंडियन भाजीचा मसाला:

 साहित्य: एक कप खोबऱ्याचा किस, दोन टेबलस्पून धने, दोन टेबलस्पून चण्याची डाळ, दोन टेबलस्पून उडीद डाळ, दोन टेबलस्पून तीळ, एक टेबलस्पून जीरं, अर्धा टीस्पून मेथी दाणे, एक टीस्पून मिरी, सात आठ सुक्या मिरच्या, दहा बारा कढीलिंबाची पाने, मीठ 1 टीस्पून

 कृती: सर्व घटक वेगवेगळे भाजून घ्या.  मिक्सर जारमध्ये घालून  बारीक वाटून घ्या.  तयार मसाला बरणीत भरून ठेवा.

मीनल सरदेशपांडे

✍🏻 मीनल सरदेशपांडे

शुक्रवार, १२ मार्च, २०२१

घेवड्याची भाजी

 घेवड्याची भाजी: 


 साहित्य: घेवडा अर्धा किलो, एक टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून ओवा, पाव टीस्पून मोहोरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून लाल तिखट,  हळद पाव टीस्पून, दीड टीस्पून सांडगी मिरची म्हणजे चार मिरच्या तळून बारीक केलेल्या, ओलं खोबरं अर्धी वाटी, गूळ 1 ते दीड टीस्पून, मीठ

कृती: शेंगा दोर काढून सोलून, धुवून वाफवून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. त्यात सांडगी मिरची तळून बाजूला ठेवा.  आता मोहोरी, ओवा, हिंग, हळद, लाल तिखट अशी फोडणी करा. त्यात शेंगा घालून परता. सांडगी मिरची चुरून किंवा मिक्सर जारमध्ये घालून पावडर करा. भाजीत मीठ, गूळ, सांडगी मिरची , ओलं खोबरं घालून नीट परता. गूळ विरघळला की चव बघा काही लागलं तर वाढवा. 

मी परतून करते त्यामुळे पाणी नाही ठेवलं.  दाणे जून असतील तर फोडणीत नीट शिजत नाहीत म्हणून मी वाफवून घेतली. ओलं खोबरं भरपूर छान लागतं. सांडगी मिरचीचा फ्लेवर छान वाटतो भाजीला! 


तुम्ही तुमची पध्द्त शेअर करा☺️ अजून नवीन काही सापडेल!

बुधवार, १० मार्च, २०२१

शेंगदाण्याची आमटी

 शेंगदाण्याची आमटी:


साहित्य: अर्धा कप  दाण्याचं कूट, 1 टेबलस्पून ओलं खोबरं, दोन ओल्या मिरच्या, 4 लवंगा, चार आमसुलं, एक टीस्पून गूळ, एक टीस्पून तूप, पाव टीस्पून जीरं, अर्धा इंच आलं, मीठ, पाणी

कृती: दाण्याचं कूट, खोबरं, मिरच्या, लवंग, आलं सगळं एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून मिक्सर जारमध्ये घालून बारीक पेस्ट करा. ही तयार पेस्ट एका पातेल्यात घ्या. त्यात तुम्हाला दाट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला. मीठ, गूळ, आमसुलं घाला. तूप जिऱ्याची फोडणी घालून आमटी उकळा. चव बघून लागेल ते वाढवा.


टीप: वरील साहित्यातील जे पदार्थ तुम्ही उपासाला खात नाही ते आपापल्या श्रद्धेनुसार वगळा.

वरीच्या भगरी सोबत ही आमटी मस्त लागते.

मीनल सरदेशपांडे

बीट केक

 बीट केक:


साहित्य: 1 मध्यम बीट, अर्धा कप दूध, अर्धा कप दही, 1 कप पिठी साखर,, अर्धा कप तेल,  दीड कप मैदा, 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून खायचा सोडा, 1 टीस्पून व्हीनिगर, चिमूटभर मीठ

कृती: बीट सोलून किसून घ्या. किसात थोडं दूध घालून बारीक पेस्ट करून घ्या.  कुकरची रिंग आणि शिट्टी काढून घ्या. कुकरमध्ये एक वाटी मीठ पसरा. आता मध्यम गॅसवर कुकर  दहा मिनिटं प्रिहिट करायला ठेवा.

एका भांड्यात बीट पेस्ट, तेल पिठीसाखर, दही, व्हॅनिला इसेन्स एकत्र करून फेटून घ्या. मैदा, बेकिंग पावडर, सोडा एकत्र करून चाळणीने चाळून फेटलेल्या मिश्रणात मिक्स करा. एक दिशेने ढवळत रहा, हळूहळू त्यात उरलेलं दूध मिक्स करा. केकच्या भांड्याला तेल लावून घ्या. आता तयार मिश्रणात व्हीनिगर घालून मिश्रण पटापट फेटा आणि केकच्या भांड्यात ओता.  मिठावर स्टीलचा स्टॅण्ड ठेवून त्यावर केकचं भांडं ठेवा.


कुकरचं झाकण लावून दहा मिनिटं मध्यम गॅसवर आणि 35 मिनिटं बारीक गॅसवर केक भाजा. 45 मिनिटांनी झाकण उघडून बघा, सूरी घालून त्याला केक चिकटला नाही की केक तयार!

1 कप = 250ml

✍🏻

मीनल सरदेशपांडे

सोमवार, ८ मार्च, २०२१

मेथी दुधी मसाला

 मेथी दुधी मसाला: 


ही भाजी मी 2010 साली एका गृपवर पोस्ट केली त्यानंतर माझ्याच भाजीच्या फोटोसह ती अनेकांनी ढापली आणि स्वतःची म्हणून एकही शब्द न बदलता तशीच पोस्ट केली. आजही गुगल सर्च केलं तर माझ्या नावाशिवाय ही कृती मिळते. असो☺️ आनंद आहे  आपले प्रयोग इतके यशस्वी झालेत की इतरांना ते चोरावेसे वाटले! तर अशी ही प्रसिद्ध झालेली माझी रेसिपी☺️

साहित्य: एक जुडी मेथी, एक मध्यम दुधी भोपळा, तीन कांदे, दोन टॉमेटो,दहा -बारा लसूण पाकळ्या, एक इंच आले, एक चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट, अर्धी वाटी क्रीम, अर्धी वाटी दही, मीठ,तेल, हळद.

कृती: प्रथम मेथीची पाने खुडून घ्यावीत. धुवून चिरावीत. दुधी भोपळ्याची साले काढून घ्यावीत. त्याच्या आवडीप्रमाणे फोडी कराव्यात. फोडी कुकरमध्ये चाळणीत ठेवून वाफवून घ्याव्यात. कांदे उभे चिरून घ्यावेत. टॉमेटो बारीक चिरावेत. लसूण सोलावी. आले साले काढून घ्यावे. पातेल्यात दोन चमचे तेल तापवावे. तेलात कांदा टाकावा.तो परतल्यावर त्यात लसूण, आले चिरून टाकावे. टॉमेटो घालावा. तेल सुटेपर्यंत परतावे. डिशमध्ये गार करायला ठेवावे. परत पातेल्यात चार चमचे तेल तापत ठेवावे. चिरलेली मेथी तेलावर परतावी. मेथी चांगली परतल्यावर हळद ,तिखट घालावे. परतलेले कांदे,लसूण,आले, टॉमेटो बारीक वाटून घ्यावे. परतलेल्या मेथीमध्ये वाटप घालावे. क्रीम,दही,गरम मसाला घालावा. चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण परतावे. वाफवलेला दुधी भोपळा मिसळावा. तेल सुटेपर्यंत भाजी परतावी. पोळीबरोबर गरमागरम वाढावी.


टीप: दुधी भोपळा न खाणारी मुलेही आवडीने खातात.