कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, २५ एप्रिल, २०२१

पॉट आईस्क्रीम

 पॉट आईस्क्रीम: आमच्या मोठया एकत्र कुटुंबाच्या प्रमाणात आहे.


साहित्य: पाच लीटर दूध, दोन लीटर हापूस आमरस, अर्धा किलो साखर, चवीला मीठ(ऐच्छिक)

कृती: दूध, साखर, आमरस सगळं एकत्र ज्युसर जारमध्ये नीट मिक्स करून घ्या. आईस्क्रीम पॉटमध्ये तयार मिश्रण ओतून त्याचं ब्लेड लावा. झाकण लावून बाजूने  खडेमीठ आणि बर्फ घट्ट थर लावा. अर्धा तास फिरवून घुसळून मग दिवसभर बाजूने सतत मीठ आणि बर्फ घालत रहा! आईस्क्रीम तयार!

आईस्क्रीम पॉट:



मँगो रसमलई

 मँगो रसमलई:


साहित्य: दूध एक लीटर, आंबे चार, साखर तीन टेबलस्पून, बदाम काप, रसगुल्ले

कृती: दूध पसरट कढईत आटवत ठेवा.  बाजूची साय काढून दुधात मिक्स करत रहा पाऊण लीटर झालं की साखर घालून परत आटवत रहा. तुम्हाला हवी तेवढी दाट झाली की गॅस बंद करून गार करत ठेवा. गार झाली की फ्रीजमध्ये ठेवा. आंब्याचा रस काढून मिक्सरमध्ये फिरवून वाटून घ्या. पूर्ण गार झालेल्या बासुंदीत तयार रस मिक्स करा, तयार रसगुल्ले पाक पिळून मग बासुंदीत सोडा.  बदाम कापानी सजवा, गारेगार सर्व्ह करा.


टीप: आटवलेलं दूध पूर्ण गार झाल्याशिवाय आमरस मिक्स करू नका नाहीतर दूध फाटू शकते.

रसगुल्ले कृती माझ्या ब्लॉगवर आहे. अर्धा लीटर दुधाचे 15 ते 16 रसगुल्ले होतात.


गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

मिलेट व्हेज चीज बॉल्स

 मिलेट व्हेज चीज बॉल्स:


साहित्य: १)पाऊण कप नाचणी पीठ,२)पाऊण कप ज्वारी पीठ, 

३)अर्धा कप वरीचा रवा, 

४)पाऊण कप बाजरी पीठ, 

५)अर्धा कप पनीर,  

६)अर्धा कप गाजर किस, 

७)अर्धा कप कांदा बारीक चिरून, ८)अर्धा कप कोथिंबीर, 

९)१ टीस्पून आलं पेस्ट , 

१०)१ टीस्पून लसूण पेस्ट, 

११)१ टीस्पून धने पावडर, 

१२)१ टीस्पून जीरं पावडर, 

१३)मीठ,

 १४)दीड टीस्पून लाल तिखट,  

१५)चीज क्युब्स, 

 १६)अर्धा टीस्पून खायचा सोडा,

 १७) तळणीसाठी तेल, 

 १८) एक टेबलस्पून तीळ

 १९) पनीरचे पाणी


 

 

कृती: 

१)सगळी पिठं आणि रवा एकत्र करून घ्या. 

२)अर्धा लीटर दूध तापवा, गॅस बंद करून त्यात एक टेबलस्पून लिंबू रस आणि तेवढंच पाणी  एकत्र करून घाला, दूध नासून पनीर तयार होईल, हे पनीर  पिठात घाला.  पनीरचे पाणी अतिशय पौष्टिक असते तेच आपण पीठ भिजवायला वापरणार आहोत.

३)कांदा  सोलून बारीक चिरून घ्या. ४)गाजर  धुवून किसून घ्या.  कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या.

५) पिठाच्या मिश्रणात गाजराचा किस घाला. चिरलेला कांदा,  कोथिंबीर घाला.

६) आलं लसूण पेस्ट, धने जीरं पावडर, तीळ, लाल तिखट आणि सोडा घालून नीट एकत्र करा. 


७) चवीनुसार मीठ घाला. 

८) आता थोडं पनीरचे पाणी घालून गोळे होतील इतपत  भिजवा. चव बघून लागेल ते वाढवा.


9) चीजचे छोटे तुकडे करून घ्या. 

10) मिश्रणाचे छोटे बॉल्स करून त्यात मध्ये चीजचा तुकडा ठेवून नीट गोल करा.



14) कढईत तेल तापवा  बॉल्स घालून मध्यम गॅसवर तळा.  तळताना गॅस बारीक ते मध्यम ठेवा म्हणजे नीट आतपर्यंत तळले जातील.

15) तयार बॉल्स चिंच खजुराच्या चटणी सोबत सर्व्ह करा. 


16) हा एक उत्तम  पौष्टिक नाश्ता आहे.

17) यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या, मोड आलेली कडधान्य घालू शकता.

18) तुम्हाला जर वाफवून करायचे असतील तर चीज न घालता वाफवून फोडणीत परतू शकता. चीज घातलं तर वाफावताना फुटून बाहेर येऊ शकते.



सौ. मीनल मंगेश सरदेशपांडे


मंगळवार, २० एप्रिल, २०२१

पोहे बटाटा कटलेट

 पोहे बटाटा कटलेट:


 साहित्य: दोन कप जाड पोहे, दोन मध्यम बटाटे, 1 कप कोबी चिरून, 1 टीस्पून लसूण मिरची पेस्ट, अर्धा टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून जीरं पावडर, मीठ, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, पाणी, लागलं तर पोहे पीठ, तेल

 कृती: पोहे धुवून चाळणीवर निथळत ठेवा. बटाटे शिजवून घ्या. कोबी बारीक चिरून किंवा किसून घ्या. त्यात बटाटे सोलून किसा. धुतलेले पोहे घाला. धने जीरं पावडर, लसूण मिरची पेस्ट, हळद, तिखट घालून मळा. लागलं तर पाणी वापरा.  मला लागलं नाही.सैल वाटलं तर  थोडे पोहे मिक्सरला फिरवून त्याचं पीठ घालून मळा. चव बघून काही हवं तर वाढवा.

 छान मळून कटलेट चपटे गोल किंवा आवडीचे आकार करा.


कढईत तेल तापत ठेवा. बाहेरून कुरकुरीत आतून मऊ अशी छान कटलेट दही चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा. 

 टीप: यात तुम्ही मेथी, कोथिंबीर, पालक घालू शकता. सध्या लॉक डाऊन मुळे घरात उपलब्ध साहित्यात केले.


  दह्यात मीठ, साखर आणि लाल तिखट घालून मी चटणी करते.

  

रविवार, १८ एप्रिल, २०२१

शेवग्याचं लोणचं

शेवग्याचं लोणचं:

साहित्य: पाच शेवग्याच्या शेंगा, तीन टेबलस्पून लोणचं मसाला, 1 टीस्पून लाल तिखट, मीठ 2 टीस्पून, दोन लिंबं, तेल दोन टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, हळद अर्धा टीस्पून
कृती: शेवग्याच्या शेंगा थोडं साल सोलुन  तुकडे करा. त्याला 1 टीस्पून मीठ आणि लोणचं मसाला लावून अर्धा तास मुरत ठेवा. 
कढईत तेल तापवून त्यात मोहोरी, हिंग हळद घालून त्यात मसाल्यासह शेंगा घाला. नीट परतून मंद गॅसवर वाफ येऊ द्या. पंधरा मिनिटं तरी लागतील, मधे मधे परतत रहा. शेंगांचा रंग बदलला की त्यात उरलेलं मीठ, तिखट घालून परता. गॅस बंद करून लिंबाचा रस मिक्स करा.  चव बघून तिखट मीठ लागलं तर वाढवा. एक दिवस मुरू द्या. 
दुसऱ्या दिवशी खायला घ्या. 


शनिवार, १७ एप्रिल, २०२१

पाणीपुरी

  पाणीपुरी 


पाणीपुरी मसाला: 


साहित्य: 1 कप धने, 1 कप जीरं, 2 तुकडे दालचिनी, 8 लवंगा, 15 मिरी, 1 टीस्पून ओवा, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून सुंठ पावडर, 2 टीस्पून शेंदेलोण, 2 टीस्पून पादेलोण, 1 टीस्पून हिंग, 2 टीस्पून आमचूर पावडर, पाव टीस्पून लिंबूफुल

कृती: सगळे मसाले गरम करून घ्या. मीठ पण गरम करा. सगळं मिक्सरवर बारीक करा. चाळणीने चाळा. मसाला हवाबंद बरणीत भरून ठेवा.

लिंबू फुल नसेल तर 2 टीस्पून आमचूर पावडर वाढवा.

पाणीपुरीचे पाणी:

एक लीटर पाण्याला दोन टेबलस्पून चिंच,  अर्धा कप चिरलेला गूळ, चार  ओल्या मिरच्या,   अर्धा कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिना पानं, 1 टीस्पून आलं पेस्ट, दहा बारा बिया काढलेले खजूर हे सगळं मिक्सरला बारीक करून  घ्या. त्यात चवीनुसार मीठ, पाणीपुरी मसाला  4 टीस्पून घाला. चव बघून काही हवं तर वाढवा.


पुऱ्या हल्ली तळायच्या पण मिळतात किंवा तयार पण मिळतात. मस्त चटकदार पाणीपुरीचा आनंद घ्या.


गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

राय आवळ्याचा मेथावळा

 मेथावळा:


साहित्य: 

1 कप  रायआवळ्याचे काप, अर्धा कप गूळ, 1 टीस्पून लाल तिखट, 1टीस्पून मेथी, मीठ, तेल एक टेबलस्पून, मोहोरी अर्धा टीस्पून, हिंग अर्धा टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, पाणी पाव कप

कृती: रायआवळे स्वच्छ धुवा. बी च्या बाजूचे काप चिरून घ्या. तयार काप 1 कप घ्या. कढईत तेल तापत ठेवा. मेथी घाला. जरा रंग बदलला की मोहोरी घाला. ती तडतडली की गॅस बारीक करून हिंग, हळद घाला. परतून घ्या आणि त्यात रायआवळा फोडी घाला. परता आणि पाव कप पाणी घालून दोन मिनिटं वाफ काढा.


आवळा पटकन शिजतो.  आता त्यात गूळ, मीठ, तिखट घालून उकळी काढा. मिश्रण थोडं घट्ट होऊ द्या, कारण आवळ्याचे पाणी सुटून  मिश्रण थोडे सैल होईल. 

चव बघून लागेल ते वाढवा. 

टेस्टी मेथावळा तयार आहे!


शनिवार, १० एप्रिल, २०२१

फुलवडी

 फुलवडी:


गुजराती फरसाण प्रकार खूपच प्रसिद्ध आहेत. त्यातला हा एक प्रकार! 

साहित्य: 

 दोन कप बेसन, पाव कप रवा, 1 टीस्पून भरड धने, 1 टीस्पून भरड मिरी, 1टीस्पून भरड जीरं, 1 टीस्पून ओवा, 2  टीस्पून तीळ, मीठ चवीनुसार, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, 6 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून खायचा सोडा, तळणीसाठी तेल, पाणी, चाट मसाला

 कृती: बेसन, रवा एकत्र करा, त्यात सोडा आणि तेल सोडून सगळं मिक्स करा. सहा टेबलस्पून तेल गरम करा. गरम झालं की गॅस बंद करून त्यात सोडा घाला. ते तेलाचे मोहन पिठात घाला. थोडं थोडं पाणी घेऊन पीठ भिजवा, खूप घट्ट नको, चकली इतपत. 


 अर्धा तास झाकून ठेवा. हाताने लांबट वड्या वळा. तेलात मंद गॅसवर तळून घ्या. 


सगळे तळून झाल्यावर त्यावर चाट मसाला भुरभुरावा. 

 चटपटीत फुलवडी तयार आहे.


कच्च्या टॉमेटोची चटणी

 कच्च्या टॉमेटोची चटणी:


 साहित्य: 

 पाच कच्चे टॉमेटो, दहा बारा कढीलिंबाची पाने, मूठभर कोथिंबीर, पाव कप ओलं खोबरं, चार ओल्या मिरच्या, चार लसूण पाकळ्या, पाव टीस्पून मोहोरी, दोन टीस्पून तेल, चिमूटभर हिंग, सुकी मिरची, मीठ, साखर दीड टीस्पून


 कृती: टॉमेटोचे तुकडे करून घ्या. कढईत अर्धा चमचा तेल घालून त्यात कढीलिंबाची पाने आणि मिरची परता, दोन मिनिटांनी काढून घ्या. आता त्यात परत तेवढंच तेल घालून टॉमेटो च्या फोडी पाच मिनिटं परता, कच्चा वास जायला हवा. टॉमेटो काढून गार करत ठेवा. गार झाल्यावर टॉमेटो, मिरची, कढीलिंब, कोथिंबीर, खोबरं, लसूण, मीठ, साखर घालून बारीक वाटून घ्या. पाणी घालावं लागत नाही. 

 उरलेल्या तेलाची मोहोरी, हिंग, सुकी मिरची आणि चार कढीलिंबाची पाने घालून फोडणी करा, ती या चटणीला द्या. 


 चविष्ट तोंडीलावणं तयार आहे! 

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

मेथांबा

 मेथांबा:


साहित्य: 1 कप कैरीच्या फोडी, 1 कप गूळ, 1टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून मीठ, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग, 1 टीस्पून मेथी, पाव टीस्पून मोहोरी, अर्धा कप पाणी, 1 टेबलस्पून तेल

कृती: कैरी ढिवून सोलून चौकोनी फोडी करा. कढईत तेल तापत ठेवा, त्यात मेथी, मोहोरी घाला. गॅस मंद असू द्या. ती तडतडली की त्यात हळद, हिंग आणि थोडं लाल तिखट घाला. लगेच फोडी घालून परता. त्यात पाणी घालून झाकण ठेवा.


फोडी शिजल्या की मीठ, गूळ, लाल तिखट घालून मिक्स करा.

गूळ विरघळेपर्यंत एक उकळी काढा. गूळ विरघळला की गॅस बंद करा. मस्त चविष्ट तोंडीलावणं तयार!!


मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

मसाला फरसबी

 मसाला फरसबी: 


साहित्य: अर्धा किलो फरसबी, दोन मोठे कांदे, दहा बारा लसूण पाकळ्या, एक इंच आलं, 1 मसाला वेलची, दोन साधी वेलची, दालचिनी तुकडा एक इंच, एक टीस्पून धने, अर्धा टीस्पून जीरं, दोन टेबलस्पून तीळ, 1 टीस्पून लाल तिखट,  अर्धा टीस्पून हळद,  दोन टेबलस्पून तेल, मीठ, 1 टीस्पून साखर, कोथिंबीर बारीक चिरून, 1 टीस्पून आमचूर पावडर   

कृती: फरसबी धुवून चिरून घ्यावी. वाफवून घ्यावी. कांदे सोलून चिरावेत. कढईत धने, जीरं, तीळ, दोन्ही वेलची, दालचिनी हे सर्व मसाले गरम करून घ्यावेत. त्याची पावडर करावी, त्यातच आलं लसूण घालून थोडं पाणी घालून पेस्ट करावी. 

कढईत तेल तापत ठेवावे. त्यात कांदा घालून परतावा. कांदा मऊ झाला की तयार मसाला पेस्ट, मीठ, तिखट, हळद घालून परतावे.


फरसबी घालावी. आमचूर पावडर, साखर घालावी. पाच मिनिटं मंद गॅसवर झाकण ठेवून वाफवावी. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.

शेंगदाणा चटणी

 शेंगदाणा चटणी:


साहित्य: 1 कप(250ml) शेंगदाणे, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून किंवा चवीनुसार मीठ, साखर 1 टीस्पून,  शेंगदाणा तेल दोन टेबलस्पून, आमचूर पावडर अर्धा टीस्पून, चार लसूण पाकळ्या

कृती: एक कढई तापत ठेवा, त्यात तेल घाला. तेलात शेंगदाणे आणि लसूण घालून मध्यम गॅसवर पाच मिनिटं परता.


आता त्यात तिखट, मीठ घालून परतत रहा. पाच मिनिटांनी गार करत ठेवा. त्यात साखर, आमचूर पावडर घालून चटणी बारीक करून घ्या.  खाताना वरून शेंगदाणा तेल किंवा दही घालून घ्या, छान चव येते.

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

उन्हाळी वाळवण: बटाटा किस

 उन्हाळी वाळवण: बटाटा किस


रात्री 2 किलो बटाटे धुवून घ्यावेत. सोलून मोठ्या भोकाच्या किसणीने किसावेत. तीन वेळा किस धुवावा. त्यानंतर अर्धी पातेली पाणी घेऊन त्यात एक टीस्पून तुरटी पावडर घालावी. ती विरघळली की त्यात किस घालून झाकून ठेवावा. सकाळी उठल्यावर एक पातेलीत अर्धी पातेली पाणी उकळावे, त्यात उकळताना तीन चमचे मीठ घालावे. तुरटीत घातलेला किस चाळणीवर काढून तो उकळत्या पाण्यात घालावा. तीन ते चार मिनिटं झाकण ठेवून शिजवावा. गॅस बंद करून किस परत चाळणीवर काढावा. गार होऊ द्यावा. गार झाल्यावर उन्हात वाळत टाकावा. चांगला वाळला की डब्यात भरून ठेवावा. छान पांढरा शुभ्र आणि हलका होतो.

पण फार कमी होतो. 

दोन किलो वाळवून फक्त पाव किलो झाला.

मी याआधी रात्री उकडून ठेवून सकाळी किसून घालत असे, यापध्द्तीने पहिल्यांदा केला, तुमची काही वेगळी पध्द्त असेल तर सांगा तसं करून बघता येईल.

बुधवार, ३१ मार्च, २०२१

दुधीच्या सालींची चटणी

 दुधीच्या सालींची चटणी:


साहित्य: दुधीच्या साली एक कप, अर्धा कप ओलं खोबरं,  दोन टेबलस्पून भाजलेले तीळ, अर्धं लिंबू, एक टीस्पून साखर, एक टीस्पून मीठ, ओल्या मिरच्या पाच, जिरं पावडर किंवा जिरं अर्धा टीस्पून, लसूण चार पाकळ्या(ऐच्छिक), तेल एक टीस्पून

कृती: भाजीसाठी आणलेला दुधी सोलून साली एकत्र करा.  तेलावर  मिरच्यांचे तुकडे आणि सालींचे तुकडे परतत ठेवा, दहा मिनिटं परतून गॅस बंद करा. 


दुधीच्या सालीत ओलं खोबरं, मीठ, साखर ,  भाजलेले तीळ, जिरं पावडर एकत्र करा, लिंबू पिळा. आता थोडे थोडे मिक्सरला लागेल तेवढेच पाणी घालून वाटा. चवीनुसार लागेल ते वाढवा.

मस्त पौष्टिक आणि चविष्ट चटणी तयार आहे!

टीप: लसूण घालणार असाल तर चटणी वाटताना घाला.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

मंगळवार, ३० मार्च, २०२१

लेमन आईस टी

 काय मंडळी उन्हाळा स्पेशल पेय रेसिपी देतेय वेगवेगळ्या आवडतायत ना? काही आवडतील काही कोणाला न चालणाऱ्या पण असतील.तरीही ज्या आवडतील त्या नक्की करून बघा, आणि उन्हाळा सुसह्य करा.

 ज्यांना चहा आवडतो त्याना ही रेसिपी नक्की आवडेल. बाहेर जाऊन पिण्या पेक्षा घरीच सोप्या पद्धतीने झटपट चहा नक्की करून बघा.

 

लेमन आईस टी: 


साहित्य: चार ग्लास आईस टी साठी

चार ग्लास पाणी, दोन लिंबं, 1 टीस्पून चहा पावडर,  आठ टीस्पून साखर, बर्फाचे खडे

कृती:  अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यात चार टीस्पून  साखर 1 टीस्पून  चहा पावडर घालून उकळी काढून गाळून घ्या. पूर्ण गार करा. त्यात गार झाल्यावर उरलेलं सगळं गार पाणी घाला, साखर घाला, लिंबू पिळा. 

चव बघून लागली तर साखर वाढवा.

गारेगार करून बर्फाचे खडे घालून सर्व्ह करा. 



कलिंगडाचे सरबत

 कलिंगडाचे सरबत:


साहित्य: 1 कप कलिंगडाच्या फोडी, 1 कप गार पाणी, 1 लिंबू, काळं मीठ, पुदिना पानं पाच सहा, साखर लागल्यास

कृती: कलिंगडाच्या बिया काढून फोडी करा. ज्युसर जार मध्ये कलिंगडाच्या फोडी, एक लिंबाचा रस,  पुदिना,अर्धा टीस्पून काळं मीठ घालून फिरवा. पाणी घालून परत एकदा फिरवा. गाळून घ्या. चव बघून लागली तर साखर घाला.

सोमवार, २९ मार्च, २०२१

चिंचेचे सरबत

 चिंच गुळाचे सरबत:


साहित्य: एक कप गूळ, अर्धा कप साखर, तीन टेबलस्पून चिंचेचा कोळ, जीरं पावडर 1 टीस्पून, धने पावडर अर्धा टीस्पून, काळं मीठ 1 टीस्पून, साधं मीठ चवीनुसार

कृती:  साखर आणि गुळात एक कप पाणी घालून दोन तारी पाक करा. गॅस बंद करून त्यात चिंचेचा कोळ, जीरं पावडर, काळं मीठ, धने पावडर मिक्स करा. मिश्रण गार झालं की फ्रीजमध्ये ठेवा. सरबत करताना एक ग्लास थंड पाणी घेऊन त्यात दीड टेबलस्पून तयार मिश्रण घाला. लागलं तर साधं मीठ घाला. बर्फ घालून गारेगार सर्व्ह करा.


टीप: चिंचेच्या आंबट पणावर गुळाचे प्रमाण कमीजास्त करा.

शनिवार, २७ मार्च, २०२१

पपई मिल्कशेक

पपई/पपया मिल्कशेक:

साहित्य: पपयाच्या फोडी 1 कप, गार दूध 2 कप, साखर 4 टीस्पून, वेलची पावडर चिमूटभर, बर्फाचे खडे

कृती: पपया साल आणि बिया काढून फोडी करा. ज्युसर जार मध्ये पपया च्या फोडी, दूध, साखर आणि वेलची पावडर एकत्र करा. मऊ होईपर्यंत फिरवा. बर्फ घालून गारेगार सर्व्ह करा.


काकडी कैरी/लिंबू सरबत:

 काकडी कैरी/लिंबू सरबत:


साहित्य: 

काकडी दोन, दोन टेबलस्पून कैरी किस किंवा दोन लिंबाचा रस, अर्धा टीस्पून काळं मीठ, अर्धा टीस्पून जीरं पावडर, थोडीशी कोथिंबीर किंवा पुदिना, सहा टीस्पून साखर, साधं मीठ पाव टीस्पून, आलं अर्धा इंच तुकडा, पाणी 1 लीटर

कृती: काकडी सोलून तुकडे करा. एक कैरी किसून घ्या किंवा दोन लिंबाचा रस काढा. आलं सोलून घ्या. ज्युसर जार मध्ये काकडी तुकडे, कैरी किस किंवा लिंबू रस, साखर,दोन्ही मीठ, आलं, जीरं पावडर, दहा बारा पानं कोथिंबीर किंवा पुदिना घाला. एक ग्लास पाणी घाला, आणि सगळं मिश्रण बारीक होईपर्यंत फिरवा. एक भांड्यात घालून उरलेलं पाणी घाला. चव बघून काही हवं तर वाढवा. 


टीप: मला यात पुढे साखर नाही आवडत तुम्हाला हवी तर वाढवा.