कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

मटार रवा आप्पे

 मटार रवा आप्पे:




सध्या मटार भरपूर येतायत त्यामुळे प्रत्येक पदार्थात घालायचा मोह आवरत नाही!

साहित्य: 1 कप मटार, 2 कप रवा, अर्धा कप तांदूळ पीठ किंवा आंबोळी पीठ( याची कृती मी गृपवर आधी दिलीय.), आलं लसूण पेस्ट 1 टीस्पून, मिरच्या 4,  कोथिंबीर मूठभर, कढीलिंब पाने 10, दही 1 कप, पाणी , मीठ, खायचा सोडा अर्धा टीस्पून



कृती: मटार, कोथिंबीर, मिरच्या, आलं लसूण आणि कढीलिंब पाने सर्व एकत्र करून थोडं पाणी घालून मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्यावे. त्यात रवा, तांदूळ पीठ, मीठ, दही घालून मिक्स करावे. पाणी घालून इडली पिठा इतपत करावे. चव बघून काही हवं असेल तर वाढवावे. शेवटी सोडा घालून नीट मिक्स करावे.


आप्पेपात्रात दोन्ही बाजू तेल घालून भाजून घ्यावे.


चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे.


#मटार

#आप्पे

#शाकाहारी

#स्नॅक्स


✍🏻 मीनल सरदेशपांडे

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

सुंठ गोळी

 सुंठ गोळी:


काय मंडळी जोरदार थंडी सुरू झालीय ना? अशा वेळी हमखास उपयोगी अगदी सोपी अशी औषधी सुंठ गोळी करून ठेवा, सर्दी खोकला लांब पळून जाईल! 

साहित्य:  पाऊण कप सुंठ पावडर( 50 ग्रॅम),   सव्वा कप गूळ, एक टेबलस्पून हळद, अर्धा टीस्पून मिरी पावडर, साजूक तूप दोन/तीन टीस्पून


कृती: गूळ बारीक चिरून मिक्सरला फिरवून घ्या. त्यात सुंठ पावडर, हळद, मिरी पावडर आणि दोन टीस्पून तूप घालून परत एकदा मिक्सरला फिरवा. गोळी करण्या इतपत मिश्रण झालं का ते एक गोळी करून पहा, कोरडं वाटलं तर अजून तूप घाला.  छोट्या गोळ्या करा.

घरच्या घरी  झटपट औषधी गोळी तयार! 

✍🏻 मीनल सरदेशपांडे

शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

फोडणीची मिरची

 फोडणीची मिरची: 



साहित्य:  

1 किलो जून मिरच्या, पाव किलो मोहोरी, 200 ग्रॅम मीठ( 1 वाटी), मेथी 1 टेबलस्पून, हिंग पावडर 2 टेबलस्पून, हळद 2 टेबलस्पून, मोहोरी फोडणीसाठी 2 टीस्पून, लिंबं मोठी 8, तेल पाव लीटर


कृती: मिरच्या धुवून पुसून कोरड्या करून घ्या. लिंबं धुवून पुसून घ्या, त्याचा रस काढून घ्या. मीठ कढईत गरम करून गार करत ठेवा. मिरच्यांचे तुकडे करून घ्या. मेथी जरा गरम करून पावडर करा. मिरच्यांमध्ये मीठ, लिंबू रस, एक टेबलस्पून हळद आणि 2 टेबलस्पून तेल घालून ठेवा. उरलेल्या तेलाची फोडणी करताना तेल तापल्यावर  दोन टीस्पून मोहोरी घाला, ती तडतडली की गॅस बंद करून हिंग पावडर, हळद, मेथी पावडर घाला. फोडणी गार करत ठेवा. पाव किलो मोहोरीची पावडर करून ती मिरच्यांत मिसळा.  गार फोडणी मिसळा. चार दिवस स्टीलच्या पातेलीत ठेवा, अधूनमधून ढवळत रहा. चार दिवसांनी काचेच्या बरणीत भरून ठेवा.


✍🏻 मीनल सरदेशपांडे

छोले

 छोले:


साहित्य: पाव किलो काबुली चणे, चार कांदे, तीन टॉमेटो, अर्धा टीस्पून काळं पांढरं मीठ, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून छोले मसाला, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून काश्मिरी लाल तिखट, अर्धा टीस्पून आलं पेस्ट, अर्धा टीस्पून लसूण पेस्ट, मूठभर पुदिना, 2 टेबलस्पून साजूक तूप किंवा तेल, 4 मसाला वेलच्या, दोन तुकडे दालचिनी, 1 तमालपत्र, साधे मीठ, चिमूटभर सोडा, पाव टीस्पून हळद, पाणी, कोथिंबीर

कृती: काबुली चणे रात्री भिजत घालावेत. सकाळी त्यात चिमूटभर सोडा , काळं पांढरं मीठ, हळद, तमालपत्र घालून शिजवून घ्यावेत. कांदे चिरून घ्यावेत. टॉमेटो प्युरी करावी. पुदिना धुवून चिरून घ्यावा. कढईत तूप घालावे. तूप तापले की वेलची, दालचिनी घालून परतावे. आता कांदा, आलं लसूण पेस्ट घालावी. टॉमेटो प्युरी घालावी, छोले मसाला, लाल तिखट, काश्मिरी तिखट घालून तूप सुटेपर्यंत परतत रहावे.


शिजलेल्या चण्यांपैकी वाटीभर बाजूला ठेवून बाकीचे कढईत घालावेत. साधे मीठ, आमचूर, पुदिना घालावा. बाजूला ठेवलेले चणे अर्धवट वाटून त्यात मिक्स करावे. लागेल तसे पाणी घालावे. उकळी आली की चव बघून लागेल ते वाढवावे. 

कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

रविवार, १३ डिसेंबर, २०२०

गरम मसाला आमटी

 गरम मसाला आमटी: 


कोकणात  कोणताही उत्सव, लग्न कार्य याची समाप्ती गरम मसाला आमटी आणि भात याने होते. झणझणीत गरम मसाला आमटी खाताना नाका डोळ्यातून पाणी येते. 

साहित्य: अर्धा कप मसूर डाळ किंवा तूरडाळ, सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी, कांदे 4, लसूण दहा पाकळ्या, मिरी 6, लवंग 6, दालचिनी एक इंच,  1 तमालपत्र, अर्धा टीस्पून बडीशेप, अर्धा टीस्पून धने, तीन वेलदोडे, बटाटा 1, कोथिंबीर, पाणी, तेल दीड टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून, जीरं पाव टीस्पून, हळद पाव टीस्पून, लाल तिखट 1 टीस्पून, चिंचेचा कोळ अर्धा टीस्पून, मीठ.

कृती: डाळ स्वच्छ धुवून त्यात दुप्पट पाणी आणि थोडी हळद घालून शिजवून घ्यावी. 2 कांदे सोलून बारीक चिरून घ्यावे.  बटाटा सोलून फोडी करून घ्या. 2 कांदे गॅसवर जाळी ठेवून भाजून घ्यावे. खोबरं पण गॅसवर भाजून घ्यावे.  छोट्या कढल्यात अर्धा टेबलस्पून तेल गरम करावे. गॅस बारीक करून त्यात लवंग, दालचिनी, मिरी, धने, लसूण, बडीशेप, वेलदोडे  सर्व परतावे. गार करत ठेवावे. खोबऱ्याचे तुकडे करून घ्यावे. भाजलेले कांदे सोलून कापून घ्यावे. सर्व मसाला, कांदा, खोबरं मिक्सरमध्ये वाटून घ्या. लागेल तसं पाणी घालून वाटा.


कढईत एक टेबलस्पून तेल तापत ठेवा.  तेल तापलं की त्यात मोहोरी, जीरं घाला ते तडतडल्यावर त्यात तमालपत्र तुकडे चिरलेला कांदा, बटाटा घालून परता. बटाटा शिजला की हळद, तिखट घालून परता. आता त्यात तयार वाटप घालून परता. डाळ घोटून घ्या, त्यात पाणी घालून कढईत मिक्स करा.  मीठ घाला, अर्धा टीस्पून चिंचेचा कोळ घाला. तुम्हाला पातळ हवी असेल त्या प्रमाणात पाणी घाला. उकळी येऊ द्या. कोथिंबीर घालून  गरमागरम भाताबरोबर किंवा  ब्रेड बरोबर फस्त करा.

टीप: आमच्याकडे यात बटाटा आवडत नाही.

माझ्या मैत्रिणीने सांगितल्या प्रमाणे मी आज वेलदोडे घातले ती चव छान वाटली.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

आवळ्याचा छुन्दा

 आवळ्याचा छुन्दा


 छुन्दा हे गुजरात मधील प्रसिद्ध चविष्ट लोणचं आहे. मुख्यतः ते उन्हात ठेवून करतात पण तुम्ही गॅसवर सुद्धा करू शकता.

साहित्य: 2 कप आवळ्याचा कीस, अडीच कप गूळ, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून जीरं पावडर, चार तुकडे दालचिनी, 10/12 लवंगा

कृती: आवळे स्वच्छ धुवा,  पुसून किसून घ्या. मला 2 कप व्हायला अर्धा की लागले. स्टेनलेस स्टीलच्या कोरड्या पातेल्यात कीस काढा. त्यात  गूळ आणि मीठ मिक्स करा. नीट ढवळून पातेल्याला वर पातळ कॉटन कापड बांधा. तासाभराने पातेलं उन्हात ठेवा. चार दिवस उन्हात ठेवावं लागेल. ठेवण्यापूर्वी रोज कोरड्या चमच्याने ढवळा. पाचव्या दिवशी तिखट, जीरं पावडर, लवंगा, दालचिनी तुकडे घालून ढवळुन परत फडका बांधून एक दिवस उन्हात ठेवा. गार झाल्यावर बघा एक तारी पाक झालेला दिसेल. आता काचेच्या बरणीत भरून ठेवा.


उन्हात ठेवणं शक्य नसेल तर गूळ, आवळा किस आणि मीठ एकत्र करून तासभर ठेवा. तासाभराने गॅसवर ठेवून उकळा. एक तारी पाक दिसू लागला की गॅस बंद करून तिखट, जीरं पावडर, लवंगा, दालचिनी घालून ठेवा. गार झाला की काचेच्या बरणीत ठेवा. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही.


✍🏻मिनल सरदेशपांडे

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

कांदा ओवा कुरकुरीत खेकडा भाजी

 कांदा ओवा कुरकुरीत खेकडा भजी: 


साहित्य: दोन कप पातळ उभा चिरलेला कांदा, 1 कप लांब चिरलेली ओवा पाने, 1 टीस्पून लाल तिखट,  1 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची,मीठ, ओवा 1 टीस्पून, हळद पाव टीस्पून, बेसन एक ते सव्वा कप, तळण्यासाठी तेल.

कृती: कांदे सोलून लांब उभे पातळ चिरून घ्या. ओव्याची पानं धुवून लांब चिरून घ्या. कांदा आणि ओव्याची पानं एकत्र करून त्यात मीठ चवीनुसार आणि लाल तिखट, हळद घालून मिक्स करून दहा मिनिटं झाकून ठेवा. दहा मिनिटांनी कांद्याला पाणी सुटेल. मग त्यात मिरचीचे तुकडे, ओवा आणि लागेल तसं बेसन मिसळा. 


कढईत तेल गरम करत ठेवा. छोटी भजी तेलात सोडून दोन्ही बाजूने कुरकुरीत तळून घ्या.


गरमागरम भजी सर्व्ह करा. 

✍🏻 मीनल सरदेशपांडे

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

मुगडाळीचा चटका

 मुगडाळीचा चटका:


साहित्य: मूगडाळ पाव कप, दही एक कप, तीन ओल्या मिरच्या, कोथिंबीर मूठभर, तूप एक टीस्पून, जीरं पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, मीठ, साखर एक टीस्पून

कृती: मूगडाळ धुवून गरम पाण्यात भिजत घाला. दोन तास भिजू द्या. भिजल्यावर पाणी काढून वाटून घ्या. मिरच्या वाटून घ्या. तुपाची हिंग, जीरं घालून फोडणी करा. वाटलेल्या डाळीत, मीठ, साखर, दही, फोडणी, चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. चवीनुसार लागेल ते वाढवा. मस्त डावी बाजू तयार आहे!

टीप: हा चटका मिक्स डाळींचा पण छान लागतो, थोडा सणसणीत हवा.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

ब्रेड रोल

 ब्रेड रोल:  


अर्धा की बटाटे, अर्धा टीस्पून मिरची वाटून, पाव टीस्पून आलं पेस्ट, पाव टीस्पून लसूण पेस्ट, मीठ, फोडणी साठी तेल दोन टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट पाव टीस्पून, कोथिंबीर पाव कप, प चिरलेली, तळायला तेल, एक स्लाईस ब्रेड पॅक, पाणी


कृती: शिजलेले बटाटे सोलून  बारीक फोडी करा. आलं, लसूण मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, मीठ त्या फोडीना नीट लावून घ्या. कढईत तेल तापत ठेवा,  मोहोरी, हिंग हळद घालून फोडणी करा. तिखट घाला. गॅस बारीक करून त्यात तयार फोडी घालून परता. पाच मिनिटं मंद गॅसवर ठेवा. चव बघून तिखट मीठ वाढवा. 

भाजी गार होऊ द्या. 

 भाजीचे  मुटक्यासारखे आकार करून घ्या


. स्लाईसच्या कडा कापून घ्या. 

पसरट भांड्यात पाणी घ्या. त्यात स्लाईस बुडवून त्यातलं पाणी हातावर प्रेस करून काढून टाका. त्यात मुटका ठेवून दाबून लंबगोल आकार द्या.

कढईत तेल तापत ठेवा. त्यात तयार रोल सोडून तळून घ्या. सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.


✍🏻  मीनल सरदेशपांडे

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

मटार पनीर

 मटार पनीर: 


साहित्य: एक कप मटार, 200 ग्रॅम पनीर, एक मोठा कांदा, 3 टॉमेटो, 7/8 लसूण पाकळ्या, 7/8 काजूगर, एक इंच आलं तुकडा, एक टीस्पून काश्मिरी लाल तिखट, अर्धा टीस्पून लाल तिखट नेहमीचं, एक टीस्पून गरम मसाला, एक टेबलस्पून  सायीचं दही, तेल दोन टेबलस्पून, जीरं पाव टीस्पून, मीठ चवीनुसार, साखर एक टीस्पून

कृती: मटार थोडं मीठ आणि पाणी घालून वाफवून घ्या, शिजले पाहिजेत पण मोडायला नको. 

पनीर तुकडे करून घ्यावे. कांदा, टॉमेटो लांब चिरून घ्यावे. आलं लसूण सोलून घ्यावे, आल्याचे तुकडे करावे. कढईत एक टेबलस्पून तेल घालून त्यात आधी काजूगर तळून बाजूला काढून घ्यावे. आता त्यात कांदा आलं लसूण घालून परतावे. कांदा मऊ झाला की त्यात टॉमेटो घालून परतावे. टॉमेटो मऊ झाला की त्यात गरम मसाला घालून मिश्रण गार करत ठेवावे. मिक्सर जार मध्ये आधी काजूगर फिरवून घ्यावे. त्यातच तयार कांदा टॉमेटो मिश्रण घालून थोडे पाणी घालून गुळगुळीत वाटावे. कढईत एक टेबलस्पून तेल घालून त्यात जीरं घालावं ते तडतडल्यावर वाटप घालावे. तेल सुटेपर्यंत परतत रहावे.


पनिरला थोडं मीठ आणि तिखट लावून ठेवावे. मसाला छान परतला गेला की त्यात काश्मिरी लाल तिखट, नेहमीचं लाल तिखट, मीठ घालून मिक्स करावे. सायीचं दही घालावे. लक्षात ठेवा मीठ आपण मटार  शिजताना पण घातलंय आणि पनिरला पण लावलंय. थोडं साधारण अर्धा कप पाणी घालावे. शिजलेले मटार आणि मॅरीनेट केलेलं पनीर घालून एक उकळी काढावी. साखर घालावी. चव बघून लागेल ते वाढवावे. 

गरमागरम मटार पनीर पोळी, पुरी, नान बरोबर सर्व्ह करावे.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

चकली कृती: भाजणी सहित

 चकली:


 भाजणी:


साहित्य: 1 की तांदूळ, अर्धा की चणाडाळ, पाव की उडीद डाळ, एक वाटी पोहे, एक वाटी साबुदाणा, अर्धी वाटी जीरे, धने एक वाटी

कृती: तांदूळ धुवून सावलीत वाळवावेत. तांदूळ आणि बाकी सर्व साहित्य एकेक करून मध्यम गॅसवर भाजावे. खूप जास्त  भाजू नये. सर्व गोष्टी एकत्र करून बारीक दळावे.


चकली साठी साहित्य:  भाजणी पीठ 1 की, दोन कप पाणी, अर्धा कप तेल, 3 टेबलस्पून तिखट, 5 टीस्पून मीठ, 2 टीस्पून ओवा किंचित भरडून, 2 टीस्पून पांढरे तीळ, तळणीसाठी तेल

कृती: पाणी आणि तेल एका पातेल्यात एकत्र करावे. त्यात तिखट, मीठ, ओवा घालून उकळी काढा.  उकळी आली की गॅस बंद करून त्यात भाजणी आणि तीळ मिक्स करून झाकून ठेवा. दहा मिनिटांनी पीठ लागेल तसं पाणी घेऊन मळा, फार सैल नको. मी फूड प्रोसेसर मध्ये मळून घेते.

तयार गोळा सोऱ्यात भरून चकली जाड प्लॅस्टिक पिशवीवर पाडा. कढईत तेल गरम करून घ्या. मध्यम आचेवर चकल्या तळा. 

मस्त कुरकुरीत चकल्या तयार आहेत.

 टीप: मी हळद नाही घालत तुम्ही हवी तर घाला.

एक किलोत 60 ते 70 चकल्या होतात.

चकलीचं पीठ व्यवस्थित मळून घेतलं की चकल्या छान होतात. 

गॅस सतत लहान मोठा करत बसू नका. त्यामुळे तेलाचा ताव कमी जास्त होतो आणि चकली बिघडते.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२०

लाल माठ पराठा

 लाल माठ पराठा:


साहित्य: पाच वाट्या कणिक, अर्धी वाटी तांदूळ पीठ, अर्धी वाटी बेसन, लाल तिखट 1 टीस्पून, मीठ ,हळद पाव टीस्पून, दोन टेबलस्पून तेल,  लाल माठ एक जुडी, (शिजून एक कप होईल) अर्धा चमचा लसूण पेस्ट

कृती: लाल माठ निवडून स्वच्छ धुवून घ्यावा. बारीक चिरावा, शिजवून घ्यावा. कणिक, तांदूळ पिठी, बेसन एकत्र करावं. त्यात तिखट, मीठ, हळद घालावी. तेल घालावे. शिजलेला माठ आणि लसूण पेस्ट मिक्स करून , चव बघून पीठ घट्ट मळावे.


या पिठाचे पोळीसारखे लाटून पराठे करा किंवा पुऱ्या करा.

दोन्ही छान लागते. लाल माठ पराठा भाजताना मध्यम आचेवर भाजा, मुळात लाल रंग असल्याने पटकन काळे डाग पडायची शक्यता असते.

चटणी, सॉस, लोणी कशाही बरोबर मस्तच लागतात. त्यानिमित्ताने लाल माठ खाल्ला जातो!!

मिनल सरदेशपांडे

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

पातळ अळू

 पातळ अळू किंवा अळवाचं फतफतं:




साहित्य: 

एक कप शिजलेलं अळू, अर्धा कप शिजलेली देठी, दोन टेबलस्पून डाळीचं पीठ, एक टीस्पून गोडा मसाला, एक टीस्पून सांडगी मिरची पावडर, अर्धा टीस्पून लाल तिखट, एक टेबलस्पून चिंचेचा कोळ, एक टेबलस्पून गूळ, मीठ, दोन टेबलस्पून शेंगदाणे, आवडीनुसार काजूगर, एक टेबलस्पून चणाडाळ, पाच सहा सुक्या मिरच्या, पाव टीस्पून मेथी दाणे, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, पाणी दीड लीटर, एक टेबलस्पून ओलं खोबरं, तेल एक टेबलस्पून

कृती:  शेंगदाणे आणि चणाडाळ तीन तास भिजत ठेवा.अळूची पानं शिरा काढून धुवून घ्या. चिरून शिजवून घ्या. देठी सोलून चिरून वेगळी शिजत ठेवा. गार होऊ द्या. भिजलेले शेंगदाणे आणि चणाडाळ शिजवून घ्या.  काजूगर हवे असतील तर ते गरम पाण्यात भिजत घाला. अळूची पानं मिक्सरला थोडं फिरवा( गरज असेल तर). चिंचेचा कोळ काढून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. दोन सांडगी मिरच्या तळून बाजूला ठेवा. तेलात मोहोरी घाला. तडतडली की मेथी दाणे, लाल मिरच्या घाला. हिंग, हळद आणि लाल तिखट घाला. आता फिरवून घेतलेली पानं आणि शिजलेली देठी घालून परता. एक लिटर पाणी घ्या. त्यात डाळीचं पीठ नीट मिक्स करा, गुठळ्या राहू देऊ नका. हे पाणी कढईत घाला. चवीनुसार मीठ, गूळ, चिंचेचा कोळ घाला. सांडगी मिरची मिक्सरमधून बारीक करून ती घाला. गोडा मसाला घाला. उरलेलं पाणी अंदाज बघून घाला.  शिजलेले डाळ दाणे घाला.  भिजलेले काजूगर घाला. ओलं खोबरं घालून उकळी काढा. चव बघून लागेल ते वाढवा.  पातळ अळू तयार! 



वरून  सुक्या मिरच्यांची फोडणी दिली तर अजून खमंग लागते.

✍🏻मीनल सरदेशपांडे

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

मूगडाळ हलवा

 मुगडाळीचा झटपट हलवा: 


मूगडाळ भिजवून केलेला हलवा फार सुंदर होतो पण मी आत्ता सांगतेय त्या पध्दतीने झटपट होतो आणि लागतोही तसाच चविष्ट!

साहित्य: मूगडाळ 1 कप, साखर सव्वा कप, खवा अर्धा कप, तूप 1 कप, दूध दीड कप, वेलची पावडर, बदाम, काजू तुकडे, मीठ चवीला

कृती: एक कप मूगडाळ मध्यम आचेवर एकसारखी भाजून घ्या. गार झाल्यावर रवाळ दळून घ्या. कढईत  पाऊण कप तूप घाला. त्यात दळलेली मूगडाळ घालून खमंग भाजून घ्या. मूगडाळ भाजत आली की त्यात काजू बदाम तुकडे घालून दोन मिनिटं परता. आता त्यात हळूहळू दूध घालत ढवळत रहा. पाच मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून वाफ काढा. तोपर्यंत साखर मोजून घ्या, खवा गुठळी मोडून घ्या. वाफ आली की त्यात साखर, खवा, वेलची पावडर, चवीला मीठ हे सर्व घालून मिक्स करा. आता उरलेलं तूप घाला आणि परत मंद आचेवर पाच मिनिटं ठेवा. साखर पूर्ण विरघळली आणि बाजूला तूप सुटले की हलवा तयार!

टीप: साखर तुम्हाला हवी तर कमी घालू शकता पण खवा असल्याने तेवढी लागते.

भिजवलेली डाळ भाजायला लागणाऱ्या वेळेपेक्षा यासाठी खूप कमी वेळ लागतो.

तुम्हाला जास्त तूप नको असेल तर पाऊण कप पहिलं घालतो तेवढं घाला परत वरून उरलेलं घालू नका. 


✍🏻 मीनल सरदेशपांडे

कटवडा

 कट वडा: 


साहित्य:

कटासाठी: सुकं खोबरं किस 1 कप, कांदे तीन मध्यम, 10 लसूण पाकळ्या, 6 लवंगा, 10मिरी, अर्धा  इंच दालचिनी, आलं एक इंच, पाव कप तेल, काश्मिरी लाल तिखट अर्धा टीस्पून, नेहमीचं लाल तिखट अर्धा टीस्पून, सुक्या मिरच्या चार, मीठ, पाणी

वड्यासाठी: अर्धा की बटाटे, अर्धा टीस्पून मिरची वाटून, पाव टीस्पून आलं पेस्ट, पाव टीस्पून लसूण पेस्ट, मीठ, फोडणी साठी तेल दोन टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट पाव टीस्पून, कोथिंबीर पाव कप चिरलेली, तळायला तेल

पारीसाठी: बेसन 1 कप, 1 टीस्पून रवा, 1 टीस्पून लाल तिखट, मीठ, ओवा एक टीस्पून, हळद पाव टीस्पून, चिमूटभर खायचा सोडा, पाणी

कटवडा सर्व्ह करताना: दोन लिंबं, कोथिंबीर अर्धा कप, बारीक चिरलेला कांदा  1 कप, पिवळी शेव पाव की

कृती: बटाटे धुवून उकडत लावा.

खोबरं किसून भाजून घ्या. बाजूला ठेवा.

कांदा उभा लांब चिरून घ्या. लसूण सोलून घ्या. 

कढईत दोन टेबलस्पून तेल घ्या. त्यात मिरी, दालचिनी लवंग परतून घ्या, बाजूला ठेवा.

आता त्यात आलं सोलून त्याच्या चकत्या, लसूण, सुकी मिरची आणि कांदा परता. तांबूस होऊ द्या.


आधी लवंग, दालचिनी, मिरी बारीक करून घ्या.  आता तयार गरम मसाला,  खोबरं, कांदा मिश्रण थोडं लागेल तसं पाणी घालून वाटून घ्या.


पातेल्यात एक ली पाणी गरम करायला ठेवा. कढईत तेल तापत ठेवा. तेल तापलं की गॅस बारीक करून त्यात काश्मिरी आणि साधं दोन्ही तिखट घाला

लगेच त्यात गरम पाणी घाला. आता तयार वाटप त्यात मिसळा. मीठ घाला. गरजेनुसार लागल्यास पाणी घाला, उकळी काढा. तिखटपणा बघून लागलं तर तिखट वाढवा.

कट तयार आहे!


शिजलेले बटाटे सोलून  बारीक फोडी करा. आलं, लसूण मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, मीठ त्या फोडीना नीट लावून घ्या.


कढईत तेल तापत ठेवा,  मोहोरी, हिंग हळद घालून फोडणी करा. तिखट घाला. गॅस बारीक करून त्यात तयार फोडी घालून परता. पाच मिनिटं मंद गॅसवर ठेवा. चव बघून तिखट मीठ वाढवा. 

भाजी गार होऊ द्या. 


तोपर्यंत पारीसाठी बेसन, रवा, मीठ, ओवा, हळद, तिखट एकत्र करा, थोडं थोडं पाणी घालून वड्याला कव्हर होईल इतपत भिजवा.  अर्धा तास झाकून ठेवा. 


भाजीचे आपल्या आवडीनुसार वड्याचे आकार करून घ्या.


कढईत तेल तापत ठेवा.  पिठात सोडा घाला. तयार वडा पिठात बुडवून अलगद तेलात सोडून दोन्ही बाजूने छान तळून घ्या


.

कटवडा सर्व्ह करताना   प्रथम डिशमध्ये वडा त्यावर गरम कट  त्यानंतर कांदा, कोथिंबीर, शेव घालून सोबत लिंबाची फोड देऊन सर्व्ह करा!


टीप: कोणी यासोबत पाव पण घेतात.

साधारणपणे अर्धा किलोत बारा तेरा वडे होतात. 

तीन माणसांना पोटभरीचा कटवडा या प्रमाणात होईल.

माझ्याकडे 15 माणसांच्या प्रमाणात करते त्यातून कमी करून हे प्रमाण लिहायचा प्रयत्न केलाय, तुम्ही तुमच्या प्रमाणात यात बदल करू शकता.

✍🏻 मीनल सरदेशपांडे