कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

मुगाचे थालिपीठ

 मुगाचे थालिपीठ:

#पौष्टिक 

#नाश्ता 

नमस्कार मंडळी, 

लहानपणी डाळिंब्या आमटी किंवा उसळ असेल तर मुद्दाम दुसऱ्या दिवशी त्यात भाजणी घालून थालिपीठ करायची आजी ते पण पातेल्यात, इतकं छान खमंग लागायचं ते... मधेच येणारी डाळिंबी, त्या उसळीने वेगळीच हवीहवीशी चव यायची त्याला. काल अशीच मुगाची उसळ उरली आणि या थालीपीठाची आठवण झाली. 

काल प्रत्येक जण खाताना म्हणत होतं आज थालिपीठ मस्तच झालय खुसखुशीत अगदी😄 तुम्हाला शिळी उसळ नसेल तर म्हणून शिजवून मूग रेसिपी दिलीय. त्याच्या पाण्यातच पीठ भिजवायचे.

 


साहित्य: दोन वाट्या शिजलेले मूग, दोन वाट्या थालिपीठ भाजणी, तिखट, मीठ, हळद, कांदे दोन बारीक चिरून, पाणी गरजेनुसार


कृती: मूग भिजवून शिजवून घ्या. त्यात चवीनुसार तिखट, मीठ, हळद आणि कांदा घाला. सगळं नीट मिक्स करून मावेल तेवढी भाजणी घाला. 

मला यात पाणी लागले नाही अजिबात.

आता थालिपीठ थापून दोन्ही बाजूंना तेल सोडून खमंग भाजून घ्या.


लोणी, दही याबरोबर सर्व्ह करा.

केळीचे पान जसे होते तसे थापल्याने 

त्याच आकारात झालेय थालिपीठ!

✍️ मीनल सरदेशपांडे

मुगडाळ पीठ गुळपापडी:

 मुगडाळ पीठ गुळपापडी:



#पारंपरिक 

#पौष्टिक

साहित्य: एक वाटी  पातळ तूप, एक वाटी बारीक चिरून गूळ, दोन वाट्या मुगडाळ पीठ, अर्धी वाटी सुकं खोबरं, चार चमचे पोहे, अर्धा टीस्पून जायफळ पावडर, दोन टीस्पून सुंठ पावडर, काजू  किंवा बदाम काप, 


कृती: मी मुगडाळ छान तांबूस भाजून रवाळ दळून घेतली होती. खोबरं  भाजून बाजूला ठेवा. कढईत एक वाटी तूप घ्या. व्यवस्थित गरम झालं की त्यात पोहे तळून घ्या. ते बाजूला ठेवा( इथे तुम्ही dryfruits तुकडे पण घेऊ शकता किंवा डिंक पण चालेल, मला कुरकुरीत पोहे आवडतात.)

आता त्याच तुपात मुगडाळ पीठ घालून पाच मिनिटं भाजून घ्या.

मुळात भाजलेलं असल्याने फार वेळ लागत नाही. हे भाजत असताना ताटाला तूप लावून घ्या. भाजलेल्या पिठात जायफळ पावडर, सुंठ पावडर मिक्स करा. खोबरं आणि तळलेले पोहे घाला. गॅस बंद करा. बारीक चिरलेला गूळ मिश्रणात घालून पटापट ढवळत नीट मिक्स करा. गूळ बारीक चिरला

की खडे तसेच राहत नाहीत. 

मिश्रण तूप लावलेल्या ताटात काढून वाटीच्या तळाला तूप लावून सारखं करा. काजू किंवा बदाम काप किंवा खोबरं किसाने सजवा.(ऐच्छिक)


टीप: याच प्रमाणात कुळीथ पीठ पापडी पण छान होते. कुळीथ पिठी मिळते त्याची पण होते आणि झटपट... 

मुगडाळ किंवा कुळीथ दोन्हीही उग्र असल्याने त्याला गूळ यापेक्षा कमी चालत नाही. 

✍️ मीनल सरदेशपांडे

सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

छोले

 #भाजीकांदालसूणविरहीत 



छोले: खरं तर कांदा लसूण न घालता कसे लागतील हा प्रश्नच होता. पण काल श्रावण सोमवार असल्याने ते शक्य नव्हतं घालणं, मुलांच्या आवडीची भाजी पण व्हायला हवी होती. आवडली सगळ्यांना म्हणून शेअर करतेय.


साहित्य: पाव किलो काबुली चणे, दोन टॉमेटो, दहा पाकळ्या काजू, आलं एक टीस्पून, दोन मिरच्या, एक टीस्पून पुदिना पेस्ट, एक टीस्पून आमचूर, पाव टीस्पून काळे मीठ, एक तुकडा दालचिनी, एक छोटं तमालपत्र, एक टीस्पून छोले मसाला, अर्धा टीस्पून लाल तिखट, मीठ, साखर १ टीस्पून ( ऐच्छिक). पाणी, तेल, जिरं अर्धा टीस्पून


कृती: काबुली चणे  रात्री भिजत घाला. 

सकाळी थोडं मीठ, दालचिनी आणि तमालपत्र घालून शिजवून घ्या. 

टॉमेटो, मिरच्या, पुदिना, काजू, आलं असं सगळं एकत्र वाटून घ्या. कढईत तेल तापत ठेवा त्यात जिरं घाला. ते तडतडल्यावर त्यात वाटप घाला. मी यात वाटपात परतताना थोडं काश्मिरी लाल तिखट घालते. तेल सुटेपर्यंत परतून घ्या. दालचिनी आणि तमालपत्र काढून किंचित एकजीव करून छोले त्यात घाला. आता चव बघून त्याप्रमाणे काळे मीठ घाला. आमचूर, छोले मसाला किंवा गरम मसाला घाला. लागेल तसं पाणी घाला. छान उकळी काढा. चव बघून लागलं तर लाल तिखट घाला. हवी असेल तर अगदी किंचित साखर घाला. तयार झाल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 


टीप: पुदिना नको असेल तर वगळा पण स्वाद छान येतो आणि पुदिना, काळे मीठ पचनाला मदत करते. 

कांदा लसूण नाहीये हे कळत पण नाही असं नाही म्हणणार पण चव चांगली येते. इथे जो कांद्याचा गोडवा येतो तो balance करायला काजू घेतलेत.


✍️ मीनल सरदेशपांडे

रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

आंबा करंजी

 आंबा करंजी:


नमस्कार मंडळी अलीकडे बऱ्याच दिवसात काहीच नवीन पदार्थ लिहिला नव्हता. आज ओल्या नारळाची आमरस घालून केलेली करंजी!


साहित्य: 

पारीसाठी: दोन कप मैदा, चार टेबलस्पून बारीक रवा, चार टेबलस्पून तेल मोहनासाठी, मीठ, पाणी


सारणासाठी: दोन कप ओलं खोबरं, दोन कप टिन मधला किंवा ताजा आमरस, अर्धा कप साखर


कृती: ओलं खोबरं, आमरस, साखर एकत्र करून मोदका प्रमाणे सारण करून घ्या. तुम्हाला हवी तर वेलची घाला.. मला आंब्याचाच स्वाद आवडतो. सारण गार होईपर्यंत पारीची तयारी करा. रवा, मैदा  आणि चवीपुरतं मीठ एकत्र करा. तेल कडकडीत गरम करून पिठात घाला. आमरस ताजा असेल तरच थोडा अगदी अर्धी वाटी पिठात घाला. नाहीतर किंचित कलर हवा तर... आता पाणी घेऊन पीठ मळून अर्धा तास तरी झाकून ठेवा.



नेहमीप्रमाणे पारी लाटून सारण भरून कातून मध्यम आचेवर तळून घ्या.



टीप: आमरस टिन मधला असेल तर त्यात साखर असते त्यामुळे अर्धा कप पुरते. ताजा असेल तर थोडी जास्त लागू शकते.


आटवलेला रस घालून पण करता येते पण त्याचा सारण करताना अंदाज यायला हवा नाहीतर कडक होऊ शकतं. आटवलेला आमरस घ्यायचा असेल तर दोन कप खोबरं असेल तर पाव किलो घ्या... रस, खोबरं, साखर सगळं एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवा मग सारण करा. थोडं सैल असताना गॅस बंद करा, गार झाल्यावर होईल मोकळं.



✍️मीनल सरदेशपांडे

रविवार, ७ जुलै, २०२४

नासकवणी

 नासकवणी:

आज बऱ्याच दिवसांनी  गिर गायीचं दूध मिळालं आणि हे आठवलं.



माझ्या लहानपणी गायी गुरं होती गोठ्यात म्हणजे वैभव होतं म्हणा ना... आणि आत्तासारखी ती काम झाल्यावर उन्हापावसात रात्रभर बाहेर सोडून निवांत झोपणारे मालक नसल्याने एक दिवस जरी आपलं वासरू किंवा कोणीही आलं नाही तर कंदील घेऊन शोधायला बाहेर पडायचो आम्ही. आता रस्त्यावर रात्र रात्र निवारा शोधणारी गायी, वासरांचे कळप बघितले की पाणी येतं डोळ्यात😥


घरचं दूध असल्याने असेल आम्ही 

भावंडं चहा पीत नव्हतो. जेव्हा दूध असेल तेव्हा फेसाळलेलं निरसं दूध, नसेल तेव्हा काही नाही. मी लग्नानंतर पहिल्यांदा चहाची चव बघितली.

गायीचेच दूध मुलांना द्यायचे असा दंडक होता बाबांचा म्हणजे बुध्दी तल्लख होते!


घरात खरवसासाठी चिकाचे दूध आले की आधी वासराला देवून मग उरलेल्या दुधाचा खरवस! घट्ट खरवस करताना कधी कधी घरचं साधं दूध नसेल तर दुप्पट नारळाचं दूध आणि जायफळ घालून गुळातला खरवस व्हायचा. सुरवातीला वासराला एकदम चीक पचणार नाही म्हणून तीन वेळा थोडं थोडं दिलं जायचं.एखादं चुकार वासरू पिऊ शकत नसेल तर दोन पायात तोंड धरून बाटलीने पाजायचं. तशी माणसासारखी आळशी जमात नसल्याने एक दोन दिवसात ते वासरू शिकायचंच. 


गावात घरटी भरपूर गुरे असल्याने खरवसाचे नावीन्य नव्हते. मला तर पातळ खरवस म्हणजेच हे नासकवणी फार आवडायचे. दूध नासायचे बंद झाले तरी कोवळ्या दुधाचा भरवसा नसायचा. जरा उकळताना फुटतय असं वाटलं की गूळ,  उगाळून जायफळ घातलं की काय मस्त लागायचं ते😊


त्यातही भरपूर दूध असेल तर हे कोवळे 

दूध आटवून आई त्याचा साखर घालून गोळा करायची...मस्त तांबूस कलाकंद( हे आत्ता कळलेलं नाव) काय  भारी लागायचा म्हणून सांगू😋😋

या आटवलेल्या गोळ्याच्या कधी कधी पोळ्या पण करायची आई! 

आई आमची गोड पोळ्या करण्यात एक्स्पर्ट होती अगदी! माझ्या लेकाला पण असं निरसं दूध मिळायचं आजीकडे गेल्यावर... तो घरी आला की म्हणायचा आजीकडे दूध असतं त्यात साय नसते...मस्त फेस पण असतो त्याला 😄😄 तसं आपल्याकडे येत नाही!


आज हे दुधाचं नासकवणी केलं नि प्रत्येक चमचा एकेक आठवण जागवत तृप्त करत आनंदाचे एकेक कप्पे उलगडत गेला... परत एकदा लहान व्हावं असं वाटू लागलं😊


✍️ मीनल सरदेशपांडे

कोकम रस्सम

 काय मंडळी पाऊस जोरदार पडतोय ना? अशावेळी गरमागरम काहीतरी प्यायला मजा येते... म्हणजे ते सूप, रस्सम असं म्हणतेय😄

आज केलय कोकम रस्सम!


#कोकमरस्सम:


साहित्य: एक वाटी आगळ, पाच टेबलस्पून तूरडाळ, चार टेबलस्पून रस्सम पावडर, मीठ, लाल तिखट एक टीस्पून, गूळ एक टीस्पून(ऐच्छिक), फोडणीसाठी तेल, जिरं अर्धा टीस्पून मेथी दाणे अर्धा टीस्पून, सुक्या मिरच्या चार पाच तुकडे, कढीलिंब पाने पाच सहा, हिंग पाव टीस्पून, पाणी साधारण एक वाटी आगळ असेल तर दहा वाट्या तरी हवं.

कृती: तूरडाळ शिजवून घ्या. एका पातेल्यात आगळ, पाणी, रस्सम पावडर, मीठ, गूळ, तिखट हे सगळं एकत्र करा. त्यात शिजलेली तूरडाळ घोटून घाला. तेलाची जिरं, मेथी, मिरची, कढीलिंब आणि हिंग घालून फोडणी करा. तयार मिश्रणाला द्या. आता रस्समला उकळी काढा. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. चव बघून काय हवं तर वाढवा. गरमागरम रस्सम नुसतं प्यायला पण छान लागतं.


रस्सम पावडर:

साहित्य: पाच टेबलस्पून तूर डाळ, पाच टेबलस्पून चणाडाळ, पाच टीस्पून धने, दोन टीस्पून जीरं, दोन टीस्पून मिरी, सुक्या मिरच्या दहा बारा, काश्मिरी लाल तिखट 1 टीस्पून

कृती: डाळी, धने, जीरं, मिरी, मिरच्या सगळं वेगवेगळं भाजून घ्या. गार करून पावडर करा, शेवटी लाल तिखट घालून परत एकदा फिरवा.

डब्यात भरून ठेवा.

टीप: गूळ तुमच्या आवडीवर कमी जास्त किंवा नाही घातला तरी चालेल. 

आगळ नसेल तर आमच्याकडे 

ऑर्डर करा 😝🫣 किंवा आमसुलं दहा बारा पाण्यात भिजवून ती कुस्करून पण घेता येईल.

आगळ प्रमाण अंदाजे दिलंय, आंबटपणा चव बघून थोडं थोडं पण घालता येईल. 

आगळात मीठ असतं त्यामुळे चव बघून मीठ घाला.


✍️मीनल सरदेशपांडे

शनिवार, २० जानेवारी, २०२४

कुळीथ सूप

 कुळीथ सूप: 


साहित्य: सहा कप पाणी, चार टेबलस्पून कुळीथ पीठ,  अर्धा कप भाज्यांचे तुकडे, एक टीस्पून मिरी पावडर, पाव टीस्पून लाल तिखट, लोणी किंवा बटर, एक लिंबू,  मीठ, चिमुटभर साखर


कृती: गाजर, कांदा पात, कांदा, लसूण असं सगळं मिळून अर्धा कप घ्या. कढईत लोणी घालून त्यात या भाज्या घालून दोन मिनिटं परता. चार कप पाण्यात कुळीथ पिठी कालवून गुठळी मोडून घ्या. भाज्यांवर हे मिश्रण घाला. आता त्यात चवीनुसार, मीठ, मिरी पावडर, लाल तिखट, हवी तर साखर घालून उकळा. सर्व्ह करताना लिंबू पिळून सर्व्ह करा.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

लाल भोपळ्याची कोफ्ता करी

 लाल भोपळ्याची कोफ्ता करी:



 मंडळी काहीही आहे हे असं म्हणून पुढे जाऊ नका खरंच छान झाली होती, खूप आवडली सगळ्यांना!


साहित्य: 1 कप लाल भोपळ्याचा कीस, पाव कप मुगडाळ, आलं, लसूण,  एक कप कांदा पात किंवा कोथिंबीर, मीठ, एक टेबलस्पून बेसन किंवा कॉर्न फ्लोअर, एक टीस्पून लाल तिखट, थोडीशी हळद, तेल तळणीसाठी


करी साठी:  अर्धा टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून जीरं पावडर, अर्धा कप सुकं खोबरं, 1 टेबलस्पून तीळ, सात आठ काजू, सात आठ लसूण पाकळ्या, 1 टीस्पून लाल तिखट, 2 टेबलस्पून दही, चार कांदे, अर्धा कप कांदा पात,  आलं एक तुकडा, काश्मिरी लाल तिखट अर्धा टीस्पून, दोन टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून जीरं, मीठ, अर्धा टीस्पून आमचुर पावडर, चिमूटभर साखर.


कृती: मुगडाळ चार तास तरी भिजत ठेवा. भोपळा किसून घ्या. भिजलेली मुगडाळ त्यात सात आठ पाकळ्या लसूण, आल्याचा तुकडा घालून भरड वाटून घ्या. भोपळ्याचा कीस, वाटलेलं मिश्रण, मीठ, तिखट आणि कांदा पात किंवा कोथिंबीर, हळद आणि बेसन घालून पीठ तयार करा, थोडं सैल असुदे.


याचे छोटे कोफ्ते तळून बाजूला ठेवा.


करी: आधी खोबरं, तीळ, काजू, आलं लसूण नुसतं किंचित तेलावर भाजून बाजूला ठेवा. आता कढईत तेल घाला, त्यात जीरं घालून ते तडतडल्यावर कांदा आणि कांदा पात घालून परतत रहा. त्यात काश्मिरी लाल तिखट आणि थोडं मीठ घाला. तेलावर भाजलेले जिन्नस दही घालून वाटून घ्या, ते परतलेल्या कांद्यावर घालून तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. परतताना धने जीरं पावडर, तिखट घाला. तेल सुटलं की मीठ, आमचुर आणि साखर ( ऐच्छिक) घाला. तुम्हाला ग्रेव्ही हवी  दाट पातळ तसं पाणी घाला. 

आता चव बघा लागलं तर तिखट, मीठ वाढवा. जेवायच्या आधी दोन मिनिटं ग्रेव्हीत कोफ्ते सोडून एक उकळी काढा.

मस्त होते😊 यात आपण बेसन अगदी नावाला वापरलं आणि भिजलेली डाळ घातलीय.

टीप: तुम्ही टॉमेटो आणत असाल तर दह्या ऐवजी टॉमेटो वापरा. मला तरी दही आवडतं. सांगूनही कोणाला त्यात लाल भोपळा आहे हे कळत नाही. 

कोफ्ते आधी पासून घातले तर ग्रेव्ही शोषून घेतात म्हणून आयत्यावेळी मिक्स करा.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

मसाला पडवळ

 मसाला पडवळ :


यात कुठलाही मसाला नाहीये उगाच आपलं नाव दिलं.

पडवळ डाळिंब्या, चणाडाळ पडवळ, पांढरा वाटाणा पडवळ, नुसत्या काचऱ्या हे प्रकार असतातच.

भरलं पडवळ मस्त लागतं पण वेळ नसेल तर हा सोपा पर्याय... बघा करून!

साहित्य: पडवळ अर्धा किलो, कांदे दोन, ओलं खोबरं दोन टेबलस्पून, दाण्याचं कूट दोन टेबलस्पून, तीळ एक टेबलस्पून, कोथिंबीर दोन टेबलस्पून, आमचूर एक टीस्पून, बेसन दोन टेबलस्पून, मीठ, तिखट, साखर

फोडणीचे साहित्य

कृती: पडवळ धुवून काचऱ्या करून घ्या. कांदे अर्धे लांब चिरा. 

एका भांड्यात खोबरं, कोथिंबीर, तीळ, दाण्याचं कूट, बेसन, तिखट, मीठ, साखर, आमचूर हा सगळा मसाला एकत्र करा. यात जे तिखट मीठ येईल ते या मसाल्याला व्यवस्थित चव येईल एवढच असुदे.

आता कढई तापत ठेवा. त्यात नेहमीपेक्षा किंचित जास्त तेल घाला. मोहोरी घालून ती तडतडली की कांदा घालून एक मिनिट परता. आता त्यात पडवळ घालून परता.

झाकण ठेवून गोळा शिजवायचे नाही. फक्त परतून परतून किंचित मऊ होऊ द्या. आता त्यात हळद, हिंग, पडवळ

आहे त्याप्रमाणे मीठ तिखट घाला. मसाल्यात वेगळं आहे. पडवळ किती परतलं तो फोटो शेअर केलाय.


आता तयार मसाला भाजी अलगद मिक्स करा. आणि झाकण ठेवून दोन मिनिटं छान वाफ येऊ दे.

बेसन शिजायला हवं. 

चव बघून काही हवं तर वाढवा.

टीप: बेसन न घेता भाजणी घेऊ शकता.

यात पाणी अजिबात वापरायचं नाही. छान येते चव.

मी तीळ आणल्यावर भाजून ठेवते त्यामुळे डायरेक्ट मिक्स केलेत.

कांदा घालावा का आणि किती हे ऐच्छिक आहे.

✍️मीनल सरदेशपांडे

गार्लीक आंबोळी

 गार्लिक आंबोळी:



नमस्कार मंडळी😊

 आहे त्यातच थोडासा बदल केला तरी छान वेगळी चव येते.

आंबोळी चटणी किंवा काळा वाटाणा उसळ हा न्याहारीचा बेत असतोच. हल्ली तर मिसळ आंबोळी पण मिळते इकडे.

पण माझ्या सारख्या आळशी बाईला चटणी पण करायची नसते मग असे पर्याय शोधते.

मी नेहमी आंबोळी पीठ कोरडे

दळून ठेवते. तुम्ही आयत्या वेळी पण डाळ तांदूळ भिजवून करू शकता.


साहित्य: आंबोळी पीठ चार वाट्या, दहा बारा लसूण पाकळ्या, सोसतील तेवढ्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, थोडे ताक आणि पाणी, तेल

कृती: करायला घेताना तयार आंबोळी पिठात एक वाटी ताक आणि बाकी लागेल तसं पाणी घाला. मिरची आणि लसूण भरड वाटून घ्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

पिठात ही लसूण मिरची, कोथिंबीर आणि दोन चमचे तेल आणि मीठ घालून पीठ भिजवा.

अगदी लगेच आंबोळी करायला घेता येते.

बिडाच्या तव्यावर तेल सोडून आंबोळी घालून दोन्ही बाजू छान भाजून घ्या. अजून प्रोटीन रीच वगैरे हवं तर दुसरी बाजू भाजून झाल्यावर त्यावर पनीर किसून घाला.  पनीर घातलं तर त्यावर तिखट मीठ किंवा चाट मसाला भुरभुरावा.


टीप: मला बारा पंधरा जणांना करताना प्रत्येक आंबोळीला वरून सेपरेट

लसूण मिरची घालून भाजणे शक्य नाही पण थोड्या प्रमाणात असेल तर तव्यावर आधी तेलावर ते थोडं पसरून त्यावर आंबोळी घालू शकता.


यात मी कोथिंबीर घातली तिथे मेथी, दोन पानी मेथी पण छान लागते.


या सिझनला लसूण पात पण मिळते मोठ्या शहरात ती पण घालता येईल मग वेगळी लसूण लागणार नाही.

गार्लिक ब्रेड पेक्षा पौष्टिक होईल.


मी पुडी चटणी आणि लोण्या बरोबर खाल्ली.


बऱ्याचदा तयार पीठ भिजवताना अंदाज कसा घ्यावा कळत नाही त्यासाठी साधारण मध्यम वाटी सुकं पीठ असेल तर त्यात तीन आंबोळ्या होतात. असं माणशी मोजून घ्यायचं.


माझ्याकडे खोल डाव आहे त्याने मोजून घेते म्हणजे परफेक्ट होतं प्रमाण.


✍️मीनल सरदेशपांडे

फ्रेश स्ट्रॉबेरी प्लम केक

 एगलेस फ्रेश स्ट्रॉबेरी प्लम केक:

 काल लेकासाठी त्याच्या आवडीचा प्लम केक केला. पुण्याहून येताना स्ट्रॉबेरी घेतली होती म्हणून तीच वापरली.


साहित्य: दहा बारा स्ट्रॉबेरी, एक कप मिक्स ड्राय फ्रुट्स, (यात बदाम, काजूगर, मनुका, बेदाणे, चेरी,  जरदाळू, किंवा थोडी टूटी फ्रूटी घेऊ शकता.)

दोन कप मैदा, एक टीस्पून बेकिंग पावडर, एक टीस्पून


खायचा सोडा, दोन टीस्पून लिंबू रस, अर्धा कप दही, १०० ग्रॅम बटर  किंवा  तेल, दीड कप पिठी साखर, दोन टीस्पून व्हॅनिला इसेन्स


कृती: दहा बारा स्ट्रॉबेरी अर्धा कप पाणी घालून बारीक करून घ्या. या तयार ज्युसमध्ये ड्राय फ्रूटस भिजवून ठेवा कमीतकमी चार तास.

केक करायला घेताना आधी ओव्हन १८० डिग्री ला पाच मिनिटं प्रिहिट करा.

एका भांड्यात दही, पिठीसाखर आणि बटर किंवा तेल एकत्र करून फेटा. त्यात व्हॅनिला इसेन्स घाला. आता मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा चाळून यात मिसळा, परत एकदा मिश्रण नीट एकत्र करा. 

आता त्यात भिजवलेली ड्राय फ्रुटस ज्यूस सह मिक्स करा. आता मिश्रण जर घट्ट वाटत असेल तर थोडं दूध घाला.

केक टिन तेल लावून गोल बटर पेपर खाली ठेवून आणि कडाना तेल लावून तयार करा. 

आता त्या मिश्रणात लिंबू रस किंवा व्हिनेगर घालून पटापट ढवळा आणि केक टिन मध्ये मिश्रण ओतून बेक करायला ठेवा.

किमान ४५ मिनिटं बघू नका. 

त्यानंतर बघून लागलं तर परत दहा मिनिटं ठेवा.

ओव्हन बंद केल्यावर थोडा वेळ केक असुदे त्यात मग काढून गार करा.


टीप: कढईत करताना, खाली मीठ पसरून त्यावर स्टँड ठेवून झाकण ठेवून पाच मिनिटं मोठ्या गॅसवर तापवा. मग केक टिन ठेवून मध्यम गॅसवर पंधरा मिनिटं आणि अर्धा तास मंद गॅसवर भाजा. 

चेक करून लागलं तर आणखी ठेवा.

मला एक तास लागला.

हा घरच्या साहित्यात केलेला अगदी बेसिक प्लम केक आहे.


यात मी स्ट्रॉबेरी ज्यूस वापरलाय पण कोणताही ज्यूस घेता येईल. 

यात स्ट्रॉबेरी नसेल तर कॉफी पावडर पण चार चमचे चांगली लागते.

✍️ मीनल सरदेशपांडे

कॉर्न मिसळ

 कॉर्न उसळ( मिसळ) ब्रेड:



नमस्कार मंडळी😊

काय काल दिवसभर गोड खाऊन, गोड बोलून कंटाळा आला असेल ना?

आज झटपट मिसळ घेऊन आलेय.

कधीतरी पोळी भाजी नको वाटते पण झणझणीत मिसळ करावी तर कडधान्य भिजलेलं नसतं. अशावेळी ही कॉर्न मिसळ करून बघा.


साहित्य: पाव किलो किंवा एक कप मक्याचे दाणे( फ्रोजन पण मिळतात.), चार कांदे, १५/२० लसूण पाकळ्या, एक वाटी सुकं खोबरं, एक टेबलस्पून तीळ, एक टेबलस्पून खसखस,  एक टीस्पून धने, अर्धा टीस्पून जिरं, दोन तुकडे दालचिनी, पाच सहा लवंगा, २०/२५ मिरी दाणे, तीन हिरवी वेलची, लाल तिखट  एक टीस्पून, काश्मिरी लाल तिखट एक टीस्पून, मीठ, तेल

वरून घ्यायला कांदा, कोथिंबीर, लिंबू, शेव किंवा फरसाण


कृती: कांदे उभे लांब चिरा, सुकं खोबरं किसून घ्या. कॉर्न कुकरमध्ये दहा मिनिटं वाफवा. तीळ, खसखस, खोबरं सगळं वेगवेगळं भाजून घ्या. 

कढईत तेल घेऊन त्यात सगळा खडा मसाला परतून त्यावर कांदा, लसूण घालून परतून घ्या. कांदा, खोबरं, तीळ, खसखस खडे मसाले सगळं गुळगुळीत वाटून घ्या.

एक लीटर पाणी गरम करायला ठेवा.

आता मोठ्या कढईत तर्री साठी तेल तापवा. गॅस मंद करून त्यात काश्मिरी आणि साधं लाल तिखट घाला. लगेच उकळलेले पाणी घाला. आता सगळं वाटप घाला. मीठ आणि लागेल तसं पाणी घाला. 

आता आपले वाफवलेले कॉर्न अर्धे तसेच घाला आणि अर्धे मिक्सरमध्ये अर्धे बोबडे फिरवून कटात घाला. उकळी येऊ द्या. चव बघा लागलं तर तिखट, मीठ वाढवा. झणझणीत झाला पाहिजे.


घेताना मिसळीप्रमाणे फरसाण, कांदा, कोथिंबीर त्यावर कट आणि लिंबू.. अहाहा!! 

बरोबर ब्रेड किंवा पाव काहीही घ्या.


टीप: काही झटपट वगैरे होत नाही🫣 सगळी झटापट करायला तासभर तरी लागतोच.😃😃

हल्ली साधे कॉर्न मिळत नाहीत पण स्वीट कॉर्न असेल तरीही कटात गेल्यावर अजिबात गोड वगैरे लागत नाही. बऱ्याच जणांना हीच शंका येते.

तिखटपणा तुमच्या चवीनुसार कमी जास्त करा.

पण असे पदार्थ झणझणीत हवेतच!

✍🏻 मीनल सरदेशपांडे

ओव्याच्या पानांची ताकातली पातळ भाजी

 ओव्याच्या पानांची ताकातली पातळ  भाजी:



रोज रोज आमटी करून कंटाळा येतो. काहीतरी कढी, सार असा बदल छान वाटतो. याच उद्देशाने केलेली ही ओव्याच्या पानांची ताकातली पातळ भाजी!!


लाल माठ, पालक, चाकवत वापरूनही याच कृतीने ही भाजी करता येते.


साहित्यः तीस चाळीस ओव्याची पाने, एक लीटर  ताक, दीड टेबलस्पून बेसन,  अर्धी वाटी ओले अगर भिजवलेले काजूगर(ऐच्छीक), मीठ, साखर चार टीस्पून, वाट्लेली ओली मिरची अर्धा चमचा अगर लाल तिखट, दोन-तीन चमचे तूप, अर्धा चमचा जीरे, सुक्या मिरच्या दोन-तीन्, मेथी दाणे दहा-बारा, लसूण पाकळ्या दहा बारा. किसलेले आलं एक टीस्पून

कृती:   ओव्याची पाने धुवून बारीक चिरून घ्यावीत.ताक, बेसन एकत्र करावे. पाणी घालून कढी इतपत किंवा आपल्या आवडीप्रमाणे पातळ करावे. त्यात मीठ, साखर,  किसलेले

आलं, तिखट किंवा मिरचीचे वाटप चवीनुसार मिसळावे.  ओले काजूगर  किंवा सुके काजूगर गरम पाण्यात भिजवून घातले तरी चालतील.

तुपाची मेथी दाणे, जीरे,  सुक्या मिरच्या, हिंग, हळद, लसूण घालून खमंग फोडणी करावी ओव्याची पाने त्यात परतावी आणि तयार मिश्रण त्यात ओतावे.एक उकळी काढावी. सुक्या मिरचीने तिखट्पणा येत नाही म्हणून लाल तिखट किंवा ओल्या मिरचीचे वाटप वापरले आहे.


✍🏻मीनल सरदेशपांडे