कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

शेवग्याच्या पाल्याचे सूप

शेवग्याच्या पाल्याचे सूप: 

शेवग्याचा पाला अतिशय पौष्टिक आणि आरोग्यासाठी हितकारक आहे. आपल्या आहारात त्याचा नियमित वापर करायला हवा. त्यासाठी हा प्रयोग!
साहित्य: शेवग्याचा पाला एक कप, प्रत्येकी एक टीस्पून मुगडाळ, मसुरडाळ आणि तूरडाळ, दोन टॉमेटो, दोन कांदे, पाच सहा लसूण पाकळ्या, दहा बारा मिरी, अर्धा इंच दालचिनी तुकडा, मीठ, लाल तिखट पाव टीस्पून, साखर चार टीस्पून

कृती: शेवग्याची पाने काढून स्वच्छ धुवून पाण्यात दहा मिनिटं उकळून घ्या. टॉमेटो धुवून फोडी करा. कांदे सोलून फोडी करा. लसूण सोलून घ्या. तिन्ही डाळी धुवून घ्या.  शेवग्याची पाने पाणी काढून एक पातेल्यात घ्या. त्यात कांद्याच्या फोडी, टॉमेटोच्या फोडी, मिरी, दालचिनी, लसूण आणि तिन्ही डाळी पाल्यात एकत्र करा. एक कप पाणी घालून सर्व शिजवून घ्या. गार झाल्यावर वाटून गाळून घ्या. गरजेप्रमाणे पाणी घाला. मीठ, साखर तिखट घालून उकळवा. लोणी घालून गरमागरम सर्व्ह करा!

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

कांद्याची भाजी

कांद्याची भाजी:
साहित्य: तीन कांदे, दोन टेबलस्पून तेल, अर्धा कप बेसन, मीठ, एक टीस्पून लाल तिखट, हळद पाव टीस्पून, मोहोरी पाव टीस्पून
कृती: कांदे सोलून अर्धे लांब चिरून घ्या. चिरलेला कांदा एक कप घेतला. कढईत तेल तापवा. मोहोरी घालून ती तडतडली की कांदा घाला. मध्यम गॅसवर पाच मिनिटं झाकण ठेवा.
मधे मधे परतत रहा. कांदा मऊ झाला की हळद, तिखट, मीठ घालून परता.
आता त्यात बेसन भुरभुरावे. नीट ढवळून घ्यावे. किंचित पाण्याचा हबका मारून पाच मिनिटं बारीक गॅसवर बेसन शिजू द्यावे. चव बघून हवं असेल ते वाढवावे. ही भाजी थोडी झणझणीत चांगली वाटते.
✍🏻मीनल सरदेशपांडे

पडवळाचे दह्यातले भरीत:

पडवळाचे दह्यातले भरीत:
साहित्य:  पडवळ फोडी एक वाटी, दोन टीस्पून मेतकूट, एक सांडगी मिरची, दोन ओल्या मिरच्या, तूप एक टीस्पून, जीरं पाव टीस्पून, हिंग चिमूटभर, कोथिंबीर, मीठ, साखर एक टीस्पून, दही दीड वाटी
कृती: पडवळ बारीक चिरून वाफवून गार करत ठेवावे. छोट्या कढल्यात जीरं, मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी. गॅस बंद करून हिंग घालावा. तयार फोडणी पडवळाच्या फोडींवर घालावी. मीठ, साखर आणि मेतकूट घालून नीट कालवावे. एक सांडगी मिरची तळून घेऊन कुस्करून यात घालावी. कोथिंबीर धुवून बारीक चिरून घालावी. दही घालून भरीत सारखे करावे. चवीनुसार लागेल ते वाढवावे.चविष्ट तोंडीलावणे तयार आहे.
✍🏻मिनल सरदेशपांडे

गोड शंकरपाळे

गोड शंकरपाळे:
साहित्य: एक कप (250 ml) दूध, एक कप साखर, एक कप तूप, मीठ एक टीस्पून,  बारीक रवा दोन वाट्या, मैदा दोन वाट्या, तळणीसाठी तेल
कृती:  दूध आणि साखर एकत्र करून एक उकळी काढावी, साखर विरघळली पाहिजे. एका कढल्यात एक कप पातळ तूप तापत ठेवावे. दुधाला उकळी आली की त्यात तूप मिक्स करून गार करत ठेवावे. पूर्ण गार झाल्यावर मीठ घालावे. आता त्यात बारीक रवा आणि मैदा थोडा थोडा मिसळत जावा. खूप घट्ट करू नये. रवा भिजल्यावर अजून घट्ट होते. अर्धा तास झाकून ठेवावे.
अर्ध्या तासाने पोळी एवढी गोळी घेऊन किंचित जाडसर पोळी लाटावी. कातण्याने शंकरपाळे कातून घ्यावेत.
तेल गरम करून मध्यम आचेवर तळावेत. खुसखुशीत शंकरपाळे तयार आहेत!
टीप: 
दूध, साखर आणि तूप एकत्र गरम केल्यास दूध फुटण्याची शक्यता असते म्हणून दुधाला उकळी आली की गरम तूप मिसळून गॅस बंद करावा.
रवा मैद्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

लाल माठाची ताकातली पातळ भाजी

रोज रोज आमटी करून कंटाळा येतो. काहीतरी कढी, सार असा बदल छान वाटतो. याच उद्देशाने केलेली ही लाल माठाचीची ताकातली पातळ भाजी!!
लाल माठाऐवजी पालक वापरूनही याच क्रुतीने ही भाजी करता येते.
साहित्यः एक जुडी लाल माठ, एक लीटर  ताक, दीड टेबलस्पून बेसन,  अर्धी वाटी ओले अगर भिजवलेले काजूगर(ऐच्छीक), मीठ, साखर चार टीस्पून, वाट्लेली ओली मिरची अर्धा चमचा अगर लाल तिखट, दोन-तीन चमचे तूप, अर्धा चमचा जीरे, सुक्या मिरच्या दोन-तीन्, मेथी दाणे दहा-बारा.
क्रुती: प्रथम लाल माठ निवडून, धुवून, चिरून कुकरला वाफवून घ्यावा.  लाल माठ आणि बेसन पीठ एकत्र मिक्सरला थोडे फिरवून घ्यावे. ताक, फिरवलेला माठ एकत्र करावे. पाणी घालून कढी इतपत किंवा आपल्या आवडीप्रमाणे पातळ करावे. त्यात मीठ, साखर, तिखट किंवा मिरचीचे वाटप चवीनुसार मिसळावे.  ओले काजूगर  किंवा सुके काजूगर गरम पाण्यात भिजवून घातले तरी चालतील.
तूपाची मेथी दाणे, जीरे,  सुक्या मिरच्या, हिंग घालून खमंग फोडणी करावी आणि तयार मिश्रणाला द्यावी. एक उकळी काढावी. सुक्या मिरचीने तिखट्पणा येत नाही म्हणून लाल तिखट किंवा ओल्या मिरचीचे वाटप वापरले आहे.

तुम्हाला आवडत असेल तर लसूण पाकळ्या तळून घालण्यास हरकत नाही.
✍🏻मीनल सरदेशपांडे

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१९

टॉमेटोची कढी

टॉमेटोची कढी:
तोंडाला चव येण्यासाठी मस्त प्रकार
साहित्य: टॉमेटो 6 नग, ताक दोन कप, अर्धा कप ओलं खोबरं, अर्धा टीस्पून लाल तिखट, चार टीस्पून साखर, एक टेबलस्पून बेसन, पाच सहा मिरी दाणे, पाव टीस्पून जीरं, चिमूटभर हिंग, पाच सहा तुकडे सुक्या मिरच्या,  आलं पेस्ट 1 टीस्पून, तूप दोन टीस्पून, कढीलिंबाची पाने चार पाच, पाणी
कृती: टॉमेटो धुवून तुकडे करून शिजवून घ्यावेत. गार करत ठेवावेत. एका पातेल्यात ताक घ्यावे त्यात बेसन नीट मिक्स करावे. मीठ, साखर, लाल तिखट,  आलं, कढीलिंबाची पाने घालावीत.कढल्यात तूप तापवून त्यात जीरं, मिरी दाणे, सुक्या मिरच्या घालून फोडणी करावी. गॅस बंद करून हिंग घालावे. तयार फोडणी ताकात घालावी. टॉमेटो एक कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. मिश्रण गाळून घ्यावे, ताकात मिसळावे. ओलं खोबरं अर्धा कप पाणी घालून मिक्सरमध्ये दोन वेळा फिरवून गाळून दूध ताकाच्या मिश्रणात घालावे. तयार कढी गरम करावी, चव बघून लागेल ते वाढवावे. कढी चांगली गरम करावी पण उकळायची गरज नाही नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते.
टीप: लसूण आवडत असेल तर दोनच पाकळ्या किसून गरम करायच्या आधी घाला. मस्त येतो फ्लेवर!
टीप: टॉमेटो आणि ताक दोन्ही आंबट असले तरी ही कढी आंबट होत नाही, मस्त लागते चवीला!
✍🏻 मीनल सरदेशपांडे

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

मटार करंज्या:

मटार करंजी:
साहित्य:
 सारणासाठी:
तीन वाट्या मटार दाणे, दोन टीस्पून तेल,
एक टीस्पून मिरची पेस्ट, जीरं चिमूटभर, हिंग पाव टीस्पून, 1 टीस्पून आमचूर पावडर,
ओलं खोबरं पाऊण वाटी, धने पावडर पाव टीस्पून, जिरं पावडर पाव टीस्पून
मीठ
तळण्यासाठी: तेल

पारी साठी साहित्य:

एक वाटी बारीक रवा आणि दोन वाट्या मैदा  अर्धा टीस्पून ओवा, चिमूटभर हळद, अर्धा टीस्पून तिखट, चवीनुसार मीठ,
तीन टेबलस्पून  घट्ट तूूप , पाणी.
कृती: रवा, मैदा चाळून एकत्र करावा. चवीनुसार मीठ, ओवा हळद आणि लाल तिखट घालून नीट मिसळावे. तीन टेबलस्पून तूूप रव्या मैद्यात घालून पाणी घेऊन घट्ट भिजवून तासभर झाकून ठेवावे.
मटार फूड प्रोसेसर मध्ये  अर्धे बोबडे वाटून घ्यावे.कढईत 2 टीस्पून तेल गरम करून त्यात चिमूटभर जीरं घालावं. ते तडतडल्यावर त्यात पाव टीस्पून हिंग घालून मटार घालावेत. चांगली वाफ आणावी.   मिरची पेस्ट  घालून नीट परतून घ्यावे. ओलं खोबरं घालून परतावे व एक वाफ आणावी.  धने जीरं  आमचुर पावडर घालावी. मीठ घालून सारण कोरडं करावे. गार करत ठेवावे.
करंजी करायला छोटी गोळी करून पुरी लाटावी.
त्यात एक टीस्पून सारण भरून पुरी बंद करून कातून घ्यावी.
कढईत तेल तापत ठेवून मध्यम गॅसवर करंज्या तळाव्यात.
चिंच खजूर चटणी, सॉस सोबत सर्व्ह कराव्या.
टीप: आवडत असेल तर आलं लसूण सारणात घालावे. एक टीस्पून आलं लसूण पेस्ट घ्यावी.
मिरची ऐवजी लाल तिखट वापरू शकता.
या करंज्या खूप वेळ कुरकुरीत राहात नाहीत पण गरमागरम खाता येत नाहीत. त्यामुळे तळून पाच मिनिटांनी खायला घ्या नाहीतर तोंड भाजेल.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

फुलांचे चिरोटे

फुलांचे चिरोटे:






साहित्य: 1) चिरोट्यासाठी :एक कप पाणी, पाऊण कप पातळ तूप/ तेल, मीठ, मैदा चार कप,  2) साटा करण्यासाठी: घट्ट तूप अर्धी वाटी, अडीच टीस्पून कॉर्न फ्लोअर, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर,
3)वरून भुरभुरावण्यासाठी: पिठीसाखर पाव की, 4)तळण्यासाठी रिफाईंड तेल किंवा साजूक तूप साधारण अर्धा की
कृती: 1) एक वाटी पाणी आणि पाऊण वाटी पातळ तूप आणि चवी पुरते मीठ घालून उकळावे.
2) गार करत ठेवावे.
3) घट्ट तूप अर्धी वाटी, कॉर्न फ्लोअर अडीच टीस्पून, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर हे सर्व एकत्र करून फेटून घ्यावे. याला साटा म्हणतात.
 4)तयार पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात हळूहळू मैदा मिसळावा. नेहमीच्या पोळीच्या कणके एवढं घट्ट पीठ भिजवावं.
5) पिठाचे तीन सारखे पोळीला घेतो तसे गोळे करून घ्यावे.
6) तीन पोळ्या लाटाव्यात.
7)पहिली पोळी घेऊन त्याला साटा लावावा, खूप जास्त नाही हाताने सगळीकडे पोळीला तेल लावतो तसा लावावा. 8)त्यावर दुसरी पोळी त्याला साटा परत तिसरी पोळी त्यावर साटा लावून गुंडाळी करावी. 
9)अलगद फिरवून थोडी घट्ट करून घ्यावी. सुरीने तुकडे करावेत.


11) पुरीसारखे गोल पण अलगद लाटावेत.
10) तळणीसाठी कढईत तेल किंवा तूप तापत ठेवावे.
11) मध्यम गॅसवर बदामी रंगावर तळावेत.
12) चाळणीवर काढून तूप निथळू द्यावे.
13) दोन मिनिटांनी तयार फुलांच्या चिरोट्यावर पिठीसाखर भुरभुरावी.

14) घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

बटाटा काचऱ्या

बटाटा काचऱ्या:
लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती भाजी...ट्रीपला हमखास डब्यात असणारी..चला तर करूया पटापट!
साहित्य: सहा बटाटे मध्यम, एक टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार, साखर अर्धा टीस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून( तिखटपणावर कमी जास्त), मोहोरी पाव टीस्पून, हिंग चिमूटभर, हळद पाव टीस्पून.

कृती: बटाटे स्वच्छ धुवावेत, सगळी माती नीट निघाली पाहिजे. एका भांड्यात पाणी घ्या. बटाट्याचे  सालासह चार भाग करून पातळ काचऱ्या करून पाण्यात टाका, म्हणजे बटाटा काळा पडत नाही.  करायच्या आधी काचऱ्या चाळणीवर काढा. शक्यतो लोखंडी कढईत तेल तापत ठेवावे. तेल तापलं की मोहोरी घाला. ती तडतडल्यावर हिंग, हळद घालून काचऱ्या घाला, त्या परतून घ्या. आता कढईवर खोलगट झाकण ठेवा झाकणात वाटीभर पाणी घाला. यामुळे काचऱ्या लागत नाहीत आणि छान मोकळ्या होतात. गॅस मंद ठेवा. दोन मिनिटांनी अलगद झाकण काढा पाणी भाजीत पडणार नाही याची काळजी घ्या. एखादी काचरी झाऱ्याने तुटतेय ना पहा म्हणजे बटाटा शिजलाय! आता मीठ, साखर(ऐच्छिक), लाल तिखट घालून काचऱ्या परता. तुम्हाला आवडतील तशा खरपूस होईपर्यंत काचऱ्या परतत रहा. चव बघून लागेल ते वाढवा.
खमंग काचऱ्या तयार आहेत!
टीप: या काचऱ्या परतायला तेल जास्त लागतं त्यामुळे काचऱ्या तयार झाल्यावर कढईत त्या बाजूने लावायच्या जे जादा तेल असेल ते कढईत मध्ये साठेल त्यात मस्तपैकी भात कालवून फोडणीचा भात करू शकता!
✍🏻 मीनल सरदेशपांडे

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

खजूर सफरचंद लोणचं

खजूर सफरचंद लोणचं:

साहित्य: पाव की  सीडलेस खजूर, 4 लिंबं,  तीन सफरचंद, तीन चमचे लाल तिखट, 100 ग्रॅम म्हणजे एक वाटी गूळ, अर्धा टीस्पून शेंदेलोण, अर्धा टीस्पून पादेलोण, एक टीस्पून जीरं पावडर, एक टीस्पून साधं मीठ
कृती: खजुराचे चार तुकडे होतील असे तुकडे करावे.  लिंबाचा रस काढून घ्यावा. गूळ बारीक चिरावा.  सफरचंद धुवून पुसून बारीक फोडी कराव्या. स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात  सफरचंद फोडी, खजूर, गूळ, लिंबाचा रस, शेंदेलोण, पादेलोण, मीठ, तिखट, जीरं पावडर सर्व एकत्र करावे. एक दिवस तसेच ठेवून मुरू द्यावे. दुसऱ्या दिवशी खायला घेता येते.
चव अप्रतीम!!!
मिनल सरदेशपांडे

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

आंबा रसगुल्ले

आंबा रसगुल्ले:

साहित्य: फुल क्रीम दूध अर्धा ली, 1/2 कप (125मिली) हापूस आमरस, 225 ग्रॅम साखर, दोन लिंबाचा रस,  500 मिली पाणी, चौकोनी खडीसाखर, पाव टीस्पून आरारूट सत्व

कृती: आंब्याचा रस काढून मोजून घ्या. दूध गरम करायला ठेवा. उकळी आली की गॅस बंद करा.  दोन मिनिटं तसंच
ठेवा. आता त्यात काढलेला आमरस आणि लिंबू रस एकत्र करून थोडं थोडं मिक्स करा. दूध फाटेल. आता गाळण्यावर कॉटन कापड ठेवून त्यावर मिश्रण ओता. त्यावर लगेच गार पाणी ओतून पनीर धुवून घ्या. कापडाची टोकं एकत्र करून

बांधा आणि पाणी जायला पनीर टांगून ठेवा. अर्ध्या तासात पाणी निघून गेले की पनीर  आरारूट घालून खूप वेळ मळून घ्या.  मध्ये खडीसाखर ठेवून पनीरचे गोळे करून घ्या.
कुकरमध्ये 225 ग्रॅम साखर आणि 500 मिली पाणी एकत्र करून उकळत ठेवा.  पाण्याला उकळी आली की मध्यम गॅस करा, साखर विरघळली की अर्धा पाक बाजूला करून गार करायला ठेवा. उरलेला अर्धा पाक उकळायला लागला की गोळे त्यात सोडा, झाकण लावून दहा मिनिटं मध्यम गॅस वर ठेवा. कुकर बुडेल असं भांडं घेऊन त्यात कुकरचा तळ बुडवा. झाकण उघडेल.
लगेच पळीने गार पाकात सगळे रसगुल्ले घाला.
पिस्ते काप आणि केशर काडयांनी सजवा.
मी काही रसगुल्ले आंब्याची फोड आत ठेवून केले.
मस्त आंबा रसगुल्ले तयार आहेत. तुम्ही ते नुसते किंवा व्हॅनिला आईस्क्रीम सोबत सर्व्ह करू शकता!
✍🏻 मीनल सरदेशपांडे

रवा नाचणी लाडू

उन्हाळ्यात हमखास आठवण होते ती नाचणीची!
मोठी मंडळी नाचणीची आंबील आवडीने खातात. भाकरी पण होते कधीतरी..पण मुलांना पटकन खाता येईल असं करावं म्हणून मग लाडू केले. मी नेहमी नाचणीचे पिठीसाखर घालून लाडू करते पण यावेळी म्हटलं रवा बेसन पाकातले लाडू मस्त होतात तसेच बघू करून!
साहित्य: दोन कप नाचणी पीठ, एक कप रवा, सव्वा दोन कप साखर, एक कप पाणी, अर्धा कप साजूक तूप, एक टीस्पून वेलची पावडर, काजू बदाम काप
कृती: रवा पाच मिनिटं कोरडा भाजून बाजूला ठेवा. तुपावर पाच मिनिटं नाचणी पीठ भाजा. रवा मिसळुन परत दहा मिनिटं भाजा. पातेल्यात साखर, पाणी एकत्र करा, एकतारी पाक करा. मी अगदी एक चिमटी मीठ घालते पाकात. भाजलेल्या मिश्रणात तयार पाक, वेलची पावडर आणि काजू बदाम काप मिक्स करा. तासभर मुरू द्या.
आवडीप्रमाणे लाडू वळा.
✍🏻मिनल सरदेशपांडे

पोहे पुराण

पोहे पुराण: 
मंडळी पोहे तसे आपल्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींशी निगडित आहेत...आठवतात का... किती जणांचे निर्णय चहा पोह्यांवर ठरले..चुकले... हा हा..तर असे हे पोहे! आपल्या कोकण वासीयांचं तर फार प्रेम या पोह्यांवर... पूर्वी घरचं भात येई. त्यामुळे दिवाळी घरच्या पोह्यांनी साजरी होई! भात रात्रभर भिजवून सकाळी टोपलीत काढायचे आणि त्यावर आधण पाणी ओतून भाजून घरी पोहे कांडले जात.. हळूहळू पोह्यांची गिरणी आली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नारळी भातासारखे गरमागरम गूळ नारळ पोहे केळीच्या पानावर घेऊन खाताना बाकी फराळाचा विसर पडत असे.
पूर्वी दिवाळीत कडबोळी, करंजी हेच मुख्य फराळाचे पदार्थ... दारावर येणाऱ्यांना एक कडबोळं, करंजी आणि भांडभर  गावठी पोहे दिले जात. गावातले अनेक उत्सव, लग्न कार्य, मांडव घालणे, पत्त्यांचे डाव यात अढळपदी पोहेच! यासाठी प्रत्येकाला वेगळी डिश, द्यायची पध्द्त नव्हती..एका मोठ्या ताटात पोहे... अशी ताटं मधे ठेवून आजही आमच्या गावात खाल्ले जातात. आमचं लेकरू खिमटी खायला लागलं की आधी त्याला पोहे चाखायला दिले जातात... पोहे आवडले की "कुर्धेकर आहे हो अगदी."..असे कौतुक सहज ऐकायला मिळते. कोकणात सकाळी मऊभात असला तरी कोणी पाहुणा आला की जरा पोहे टाक गं.. म्हणत गावठी मिरच्या नि कोथिंबीर घरात यायची. जावई घरी आला की सकाळी मऊ भाताऐवजी पोहेच येतात स्वागताला! कांदे ठराविक वारी खात असल्याने.. पोहे वेगवेगळ्या परसातल्या भाजीसोबत छान जुळवून घ्यायचे. दोडका सोलून किसून त्यासोबत भिजवून तर कधी दारची कोवळी वांगी!
बटाटे पोहे तर जीव की प्राण... मटार पोहे, भोपळी मिरची पोहे कधी कोबी पोहे, तर कधी टोमॅटो पोहे किती प्रकार!  फोडणीच्या पोह्यात उन्हाळ्यात कैरी येते तर इतरवेळी चिंचेचा कोळ लिंबाचं काम भागवतो.  फोडणीचे पोहे आणि कैरीचं लोणचं..किंवा मोहोरी चढलेली फोडणीची मिरची....अफलातून जोडी!! यात सगळ्यात आवडीचा प्रकार म्हणजे दडपे पोहे...हे बहुतेक संध्याकाळी व्हायचे. आता शहरात  दडपे पोहे होतात ते पातळ पोह्यांचे.. पण आमच्याकडे जाडे पोहेच वापरून दडपे पोहे असायचे. घरचे सणसणीत दोन नारळ फोडायचे, भरपूर खोबरं आणि नारळाच्या पाण्यात पोहे दडपून ठेवायचे. पोहे आणि नारळ ह्या गोष्टी कायम...आजूबाजूचे शिलेदार बदलायचे. कधी बारीक चिरलेला गूळ आणि किंचित मीठ ह्या नारळ पोह्यांना खमंग चव आणायचं तर कधी लसणीच्या तिखटाची हजेरी लागायची. कधी फोडणीची मिरची साथ द्यायची
तर कधी कांदा, फोडणी, सांडगी मिरची, कैरी असा जोरदार बेत असायचा. फारच भूक लागली तर पोहे थोड्या तेलावर परतून त्यात मेतकूट, तिखट मीठ आणि ओलं खोबरं...कुरकुरीत पोहे तयार! एखाद्यावेळी आजीला पोह्यांची उकड करायची लहर यायची.  कोळाचे पोहे हाही एक अप्रतिम चविष्ट प्रकार! चिंच, गूळ, मिरची नि नारळाचं दूध याचा कोळ करून त्यात पोहे भिजवून वर कोथिंबीर.. अहाहा! तुम्ही म्हणाल किती ते नखरे पोह्यांचे...असं अजिबात नाही..दही पोहे तर सोप्पे तितकेच चविष्ट..अगदी बाळकृष्ण सुध्दा आवडीने खायचा. दूध गूळ पोहे हा सुद्धा झटपट सोपा प्रकार! हे पोहे भाजून पीठ केलं की त्याचे खमंग लाडू होतात. कांदा पोह्यांचे सर्व साहित्य एकत्र करून त्याचे वडे पण सुंदर होतात, कधी पोहे भिजवून थालीपीठ करता येतं. पोह्यांचा चिवडा हा अलीकडे लोकप्रिय झालेला प्रकार... पण तोही तितकाच रुचकर ! पोह्यांचे पापड नि मिरगुंडं दडप्या पोह्यांसोबत काय भारी लागतात ना?  माझी आई पोह्यांच्या फेण्या सुद्धा अगदी पातळ, सुरेख करायची! असे हे बहुउपयोगी पोहे घरात असले की कितीही पाहुणे अचानक येवोत...दोन नारळ सरस फोडून स्वागताला तयार...काय खरं ना मंडळी... कधी येऊ मग पोहे खायला?
✍🏻 मीनल सरदेशपांडे

पनीर बुर्जी

पनीर बुर्जी:
 पनीर 200 ग्रॅम, 1 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून हळद, दोन कांदे, एक टॉमेटो, अर्धा टीस्पून गरम मसाला, दोन मिरच्यांचे बारीक तुकडे, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून धने पावडर, चवीनुसार मीठ, पाव टीस्पून जिरं,  कोथिंबीर
कृती: पनीर कुस्करून घ्या. कांदे सोलून चिरा. टॉमेटो धुवून चिरा. दोन्ही छोट्या चौकोनी फोडी करा. मिरच्या धुवून बारीक चिरा. कोथिंबीर धुवून बारीक चिरा. कढईत तेल तापवा. त्यात जिरं घाला. ते तडतडल्यावर कांदा घाला. दोन मिनिटं परता. टॉमेटो आणि मिरच्यांचे तुकडे घाला. परतत रहा. पाव टीस्पून मीठ घाला. हळद, तिखट, गरम मसाला घालून परतत रहा. आता पनीर घालून त्यावर उरलेले मीठ घाला, नीट मिक्स करून बारीक गॅसवर पाच मिनिटं ठेवा. चवीनुसार लागेल ते वाढवा. कोथिंबीर घालून पोळी सोबत सर्व्ह करा.
✍🏻 मीनल सरदेशपांडे