कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

पोहे पुराण

पोहे पुराण: 
मंडळी पोहे तसे आपल्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींशी निगडित आहेत...आठवतात का... किती जणांचे निर्णय चहा पोह्यांवर ठरले..चुकले... हा हा..तर असे हे पोहे! आपल्या कोकण वासीयांचं तर फार प्रेम या पोह्यांवर... पूर्वी घरचं भात येई. त्यामुळे दिवाळी घरच्या पोह्यांनी साजरी होई! भात रात्रभर भिजवून सकाळी टोपलीत काढायचे आणि त्यावर आधण पाणी ओतून भाजून घरी पोहे कांडले जात.. हळूहळू पोह्यांची गिरणी आली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नारळी भातासारखे गरमागरम गूळ नारळ पोहे केळीच्या पानावर घेऊन खाताना बाकी फराळाचा विसर पडत असे.
पूर्वी दिवाळीत कडबोळी, करंजी हेच मुख्य फराळाचे पदार्थ... दारावर येणाऱ्यांना एक कडबोळं, करंजी आणि भांडभर  गावठी पोहे दिले जात. गावातले अनेक उत्सव, लग्न कार्य, मांडव घालणे, पत्त्यांचे डाव यात अढळपदी पोहेच! यासाठी प्रत्येकाला वेगळी डिश, द्यायची पध्द्त नव्हती..एका मोठ्या ताटात पोहे... अशी ताटं मधे ठेवून आजही आमच्या गावात खाल्ले जातात. आमचं लेकरू खिमटी खायला लागलं की आधी त्याला पोहे चाखायला दिले जातात... पोहे आवडले की "कुर्धेकर आहे हो अगदी."..असे कौतुक सहज ऐकायला मिळते. कोकणात सकाळी मऊभात असला तरी कोणी पाहुणा आला की जरा पोहे टाक गं.. म्हणत गावठी मिरच्या नि कोथिंबीर घरात यायची. जावई घरी आला की सकाळी मऊ भाताऐवजी पोहेच येतात स्वागताला! कांदे ठराविक वारी खात असल्याने.. पोहे वेगवेगळ्या परसातल्या भाजीसोबत छान जुळवून घ्यायचे. दोडका सोलून किसून त्यासोबत भिजवून तर कधी दारची कोवळी वांगी!
बटाटे पोहे तर जीव की प्राण... मटार पोहे, भोपळी मिरची पोहे कधी कोबी पोहे, तर कधी टोमॅटो पोहे किती प्रकार!  फोडणीच्या पोह्यात उन्हाळ्यात कैरी येते तर इतरवेळी चिंचेचा कोळ लिंबाचं काम भागवतो.  फोडणीचे पोहे आणि कैरीचं लोणचं..किंवा मोहोरी चढलेली फोडणीची मिरची....अफलातून जोडी!! यात सगळ्यात आवडीचा प्रकार म्हणजे दडपे पोहे...हे बहुतेक संध्याकाळी व्हायचे. आता शहरात  दडपे पोहे होतात ते पातळ पोह्यांचे.. पण आमच्याकडे जाडे पोहेच वापरून दडपे पोहे असायचे. घरचे सणसणीत दोन नारळ फोडायचे, भरपूर खोबरं आणि नारळाच्या पाण्यात पोहे दडपून ठेवायचे. पोहे आणि नारळ ह्या गोष्टी कायम...आजूबाजूचे शिलेदार बदलायचे. कधी बारीक चिरलेला गूळ आणि किंचित मीठ ह्या नारळ पोह्यांना खमंग चव आणायचं तर कधी लसणीच्या तिखटाची हजेरी लागायची. कधी फोडणीची मिरची साथ द्यायची
तर कधी कांदा, फोडणी, सांडगी मिरची, कैरी असा जोरदार बेत असायचा. फारच भूक लागली तर पोहे थोड्या तेलावर परतून त्यात मेतकूट, तिखट मीठ आणि ओलं खोबरं...कुरकुरीत पोहे तयार! एखाद्यावेळी आजीला पोह्यांची उकड करायची लहर यायची.  कोळाचे पोहे हाही एक अप्रतिम चविष्ट प्रकार! चिंच, गूळ, मिरची नि नारळाचं दूध याचा कोळ करून त्यात पोहे भिजवून वर कोथिंबीर.. अहाहा! तुम्ही म्हणाल किती ते नखरे पोह्यांचे...असं अजिबात नाही..दही पोहे तर सोप्पे तितकेच चविष्ट..अगदी बाळकृष्ण सुध्दा आवडीने खायचा. दूध गूळ पोहे हा सुद्धा झटपट सोपा प्रकार! हे पोहे भाजून पीठ केलं की त्याचे खमंग लाडू होतात. कांदा पोह्यांचे सर्व साहित्य एकत्र करून त्याचे वडे पण सुंदर होतात, कधी पोहे भिजवून थालीपीठ करता येतं. पोह्यांचा चिवडा हा अलीकडे लोकप्रिय झालेला प्रकार... पण तोही तितकाच रुचकर ! पोह्यांचे पापड नि मिरगुंडं दडप्या पोह्यांसोबत काय भारी लागतात ना?  माझी आई पोह्यांच्या फेण्या सुद्धा अगदी पातळ, सुरेख करायची! असे हे बहुउपयोगी पोहे घरात असले की कितीही पाहुणे अचानक येवोत...दोन नारळ सरस फोडून स्वागताला तयार...काय खरं ना मंडळी... कधी येऊ मग पोहे खायला?
✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा