कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, २४ मार्च, २०१९

साबुदाणा खिचडी:

साबुदाणा खिचडी:



  • साहित्य:
  •  एक कप साबुदाणा,
  •  तूप एक टेबलस्पून,
  •  दाण्याचं कूट 1टेबलस्पून,
  • ओलं खोबरं 1 टेबलस्पून, 
  • मीठ 1 टीस्पून, 
  • साखर एक टीस्पून, 
  • आलं पेस्ट टीस्पून,
  •  एक उकडलेला बटाटा,
  •  चार पाच ओल्या मिरच्या, 
  • एक टीस्पून लिंबू रस, 
  • जीरं अर्धा टीस्पून
  • कृती:
  • साबुदाणा धुवून थोडं पाणी घालून रात्रभर भिजत घालावा. 
  • सकाळी बटाटा शिजवून घ्यावा. 
  • साबुदाणा मोकळा करून घ्यावा.
  •  त्यात दाण्याचं कूट, खोबरं, मीठ, साखर, आलं पेस्ट एकत्र करावी.
  •  नीट मिक्स करून घ्यावे. 
  • बटाटा सोलून चिरून घ्यावा. 
  • कढईत तूप तापत ठेवावे. 
  • त्यात जीरं घालावं.
  •  ते तडतडल्यावर मिरचीचे तुकडे घालून परतावे. 
  • बटाटा फोडी घालून परतावे.
  •  थोडं मीठ फोडींवर भुरभुरावे.
  •  तयार मिश्रण घालून नीट ढवळावी.
  • पाच मिनिटं झाकण ठेवावी.
  • साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत शिजवावी.
  • खायला देताना कोथिंबीर, दहयासोबत द्यावी.
  • ✍🏻मिनल सरदेशपांडे

लिंबाचे टिकाऊ सरबत:

लिंबाचे टिकाऊ सरबत:
 काल एका मैत्रिणीने छान घरची लिंबं दिली होती. उन्हाळ्याची सोय करून ठेवली.


  • साहित्य: 1 कप(250ml) लिंबू रस, 
  • साखर अडीच कप,
  •  दोन टीस्पून वेलची पावडर, 
  • थोडया केशर काड्या,
  •  मीठ दोन टीस्पून, 
  • पाणी 1 कप
  • .कृती:लिंबं स्वच्छ धुवा आणि पुसून घ्या. 
  • लिंबाचा रस काढा, मोजून घ्या. मला 18 लिंबं लागली 1 कप रसाला.
  •  रस गाळून घ्या. 
  • एका पातेल्यात साखर घ्या त्यात पाणी घालून पाक करत ठेवा. 
  • गोळीबंद पाक करा. वाटीत पाणी घेऊन त्यात थेंब टाकून पहा. मऊ गोळी झाली की गॅस बंद करा. 
  • पाकात लिंबू रस, वेलची पावडर, केशर, मीठ घाला. 
  • नीट ढवळा.
  •  पूर्ण गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा. 
  • बाहेर पण टिकतं.
  • करायला घेताना ग्लासभर पाण्यात दोन चमचे तयार सिरप लागलं तर मीठ आणि बर्फ घालून गारेगार सर्व्ह करा.

✍🏻मिनल सरदेशपांडे

लिंबू चटणी/ सॉस/लोणचे:

लिंबू चटणी/ सॉस/लोणचे


  • लिंबाच्या फोडी एक कप,
  •  गूळ अडीच कप
  •  मीठ एक टेबलस्पून, 
  • लाल तिखट 2 टेबलस्पून, 
  • जीरं पावडर दोन टीस्पून
  • कृती:
  •  लिंबं स्वच्छ धुवून पुसून घ्या. 
  • प्रत्येकी 8 फोडी करा.
  •  सगळ्या बिया व्यवस्थित काढून घ्या.
  •  बी राहिली तर कडवटपणा येतो. 
  • लिंबाच्या फोडी वाफवून घ्या. 
  •  गार करून मिक्सरला फिरवा.
  •  त्यात बारीक चिरलेला गूळ, मीठ, लाल तिखट आणि जीरं पावडर घालून मिक्स करा. 
  • परत एकदा मिक्सरला फिरवून घ्या.
  •  तयार लोणचं काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवा.
  • ✍🏻 मिनल सरदेशपांडे

शनिवार, २३ मार्च, २०१९

खपली गव्हाचे गुलगुले

खपली गव्हाचे गुलगुले:


 रेसीपी नेमकी कोणत्या भागातली आहे ते नाही माहीत पण कॉलेजमध्ये असताना एका मैत्रिणीकडे खाल्ले होते ती चव स्वस्थ बसू नेत नव्हती. आज केला प्रयत्न, आणि काय सांगू परफेक्ट चव जमलीय अहाहा!!

साहित्य:
अर्धा कप गूळ, अर्धा कप पाणी, एक कप कणिक(मी खपली गव्हाची वापरली), दोन टीस्पून रवा, एक टीस्पून सुंठ पावडर, अर्धा टीस्पून मीठ, पाव टीस्पून वेलची पावडर, पाव टीस्पून जायफळ पावडर,  पाव कप ओलं खोबरं,  अर्धा टीस्पून खायचा सोडा, तेल तळणीसाठी

कृती:
  अर्धा कप  बारीक चिरलेला गूळ आणि अर्धा कप पाणी एकत्र करा
. त्यात मीठ, सुंठ पावडर, खोबरं घाला.
गूळ पूर्ण विरघळला की त्यात कणिक, रवा मिसळा.
मिश्रण चार पाच तास झाकून ठेवा.
 करायला घेताना त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर, खायचा सोडा घालून मिश्रण फेटा.
कढईत तेल तापत ठेवा.
तेल तापलं की गॅस बारीक करून छोटे छोटे गोळे सोडा.
 मध्यम गॅस करून बदामी रंगावर तळा.
मस्त  हलके गुलगुले तयार आहेत!

शुक्रवार, २२ मार्च, २०१९

भाजणीचे वडे:

भाजणीचे वडे: कोकणात बऱ्याच ठिकाणी होळीला भाजणीचे वडे करायची पध्द्त आहे.

साहित्य:
भाजणीसाठी: 
एक की तांदूळ, अर्धी की चणाडाळ, पाव की उडीद, पाव की जोंधळे, एक वाटी पोहे, एक वाटी साबुदाणा, एक वाटी धने, अर्धी वाटी जीरे

वड्यांसाठी: एक कप भाजणी, दोन टीस्पून तेल, मीठ, एक टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून ओवा, तेल तळणीसाठी, पाणी

कृती: भाजणीसाठी सांगितलेलं सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. एकत्र करून थोडं सरसरीत दळून आणा. तयार भाजणी एक कप(250ml) घ्या. त्यात तिखट, मीठ, ओवा, तेल मिक्स करा. पाऊण कप पाणी गरम करा. तयार पिठावर घालून उलथ्याने मिक्स करा. थोडं गार झालं की पीठ मळून घ्या, लागलं तर थोडं गार पाणी घ्या. छोटे गोळे करून घ्या. केळीच्या पानावर किंवा जाड प्लॅस्टिक पिशवीवर थापा.
आवडत असेल तर मध्ये भोक पाडा. कढईत तेल गरम करून वडे तळून घ्या.
फोडणीची मिरची, दही, लोणी आणि वडे... अहाहा!

टीप: काही जण भाजणीत हरभरे घालतात पण त्यामुळे वडे खाल्ल्यावर जळजळ होते म्हणून मी चणाडाळ वापरते. तुम्ही डाळ आणि हरभरे निम्मे निम्मे घेऊ शकता.
भाजणी भाजताना अति लालसर भाजू नका त्यामुळे ही खाताना जळजळ होते.
तेल किंवा पाणी यातील काही तरी एकच गरम घाला...शक्यतो पाणीच! दोन्ही गरम घातल्यास वडे तेलकट होतात.

सोमवार, १८ मार्च, २०१९

भरलं पडवळ:

भरलं पडवळ:

साहित्य: 
पडवळ अर्धा की, ओल खोबरं एक वाटी, सुकं खोबरं एक वाटी, अर्धी वाटी दाण्याचं कूट,  एक टेबलस्पून पांढरे तीळ, बेसन एक टेबलस्पून, अर्धा टीस्पून लाल तिखट, मीठ, चिंचेचा कोळ अर्धा टीस्पून, साखर अर्धा टीस्पून, कोथिंबीर एक वाटी बारीक चिरून

फोडणीसाठी: तेल एक टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून, हळद पाव टीस्पून

कृती
पडवळ स्वच्छ धुवून एक इंचाचे तुकडे करावे. बिया काढून तुकडे चाळणीवर वाफवायला ठेवावे.  सुकं खोबरं भाजून घ्यावं. दोन्ही खोबरं, दाण्याचं कूट, तीळ, साखर, मीठ, तिखट, चिंचेचा कोळ, बेसन एकत्र करून घ्यावे. त्यात कोथिंबीर मिक्स करावी.
चव बघून काही हवं असल्यास वाढवावे. तोपर्यंत पडवळाचे तुकडे शिजतील, ते गार करत ठेवावे. गार झाले की सारण प्रत्येक तुकड्यात भरून घ्यावे.
पसरट कढईत तेल तापत ठेवावे. मोहोरी, हळद घालून झाली की गॅस मंद ठेवून भरलेले तुकडे नीट लावावेत. झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ येऊ द्यावी. झाऱ्याने अलगद तुकड्यांची बाजू परतावी. दुसरी बाजू नीट परतली की भाजी तयार!

रविवार, १७ मार्च, २०१९

कलिंगडाची टुटीफ्रुटी:

कलिंगडाची टुटीफ्रुटी:


मी लग्नाआधी पपईची टुटीफ्रुटी करून गावातल्या बेकरीत देत असे. त्यावरून सहज कल्पना सुचली कलिंगडाची करून पाहूया. असाही आत्ता कलिंगडाचा सिझन पण आहेच. या पांढऱ्या भागाची किसून थालीपीठ करू शकतो. थोडा वेगळा प्रयोग करून पाहिला आणि खरंच मस्त झाली टुटीफ्रुटी!

साहित्य:
 कलिंगडाचा पांढरा भाग बारीक चिरून दोन वाट्या, साखर दोन वाट्या, पाणी, व्हॅनिला इसेन्स, आवडीप्रमाणे रंग

कृती: १)कलिंगडाच्या पांढऱ्या भागाची साल काढून बारीक चौकोनी करा. 
२)एका पातेल्यात चार पाच वाट्या पाणी उकळून त्यात फोडी घालून दहा मिनिटं उकळाव्यात. 
३) चाळणीवर काढाव्यात.
 ४)पातेल्यात दोन वाट्या साखर आणि एक वाटी पाणी घेऊन एक तारी पाक करावा.
 ५)वाफवलेल्या फोडी घालून उकळावे.
 ६)पाक परत पातळ होईल. परत एक तारी होऊ द्यावा.
 ७)गॅस बंद करून थोडं गार झाल्यावर दहा बारा थेंब व्हॅनिला इसेन्स  घालून मिक्स करावा.  
८)तीन वाट्यांमध्ये तयार मिश्रण सारखे काढा.
त्यात आवडीप्रमाणे दोन दोन थेंब रंग घालून बारा तास तसेच झाकून ठेवा. 
९)त्यानंतर एकेक  रंगाच्या फोडी गाळण्यावर काढा.
१०) जास्तीचा पाक गेला की पसरट जाळीवर फोडी ठेवा. त्याखाली ताट ठेवून फोडी सुकू द्या. 
११)फोडी सुकल्या की झाली टुटीफ्रुटी तयार! 

रवा केक:



रवा केक:

साहित्य: 
बारीक रवा एक कप(250ml), सनफ्लॉवर तेल 100ml, मिल्कमेड 200g, अर्धा टीस्पून खायचा सोडा, एक टीस्पून बेकिंग पावडर, एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स, साखर नेहमीची पाच टीस्पून, मीठ अगदी चवीपुरते, दूध पाऊण कप, लिंबू रस एक टीस्पून.

कृती: १)मिल्कमेड, तेल एकत्र करून फेटा.
 २)जर बारीक रवा घरात नसेल तर नेहमीचा रवा मिक्सरला फिरवून घ्या.
 ३)फेटलेल्या मिश्रणात रवा घालून परत फेटा.
४) हळूहळू दूध घालत रहा. 
५)व्हॅनिला इसेन्स घालून अर्धा तास मिश्रण झाकून ठेवा. 
६)अर्ध्या तासाने कढईत दीड वाटी मीठ पसरून कढई पाच मिनिटं मोठ्या फ्लेमवर तापत ठेवा.
 ७)तोपर्यंत मिश्रणात लिंबूरस, मीठ मिक्स करा.
 ८)केकच्या भांड्याला आतून तूप लावून घ्या. 
९)खायचा सोडा, बेकिंग पावडर, साखर घालून एक दिशेने मिश्रण नीट फेटा. 
१०)कढईत मिठावर जाळी ठेवा. 
११)केकच्या भांडयात मिश्रण ओतून अलगद जाळीवर ठेवा.
 १२)कढईवर झाकण ठेवा.
 १३)गॅसची फ्लेम दहा मिनिटं मध्यम ठेवा. 
१४)पुढची 25 मिनिटं बारीक फ्लेमवर ठेवा. 
१५)आता झाकण काढून सुरी घालून केक झालाय का पहा. 
१६)झाल्यावर बाहेर काढून गार करत ठेवा. 
१७)गार झाला की ताटात भांडं उपडं करा.
 १८)मस्त बाहेर सारखा केक तयार आहे.

टीप: मिल्कमेड घरी सुध्दा करू शकता. अर्धा ली दूध आणि पाऊण वाटी साखर आटवून घ्या, मिल्कमेड इतपत घट्ट झालं की गॅस बंद करा.. 200 ग्रॅम तयार होईल.

चटपटीत शंकरपाळे:

चटपटीत शंकरपाळे:

एखादया माणसाची आपल्याला इतकी सवय होऊन जाते ना की कोणत्याही त्याच्या आवडीच्या गोष्टी करताना आठवण येतेच. आपली माणसं कितीही वर्ष असली तरी ती हवीशी असतात. तसं असलं तरी सगळ्या गोष्टी आपल्या हातात थोड्याच असतात?
23 फेब्रुवारीला माझी आई आम्हाला पोरकं करून निघून गेली. तिच्या प्रत्येक फोनवर ती कुठेतरी वाचलेली नवीन रेसीपी मला सांगायची. किती छान झालेलं हे वर्णन भरभरून करायची. मुख्यतः ज्या गोष्टी फुकट जातील त्यापासून खूप काही बनवायची ती! फेण्या, पापड, कुरडई हे तिच्या अत्यन्त आवडीचे विषय! फणसाचे पापड, रताळ्याच्या, सुरणाच्या, पोह्यांच्या फेण्या मला तर प्रकार पण माहीत नाहीत. नियमितपणे रोज एक छोटा गोळा भिजवायचाच. आत्ताही लेबल लावून नाव लिहून पॅक केलेल्या फेण्या आहेत तिच्या, शेवटपर्यंत ती स्वावलंबी होती.

तिच्या इतकं नाही तरी करीत राहीन काहीतरी असं सांगितलंय मी तिला!

आज मटार करंजी केली त्याचा रवा मैदा भिजवलेला उरला थोडा, मग त्याची पोळी लाटली. त्यावर जीरावन मसाला पसरला, घडीच्या पोळी सारखी घडी करून पोळी लाटली आणि केले शंकरपाळे! मस्त चटपटीत, कुरकुरीत झालेत! चहा आणि सोबत शंकरपाळे.. अहाहा!

खपली गव्हाची खीर:

खपली गव्हाची खीर:


खपली गहू एक वाटी, गूळ एक वाटी, ओलं खोबरं एक वाटी, काजूगर, बदाम काप, जायफळ पावडर पाव टीस्पून, वेलची पावडर पाव टीस्पून, तूप दोन टीस्पून, नारळाचं दूध दोन वाट्या

कृती: 
गव्हाला टरफल असेल तर पाण्याचा हात लावून फडक्यावर चोळून पाखडून घ्या. तासभर गहू भिजत घाला. तासाभराने बाहेर काढून कापडावर पसरून ठेवा, ओलसरपणा जाऊ द्या. भिजलेले गहू मिक्सरला भरडसर वाटून घ्या.
तिप्पट पाणी घालून कुकरमध्ये घालून गहू शिजवून घ्या. कढईत तूप घालून मंद गॅसवर ठेवा. त्यात काजूचे तुकडे, बदाम काप परतून बाजूला ठेवा. शिजलेले गहू तुपात घालून परता. त्यात गूळ, खोबरं घालून शिजू द्या. अगदी थोडं पाणी घाला. जायफळ पावडर, वेलची पावडर घाला. परतलेले काप घालून सजवा. नारळाचं दूध काढून ठेवा. जेवताना आवडीप्रमाणे नारळाचं दूध घालून फस्त करा... मस्त खमंग लागते

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

सफरचंदाची पोळी:

सफरचंदाची पोळी:

बऱ्याच वेळा पेशन्ट ला बघायला जाताना लोकं फळं घेऊन जातात. खूप सारी फळं आली की एखादा प्रयोगशील पेशन्ट असं काहीतरी करतो!
साहित्य: सफरचंदाचा किस एक वाटी, साखर पाऊण वाटी, दूध अर्धी वाटी, दूध पावडर 40 ग्रॅम( 10 रु ची दोन पाकिटं), वेलची पावडर, तूप एक चमचा

पारीसाठी: एक वाटी कणिक, एक चमचा बेसन, दीड चमचा तांदूळ पिठी, मीठ, दीड चमचा तेल
कृती: कणकेत तांदूळ पिठी, बेसन, मीठ आणि तेल घालून नेहमीच्या पोळ्यांसारखी भिजवा. झाकून ठेवा. सफरचंदाची सालं काढून किसून घ्या. कढईत तूप घाला. त्यात किसलेलं सफरचंद घालून दोन मिनिटं परता. आता त्यात दूध, साखर घाला. ढवळत रहा.
घट्ट होऊ लागलं की दूध पावडर आणि वेलची पावडर घाला. घट्ट होऊ लागलं की गॅस बंद करून गार करत ठेवा.खूप घट्ट झालं तर वड्या पडतील.. थोडं मऊ असू द्या.
तरी घट्ट वाटलं तर दुधाच्या हाताने मळून घ्या. कणकेचा छोटा गोळा घ्या. त्याची वाटी करून कणके पेक्षा थोडा छोटा गोळा त्यात भरून उंडा तयार करा.
कणकेवर लाटा. तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्यासाजूक तुपासोबत फस्त करा...अगदी खव्याच्या पोळी सारखी लागते.

टीप: 1)पोळी कातण्याने कातली तर दोन कारणं असतात एक तर कणिक आणि सारण सारखं पसरलं नाही.
2)दुसरं म्हणजे छान दिसावं म्हणून!
3) माझी आई साखर विरघळली की त्यातच कणिक घालून भिजवते आणि त्याची पोळी करते, भरत नाही.
4) पोळ्या करायच्या नसतील तर सारण अजून थोडं घट्ट करा आणि वड्या थापा!
एका वाटीत आठ पोळ्या झाल्या.

सफरचंदाचे घारगे:

सफरचंदाचे घारगे:

 सफरचंद जरी काश्मीरला होत असलं तरी त्याला आमच्या कोकणी हुकमी एक्के वापरून अगदी कोकणी करून टाकलं! तांदूळ पिठी, गूळ आणि खोबरं मग चव काय अफलातून येणारच!
एक सफरचंद
पाऊण वाटी गूळ
मीठ
पाव चमचा हळद
पाव वाटी ओलं खोबरं
दीड वाटी तांदूळ पिठी
एक वाटी कणिक
दोन चमचे तेल पिठात घालायला
तेल तळणीसाठी
कृती:
सफरचंद धुवून साल काढा. सफरचंद किसून घ्या. 
कीस मोजा, एक वाटी किसाला पाऊण वाटी गूळ, चवीपुरते मीठ, दोन चमचे तेल,ओलं खोबरं, हळद घालून गॅसवर ठेवा.
गूळ विरघळला की गॅसवरून उतरवा.
लगेच दोन्ही पिठं मिक्स करा.
घट्ट गोळा बनवा.

छोट्या गोळ्या करून घ्या.
प्लॅस्टिक कागद किंवा केळीच्या पानावर थापून किंवा लाटून घारगे करा.
कढईत तेल तापवून घारगे तळा.
साजूक तूप किंवा लोण्यासोबत झकास लागतात.


कच्च्या टॉमेटोची चटणी:

कच्च्या टॉमेटोची चटणी:

साहित्य:
 कच्चे टॉमेटो अर्धा की, एक टेबलस्पून तेल, दोन टेबलस्पून दाण्याचं कूट, एक टेबलस्पून ओलं खोबरं, गूळ एक टेबलस्पून, मीठ, तिखट अर्धा टीस्पून, हळद पाव टीस्पून, मोहोरी पाव टीस्पून.

कृती: 
टॉमेटो धुवून बारीक चिरावेत. कढईत तेल तापवावे. त्यात मोहोरी घालावी, ती तडतडली की हळद, तिखट घालावं. टॉमेटो घालून परतावं. झाकण ठेवून दहा मिनिटं वाफ येऊ द्यावी. झाकण काढून मीठ, गूळ घालून मंद गॅसवर परतत रहावं. फोडी मऊ झाल्या की दाण्याचं कूट, खोबरं घालून परतत रहावं. तेल सुटलं की गॅस बंद करावा. पोळी सोबत आस्वाद घ्यावा. 

कैरीचा साखरांबा:

कैरीचा साखरांबा:

साहित्य: कैरीचा किस एक वाटी, साखर एक वाटी, तीन लवंगा, पाव चमचा वेलची पावडर
कृती: कैरी स्वच्छ धुवून साल काढून घ्या. कैरी किसून घ्या. मोजून घ्या. जेवढा किस तेवढी साखर एकत्र करा. लवंग घालून तासभर झाकून ठेवा. तासाभराने पातेलं गॅसवर ठेवून कढवा. ढवळत रहा. वेलची पावडर घाला. डिशमध्ये थेंब टाकून पसरत नाही ना पहा. गार झाल्यावर साखरांबा अजून घट्ट होतो. 
आंबटगोड मस्त साखरांबा तयार आहे. 

टीप: साखरेऐवजी गूळ वापरूनही करता येतो. कैरीच्या आंबटपणावर साखरेचे प्रमाण बदलेल.

गाजराची भजी:

गाजराची भजी:

हो हो मला माहित आहे गाजर कच्चं खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं, तळणीचे पदार्थ सारखे खाऊ नयेत... वगैरे वगैरे! कधी कधी काय होतं एखादया पदार्थावर सगळेच रुसतात... किती निगुतीने केलं तरी आज इच्छा नाही, मी भातच खाईन, बाहेर खाणं झालंय.. अशी कारणं देऊन जेवतच नाहीत. तर अशीच रात्री केलेली गाजराची कोशिंबीर चांगला वाडगाभर उरली. आता बारा पंधरा माणसात एवढी उरली म्हणजे अंदाज नाही मला असं समजू नका हो...होतं असं कधी कधी!

अशी उरलेली कोशिंबीर सकाळी काढली बाहेर... थोडं तिखट, मीठ वाढवलं. दोन कांदे अर्धे लांब चिरून घातले. चार चमचे मक्याचं सत्त्व आणि थोडं डाळीचं पीठ घालून मिश्रण एकत्र केलं आणि गरमागरम भजी तळली. काय सांगू तुम्हाला काल न खाणारे सगळे आले पटापट...कसाबसा फोटो काढला! 

बरेचदा मी असं काही उरलं थालिपीठ करते...तुम्ही काय करता?