कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २२ मार्च, २०१९

भाजणीचे वडे:

भाजणीचे वडे: कोकणात बऱ्याच ठिकाणी होळीला भाजणीचे वडे करायची पध्द्त आहे.

साहित्य:
भाजणीसाठी: 
एक की तांदूळ, अर्धी की चणाडाळ, पाव की उडीद, पाव की जोंधळे, एक वाटी पोहे, एक वाटी साबुदाणा, एक वाटी धने, अर्धी वाटी जीरे

वड्यांसाठी: एक कप भाजणी, दोन टीस्पून तेल, मीठ, एक टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून ओवा, तेल तळणीसाठी, पाणी

कृती: भाजणीसाठी सांगितलेलं सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. एकत्र करून थोडं सरसरीत दळून आणा. तयार भाजणी एक कप(250ml) घ्या. त्यात तिखट, मीठ, ओवा, तेल मिक्स करा. पाऊण कप पाणी गरम करा. तयार पिठावर घालून उलथ्याने मिक्स करा. थोडं गार झालं की पीठ मळून घ्या, लागलं तर थोडं गार पाणी घ्या. छोटे गोळे करून घ्या. केळीच्या पानावर किंवा जाड प्लॅस्टिक पिशवीवर थापा.
आवडत असेल तर मध्ये भोक पाडा. कढईत तेल गरम करून वडे तळून घ्या.
फोडणीची मिरची, दही, लोणी आणि वडे... अहाहा!

टीप: काही जण भाजणीत हरभरे घालतात पण त्यामुळे वडे खाल्ल्यावर जळजळ होते म्हणून मी चणाडाळ वापरते. तुम्ही डाळ आणि हरभरे निम्मे निम्मे घेऊ शकता.
भाजणी भाजताना अति लालसर भाजू नका त्यामुळे ही खाताना जळजळ होते.
तेल किंवा पाणी यातील काही तरी एकच गरम घाला...शक्यतो पाणीच! दोन्ही गरम घातल्यास वडे तेलकट होतात.

२ टिप्पण्या: