कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

सोमवार, २१ जुलै, २०२५

पिक्क्या टॉमेटोची चटणी

 

टॉमेटो चटणी:



साहित्य: पाच पूर्ण पिकलेले टॉमेटो, पाच सहा सुक्या मिरच्या, अर्धी वाटी खोबरे, पाच सहा लसूण पाकळ्या, मीठ, एक टिस्पून लाल तिखट, एक ते दीड टिस्पून साखर, अर्धा टिस्पून जिरं पावडर.
फोडणीसाठी एक टिस्पून तेल, पाच सहा कढीलिंबाची पाने, जिरं आणि हिंग

कृती: टॉमेटो चिरून बिया काढून घ्या. मध्यम फोडी करा. एक टिस्पून तेलावर आधी लसूण पाकळ्या घालून दोन मिनिटं परता. आता टॉमेटो घालून त्याचा कच्चा वास जोपर्यंत
जात नाही तोपर्यंत परतत रहा.
गॅस बंद करून गार होऊ द्या. परतलेला टॉमेटो, भिजवलेल्या मिरच्या, खोबरं, मीठ, साखर, जिरं पावडर आणि तिखट एकत्र करून बारीक वाटून घ्या.
चव बघून काही लागलं तर वाढवा.
आता फोडणीसाठी तेल तापवून त्यात जिरं, हिंग, कढीलिंबाची पाने आणि गॅस बंद करून किंचित तिखट घालून ही फोडणी चटणीला द्या.

#मिनलरेसिपीज
#चटणी
#डोसा
#नाश्ता
✍🏻 मीनल सरदेशपांडे

मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

कच्च्या कैरीचे गूळ घालून पन्हे

 नमस्कार मंडळी,  आजचा मुख्य पदार्थ

 कच्च्या कैरीचे पन्हे:


साहित्य: एक कैरी फोडी करून, त्याच्या दुप्पट गूळ, एखादी मिरची, भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा, मीठ.


कृती: कैरीच्या फोडी, मिरची, गूळ, जिरं पावडर आणि मीठ सगळं एकत्र करून बारीक वाटून घ्या.

गाळून घेऊन साधारण पाच पट तरी पाणी लागेल. चव बघून काही हवं तर वाढवा. 


टीप: हे टीकाऊ सरबत नाही. किंचित मिरचीचा झटका छान लागतो.

शिजवून कैरी पण करतात हे झटपट होते. माझ्याकडे भोपळी आंबा होता पण चांगला आंबट आहे त्यामुळे मस्त झालं. 


#उन्हाळा 

#मिनलरेसिपिज #नाश्ता 

#रोजचास्वयंपाक 

#पन्हं

कैरी भेंडी फ्राय

 साहित्य: अर्धा किलो भेंडी, अर्धी वाटी किसलेली कैरी, अर्धी वाटी ओलं खोबरं, एक टेबलस्पून तीळ, मीठ,साखर, तिखट, फोडणीचे साहित्य



कृती: भेंडी धुवून पुसून काचऱ्या करून घ्या.

कैरी किसून घ्या. कढईत तेल तापत ठेवा त्यात मोहरी घाला ती तडतडली की लगेच भेंडी घालून घ्या, भेंडी परतत ठेवा त्यातच किसलेली कैरी पण घाला. दोन्हीही मंद गॅसवर परतत राहा. दहा मिनिटांनी भेंडीचा रंग बदलला की त्यात मीठ साखर हळद तिखट हे सगळं घालून नीट मिक्स करून घ्या परत एकदा भेंडी परतत ठेवा. 

आता त्यात ओलं खोबरं भाजलेले तीळ बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं घालून परत एकदा नीट मिक्स करा, चव बघा काही हवं असेल तर वाढवा आणि पुन्हा दोन मिनिटे परतून सर्व्ह करा.


सोमवार, १४ एप्रिल, २०२५

दही कारली

 नमस्कार मंडळी😊

बऱ्याच दिवसात काही लिहायला वेळ झाला नाही  झाल्यावर फोटो काढून ठेवत होते पण थोडी तब्येतीची कुरबुर त्यात ऑर्डरचा सपाटा त्यामुळे वेळ नव्हता होत.



दही कारली: आत्ता थंडावा देणाऱ्या गोष्टी या भाजीत वापरल्या आहेत. मी चणे घेतलेत तिथे डाळ्याचे पीठ पण घेऊ शकता.

साहित्य: एक वाटी कारल्याच्या फोडी, एक वाटी कांदा चिरून, एक वाटी दही, एक टेबलस्पून साल काढून चणे, एक चमचा लाल तिखट, एक चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरं पूड, दोन चमचे साखर, मीठ, कोथिंबीर. फोडणीचे साहित्य.


कृती: कारली बिया काढून पातळ 

काचऱ्या करून घ्या. कांदे पण अर्धेलांब चिरा. कारली मीठ लावून ठेवा.

चणे बारीक करून घ्या. दही फेटून घ्या. त्यात चण्याचे पीठ, धने पावडर, जिरं पावडर, तिखट हे सर्व मिक्स करून घ्या.

 कढईत तूप तापत ठेवा. त्यात जिरं, हिंग, हळद अशी फोडणी करा.

आता त्यात कांदा परतायला घाला.

कारली पिळून पाणी काढून ती पण परतायला घाला. पाच मिनिटं मंद आचेवर दोन्हीही व्यवस्थित परतून घ्या.

 आता त्यात थोडं मीठ, साखर घालून परत परतून घ्या. तयार दह्याचे मिश्रण घाला. कोथिंबीर बारीक चिरून घाला.

लागले तर थोडं पाणी घाला. व्यवस्थित उकळी येऊ द्या. चव बघून जे हवं ते वाढवा. छान लागते ही भाजी बघा करून!


टीप: आपण कारल्याच्या काचऱ्या 

मीठ लावून ठेवल्या होत्या त्यामुळे मीठ चव बघून घाला. पिळून घेतल्यावर थोडं कमी होतं.  किंचित कडवट चव लागतेच म्हणजे कारल्याची भाजी आहे एवढं कळतं. चणे घातल्याने दही फुटत नाही.

✍️ मीनल सरदेशपांडे

सोमवार, ३१ मार्च, २०२५

कुळीथपिठाचीगुळपापडी

 #कुळीथपिठाचीगुळपापडी


आपल्या कोकणात होणारे अतिशय पौष्टिक असे हे कुळीथ! मला असं वाटतं ज्या हवेत जे पिकतं ते खावं...तेच आपल्या हवामानाला आणि प्रकृतीला चांगलं असतं.

माझी आजी हे कुळथाचे लाडू तूप कढवलं की हमखास करायची. आत्ता  हिवाळ्यात कुळीथ खावेत..कारण ते पित्तकर आणि उष्ण आहेत. आज त्याची गूळ पापडी केलीय.

साहित्य: कुळीथ पीठ दोन वाट्या, गूळ पावणे दोन वाट्या, तूप एक वाटी, एक वाटी सुकं खोबरं, जायफळ पावडर पाव टीस्पून, सुंठ पावडर दोन टीस्पून, पाव वाटी खसखस, खारीक पावडर पाव वाटी,

कृती: कुळीथ भाजून भरडून घ्यावेत. पाखडून साल काढून घ्यावी. थोडे सरसरीत दळून आणावेत.

आपल्याकडे घरात कुळीथ पीठ पिठल्यासाठी असतं तेही वापरायला हरकत नाही. गूळ किसून घ्या. सुकं खोबरं किसून खमंग भाजून घ्या. खसखस भाजून घ्या. गार झालं की खोबरं चुरून घ्या. तूप आणि पीठ एकत्र करून भाजायला ठेवा. मुळात कुळीथ भाजलेले असल्याने फार वेळ लागत नाही. हे मिश्रण थोडं 

सैल दिसलं पाहिजे. सुकं वाटत असेल तर थोडं तूप वाढवा. आता या पिठात सुंठ पावडर खारीक पावडर जायफळ पावडर खोबरं खसखस सगळं मिक्स करा. थाळ्याला तुपाचा हात लावून घ्या. गॅस बंद करून मिश्रणात गूळ घालून पटापट मिक्स करा.  गूळ विरघळला की  मिश्रण ताटात थापून वड्या पाडा. मी वरती तीळ लावलेत.


टीप: 


गुळाला पर्याय म्हणून उगाच पिठीसाखर घालून चव बिघडवू नका.

 यात तुपाची बेरी पण घालतात त्यामुळे आणखी खमंग लागते!

✍🏻मीनल सरदेशपांडे

रवा भजी

 रवा भजी:


   लेक येता घरा तोचि दिवाळी दसरा... त्यामुळे सध्या नवीन काय काय सुरू आहे.

त्याला भजी प्रकार खूप आवडतात. आज रव्याची भजी केली.

साहित्य: दोन वाट्या बारीक रवा, एक वाटी ताक, ओव्याची पाने दहा बारा, दोन गाजरं, तीन कांदे, मिरचीचे बारीक तुकडे, तिखट, मीठ, ओवा, बेसन दोन टेबलस्पून, पाणी, ओव्याची नसतील तर कढीलिंबाची पानं घाला. 

रव्यात सगळं साहित्य, गाजर किसून, कांदे चिरून, पानं चिरून,  मिरचीचे तुकडे, तिखट, मीठ, ओवा मिक्स करा. आधी ताक मग बघून लागेल तसं पाणी घाला. सैल करायचं नाहीये. कांदा भजी सोडतो तितपत पीठ होऊदे. 

तेल गरम करून छोटी छोटी भजी मध्यम आचेवर तळून घ्या.

मिरची, कोथिंबीर, पुदिना, आवळा अशी चटणी केली होती मी.

त्यामानाने कमी साहित्यात होणारा झटपट प्रकार!

 आवडीप्रमाणे भाज्या घ्या कोणत्याही.

✍️ मीनल सरदेशपांडे

नवलकोल घावन

 नमस्कार मंडळी, 

#नाश्ता 

आज एक थोडासा वेगळा नाश्ता प्रकार:

 नवलकोलचे घावन:


साहित्य: २ वाट्या तांदूळ पिठी, अर्धी वाटी बारीक रवा वाटी भर नवलकोलचा पाला, लसूण चार पाकळ्या, तिखट, मीठ, एक वाटी ताक, पाणी, तेल.


कृती: नवलकोलची कोवळी पाने धुवून बारीक चिरून घ्या.

एका पातेल्यात रवा, तांदूळ पीठ, तिखट, मीठ एकत्र करा. त्यातच लसूण पाकळ्या किसून घाला. किंवा पेस्ट करून घाला. बारीक चिरलेला नवलकोल पाला मिक्स करा. ताक घाला आणि लागेल तसं पाणी घालून धिरडी पीठ असतं तितपत भिजवा.

तव्यावर तेल सोडून घावन घाला, दोन्ही बाजू भाजून घ्या.

चटणी, लोणी याबरोबर सर्व्ह करा.


टीप: ताक नको असेल तर वगळा. 

✍️मीनल सरदेशपांडे

लेमन कोरियाँडर सूप

 लेमन कोरीएंडर सूप: लिंबू कोथिंबीर सूप असं बरं नाही वाटत ना😄😄

थंडीत सूप प्रकार मस्त वाटतात गरमागरम प्यायला!


दोन गोष्टी एकत्र फोटो दिले म्हणजे मटार उसळ मध्ये घालायला घरचं पनीर केलं, त्याच्या पाण्याचा स्टॉक वापरून सूप केलं.


मटार उसळ नेहमीची मटार मीठ घालून शिजवून घेतले. कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण, ओल्या मिरच्या आणि थोडा पुदिना असं वाटप करून घेतलं.

तेल तापत ठेवून त्यात फोडणीत फक्त जिरं आणि हिंग घालून वाटप घातलं. ते परतून त्यात मटार घातले.

मीठ, किंचित साखर आणि थोडी आमचूर पावडर! 

यातच एक लिटर दुधाचे पनीर करून वड्या वगैरे n करता तसच कुस्करून घातलं. 


सूप:

साहित्य: दोन गाजर, दोन कांदे, दहाबारा लसूण पाकळ्या, आल्याचा छोटा तुकडा, मिरी पावडर, मीठ, साखर, दोन चमचे कॉर्न फ्लोअर, दोन छोट्या हिरव्या मिरच्या, भरपूर कोथिंबीर, एक लिंबू, पाणी, लोणी, एक तमालपत्र


कृती: माझ्याकडे पनीरचे पाणी होतं.

त्यात कॉर्न फ्लोअर घालून नीट मिक्स करून घेतलं.

कढईत लोणी घेतलं चमचाभर, त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण, आलं आणि गाजर घालून दोन मिनिटं परतून घेतलं. आता त्यात कॉर्न फ्लोअर चे मिश्रण घालून ढवळत राहिले. मीठ, साखर, मिरचीचे बारीक तुकडे , तमालपत्र आणि मिरी पावडर घालून थोडे पाणी घालून उकळी काढली.  अगदी शेवटी चिरलेली कोथिंबीर घातली. गॅस बंद करून लिंबू रस घातला.  गरमागरम सर्व्ह केलं.


टीप: स्टॉक नसेल तर नुसत्या पाण्यात पण कॉर्न फ्लोअर घालता येईल.

माझ्याकडे कॉर्न फ्लोअर नव्हतं पण आरारुट सत्व होतं ते लावलं मी.

आणि तमालपत्र ओलं होतं त्याचा स्वाद मस्त येतो म्हणून उकळताना एकच छोटं घातलं.  बाकी गोष्टी प्रमाण तुमच्याकडे किती लागेल त्यावर कमी जास्त होईल. भाज्यांचा स्टॉक पण वापरता येईल.


✍️

 मीनल सरदेशपांडे

राजगिरा लाही चिवडा

 नमस्कार मंडळी: 

आज थोडं हेल्दी थोडं चटपटीत

राजगिरा लाही चिवडा( उपासाचा 

करता येतो पण मी हा नेहमीचा केलाय.



पाव किलो राजगिरा लाह्या, बाकी डाळं, भोपळा बी, शेंगदाणे, थोडे धने, मोहोरी, तीळ, सूर्यफूल बी, हे सगळं थोड्या तेलात परतून घेतलं. कढीलिंब पाने घालून फोडणी केली त्यात लाह्या परतलेल्या गोष्टी तिखट,मीठ आणि थोडी पिठी साखर घालून दोन मिनिटं परतून घेतलं. चहा बरोबर काहीतरी😊

✍️मीनल सरदेशपांडे

दही राजगिरा

 #नाश्ता 

नमस्कार मंडळी😊

 आज एक सोपा हेल्दी नाश्ता!

 दही राजगिरा:


माझी आई उपासाला दही साबुदाणा खात असे किंवा राजगिरा लाडू दुधात घालून. बऱ्याच स्त्रियांना हिमोग्लोबिन समस्या असते अशावेळी राजगिरा खायचा सल्ला दिला जातो. सतत गोड नको वाटतं म्हणून हा पर्याय!

 दही पोहे करताना दही तयार करतो तसच करून घ्या. मी दही घुसळून त्यात थोडं ताक, कोथिंबीर बारीक चिरून आणि मिरची बारीक तुकडे किंवा माझ्याकडे तयार ठेचा असतो मोहोरीचा तो घालते. मीठ आणि वरून तूप हिंग जिरं अशी फोडणी, या फोडणीत तुम्ही शेंगदाणे घालू शकता.

या दह्यात डाळिंब दाणे, बीट किसून घालू शकता.

अगदी खायच्या वेळी आधी तयार राजगिरा लाह्या आणि त्यात हे तयार केलेलं दही घाला. आवडीप्रमाणे सजवून खा. मस्त भरपेट नाश्ता होईल.

असंही आता थंडी कमी झालीय खूप.

मस्त खा स्वस्थ रहा😊


टीप: माझे सासरे दही पोहे खाताना त्यात भाजलेलं वांगं 

आणि कच्चा कांदा असं पण घालत असत.पण मला डॉ नी वांगे खायला मनाई केलीय🫣😝 तुम्ही ट्राय करून बघा.


✍️ मीनल सरदेशपांडे

पनीर पालक

 पनीर पालक: नमस्कार मंडळी😊 आठ दिवस भाच्याच्या मुंजीच्या गडबडीत होते मस्त धमाल करून झाली. आता परत रूटीन सुरू!



पालक पनीर असतं मग हे काय बदलून नाव लिहिलं म्हणजे वेगळं काय?

तर पनीर केल्यावर त्याच्या येणाऱ्या पाण्यात केलेली पालकची 

पातळ भाजी... ताकातली करतो तशीच.


साहित्य: पनीरचे पाणी एक लीटर, आमचूर, पालक जुडी, 

सुक्या मिरच्या, लसूण, मेथी दाणे, तूप, लाल तिखट किंवा हिरवी मिरची वाटून, मीठ, साखर, बेसन,जिरं, ओले काजू(ऐश😝)


कृती: पनिरच्या पाण्यात दोन चमचे आमचूर, चार चमचे बेसन, मीठ, साखर, लाल तिखट घालून नीट मिक्स करा. ओले काजू गरम पाण्यात घालून सोलून यात घाला. पालक धुवून, चिरून पाच मिनिटं गरम पाण्यात उकळून घ्या. आता गार झाल्यावर हाताने कुस्करून घ्या. पनीरच्या पाण्यात मिक्स करा. तुपाची लसूण, सुक्या मिरच्या, मेथी, जिरं घालून फोडणी करून ती या मिश्रणाला घालून तयार पातळ भाजी उकळून घ्या. 

चव बघून हवं 

असेल ते वाढवा. 

चविष्ट पातळ भाजी तयार आहे!

टीप: काजू यात घातल्यावर शिजतात तसेच छान लागतात. ओले नसतील तर  सुके गरम पाण्यात भिजत घालावेत.

सुकी मिरची आहे म्हणून तिखटपणा साठी लाल तिखट पण तुम्ही ओली मिरची पण वापरू शकता.

पनीरचे पाणी नसेल तर 

ताकातली होतेच अशी. या पाण्यात पण ताक आणि हे पाणी निम्मे निम्मे घेऊ शकता. ताक असेल तर आमचूर नको.

✍️ मीनल सरदेशपांडे

चटपटीत टी टाईम स्नॅक्स

 नमस्कार मंडळी, आज काहीतरी सोपं आणि चटपटीत... संध्याकाळी मला काहीतरी हवं असतं सटरफटर पण तळलेले पॅकबंद नको म्हणून हा पर्याय!



अलीकडे डिमार्ट, रिलायन्स झाल्यामुळे कसल्या कसल्या हेल्दी बिया मिळतात.

लहानपणी चारोळीच्या झाडाखाली पडलेली फळ तिथेच फोडून खाऊन टाकत असू. घरी लावलेल्या सूर्यफुलातल्या बिया सोलून खात असू.  लाल भोपळ्या बिया सोलून खाण्यात तासंतास जायचा.


दुधीच्या कोवळ्या बिया हिरकुटात ओवून त्या भाजून त्याला तूप मीठ लावून खात असू.


त्यामुळे बाजारात शोधायला जायची गरज पडत नव्हती.  असो... आता या तयार बिया आणल्या किंचित मीठ मिठाचं पाणी घालून छान कुरकुरीत भाजून घेतल्या. चणे दाणे आणले त्यात त्या मिक्स केल्या, झालं टेस्टी आणि हेल्दी!


✍️मीनल सरदेशपांडे

चटपटीत नाचणी ज्वारी भडंग:

 चटपटीत नाचणी ज्वारी भडंग:



हल्ली डिमार्ट, रिलायन्स, star बाजार अशा ठिकाणी ज्वारी, बाजरी, नाचणी असे चुरमुरे मिळतात. 


साहित्य: २०० ग्रॅम नाचणी चुरमुरे, २०० ग्रॅम ज्वारी चुरमुरे, तेल, दोन टेबलस्पून मेतकूट, अर्धा टिस्पून धने, साखर, मीठ, तिखट, फोडणीचे साहित्य, शेंगदाणे आणि काजू


कृती: चुरमुरे दोन्ही चाळून एकत्र करावे. त्यावर मीठ, तिखट, पिठीसाखर आणि मेतकूट असे सगळे घालून कच्चे तेल घालून नीट लावून घ्यावे.  आता कढईत तेल तापत ठेवावे. शेंगदाणे तळून घ्यावेत. थोडे तळून होत आले की त्यातच काजू तुकडे तळावेत. आता मोहोरी, हळद, हिंग घालून फोडणी करावी. अख्खे धने घालावेत. सगळं परतून गॅस बारीक करून त्यात चुरमुरे घालून नीट परतावे. मंद आचेवर थोडा वेळ परतत रहावे. कुरकुरीत व्हायला हवं. गार झाल्यावर घट्ट झाकण्याच्या बरणीत ठेवावे.

✍️ मीनल सरदेशपांडे

मठ्ठा

 मठ्ठा: नमस्कार मंडळी, उन्हाळ्याची आग जाणवायला लागली की थंडगार काहीतरी हवं वाटतं. 


आज आपला पारंपरिक मठ्ठा अलीकडे जेवणाच्या पंगतीतून लुप्त झालेला अजून एक प्रकार!

यात मोजून मापून काहीच नाही. 

थोडं आलं साल काढून किसून घ्या. कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या. आवडीनुसार एखादी मिरची, गावठी असेल तर मस्तच! जिरं भाजून त्याची पूड आणि काळं मीठ.

सगळे जिन्नस ताकात मिक्स करा. चव बघून लागेल ते कमी जास्त करा.


मी दिलेला फोटो बघून लक्षात येईल हे सगळं मी वाटून घातलय. 

घरात ज्येष्ठ मंडळी असली की काही बदल करावे लागतात.

सासूबाईंना कोथिंबीर, आलं, मिरची याचे तुकडे बारीक दांडा दातात अडकतो. त्यामुळे मी हे सगळं बारीक करून ताकाला  लावलं. वर दिसतय ते फोटो पुरते आहे. 

या दिवसात हा विस्मृतीत गेलेला प्रकार नक्की करा.. करत नसाल तर😊

✍️ मीनल सरदेशपांडे 

#मिनलरेसिपिज 

#रोजचास्वयंपाक 

#उन्हाळा

#मठ्ठा

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

फणसाची खांडवी:

 नमस्कार मंडळी, आजची रेसिपी: 

फणसाची खांडवी:


भाच्याच्या मुंजीत केळवणाच्या 

पाच प्रकारात फणस हवा असं वाटत होतं पण बाकी सगळं घरात असल्याने झटपट पण व्हायला हवं. त्यासाठी केलेला हा प्रकार. मुंजीच्या दिवशी घरच्या कुयरीची भाजी होतीच आणि ती खाऊन सगळी मंडळी खुश झाली.


साहित्य: एक वाटी इडली रवा, एक वाटी फणसाचा रस, एक वाटी गूळ, जायफळ पावडर, मीठ, अडीच वाट्या पाणी, एक वाटी ओलं खोबरं, एक दोन चमचे तूप.


कृती: इडली रवा तुपावर छान भाजून घ्या. रवा भाजत आला की शेवटी पाऊण वाटी खोबरं घालून  दोन मिनिटं  भाजा. एका बाजूला पातेलीत फणसाचा रस, पाणी, गूळ, चवीला मीठ आणि जायफळ पावडर एकत्र करून ठेवा. हे मिश्रण किंचित हळद घालून उकळून घ्या. गूळ विरघळला की भाजलेल्या रव्यात घालून मंद गॅसवर वाफ काढा. 

रवा व्यवस्थित शिजायला हवा. 

मिश्रण थापण्या इतपत व्यवस्थित घट्ट होऊ द्या. ताटाला तूप लावून त्यावर खांडवी थापा. थापताना वरून उरलेले पाव वाटी खोबरं पसरून घ्या.

गार झाल्यावर वड्या पाडा.


टीप: होय याचं सांदण पण करता येतं. पण ही खांडवी एकाच कढईत होते. 

इडली लावत बसण्यापेक्षा सोपं झालं.


✍️ मीनल सरदेशपांडे

दुधीची साल तीळ चटणी:

 दुधीची साल तीळ चटणी:


 नमस्कार मंडळी: आज नेहमीचेच घटक वापरून थोडी वेगळी चटणी केलीय.

लेकाचा पदवीदान समारंभ आणि भाच्याची मुंज करून आले नि आजारी पडले. त्यामुळे विणकाम, रेसिपी दोन्हीही बंद. आज गाडी बऱ्यापैकी रुळावर आलीय. मग काय दोन्हीही सुरू केलं.


साहित्य: एका दुधीच्या साधारण वाटीभर साली, दोन टेबलस्पून तीळ, दोन टेबलस्पून सुकं खोबरं, दोन चार लसूण पाकळ्या, सुक्या मिरच्या भिजवून पाच सहा किंवा लाल तिखट, दोन आमसुलं, मीठ, साखर, पाणी, एक चमचा तेल.


कृती : साली ओबडधोबड चिरून तेलात परतून घ्या. मिरच्या घेणार असाल तर गरम पाण्यात भिजत घाला.

साली परतत आल्या की त्यातच तीळ, खोबरं घालून तेही परतून घ्या. 

सर्व मिश्रण गार झालं की त्यात आमसुलं, लसूण, मीठ साखर, मिरच्या किंवा तिखट घालून मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घ्या.

आता तुम्हाला सैल हवी असेल तसे पाणी घाला, कोरडी आवडत असेल तर पाणी न घालता वाटून त्यात वरून कच्चे तेल घालून पण छान लागते. 

मी उगाच भाजलेले होतेच म्हणून वरून तीळ घातले.

तूप जिऱ्याची फोडणी पण घालता येईल.

चव बघून लागेल ते कमी जास्त करा. 


टीप: ही चटणी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर अशी पण होते. आज थोडा वेगळा प्रकार!

दुधीची भाजी केलीय जाऊबाईने. नाहीतर उगीच वाटेल मुख्य गोष्ट सोडून टाकायच्या गोष्टीचीच कृती देतेय... 😄😄


आजच केलेली नवीन कॉम्बिनेशन ची doily पण फोटो शेअर करते.

✍️ मीनल सरदेशपांडे

काळ्या तिळातली गवार

 #रोजचास्वयंपाक 


नमस्कार मंडळी:

आज नेहमीची गवार थोड्या वेगळ्या पद्धतीने केलीय. मागच्या वेळी काळे तीळ फक्त श्राद्ध पक्षाला वापरतात त्यामुळे ते रोजच्या आहारात घ्यावेत का असे बऱ्याच जणांना वाटत होते.

पण खरच सांगते आमच्याकडे तेव्हा घरीच पिकायचे काळे तीळ त्यामुळे कदाचित जिथे पांढरे तीळ वापरले जातात तिथे खाण्याच्या पदार्थात पण तेच वापरले जायचे. तसे तर तांदूळ भात पण या कार्यात वापरला जातो पण तो असतोच रोजच्या आहारात.


काळ्या तिळाचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे, माझ्या लिस्ट मधील जाणकार 

अधिक प्रकाश टाकतीलच.


काळ्या तिळातली गवार:

साहित्य: गवार अर्धा किलो, काळे तीळ चार चमचे, दोन चमचे धने, एक चमचा जिरं, एक तुकडा दालचिनी, लसूण पाकळ्या तीन चार, आमचूर एक चमचा, साखर दोन चमचे, मीठ, 

फोडणीसाठी तेल, मोहोरी, हिंग, हळद, ओलं खोबरं, कोथिंबीर, लाल तिखट एक चमचा.


कृती: गवार  धुवून डेखं टोकं काढून मोडून किंवा चिरून घ्या.  त्यात थोडं दूध थोडं पाणी घालून वाफवून घ्या.

शिजली पाहिजे पण मोडता नये.

कढईत  धने जिरं दालचिनी तुकडा मंद गॅसवर भाजून घ्या. हे भाजत आलं की त्यात तीळ घालून तेही भाजून घ्या. 

भाजलेलं साहित्य, आमचूर, लाल तिखट, लसूण  हे सर्व बारीक करून घ्या.

आता कढईत तेल तापत ठेवा दोन तीन चमचे. ते तापलं की मोहोरी, ती तडतडली की हिंग, हळद घालून गवार घालून परता. चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करा. आता तयार मसाला, साखर, खोबरं, कोथिंबीर घालून परत एकदा परतून झाकण ठेवा. दोन मिनिटं वाफ येऊ द्या. तुमच्या चवीनुसार काही हवं तर वाढवा. छान लागते ही भाजी.


टीप: दिसायला रंग काळपट येत असला तरी भाजी चवीला अप्रतिम होते. तरीही काळे तीळ नकोच असतील तर पांढरे वापरा. 

खोबरं ऐच्छिक आहे पण परतलेल्या 

भाजीत छान लागते.

गवार दुधात शिजवून त्याचे पाणी काढून टाकले की उग्रपणा 

कमी होतो.


✍️मीनल सरदेशपांडे

बीट सरबत

 नमस्कार मंडळी😊

#उन्हाळा

#सरबत



हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागली की  थंडपेय, सरबत याची आठवण होते.


आपली आवळा आलं लिंबू सरबताची 

पहिली बॅच संपली सुद्धा! तर आता सिझनची प्रॉडक्ट्स सुरू झालीच आहेत.


आज घेऊन आलेय एक चविष्ट थंड पेय:

बीटचे सरबत:

साहित्य: एक बीट, दोन आवळे किंवा एक मोठे लिंबू, मूठभर कोथिंबीर काड्या, थोडा पुदिना, काळे मीठ आणि साधे मीठ, पाणी


कृती: बीट धुवून सोलून घ्या. तुकडे करा. पुदिना, कोथिंबीर काड्या, आवळ्याचे तुकडे, चवीनुसार काळे मीठ, साधे मीठ हे सर्व ज्यूसर जार मध्ये फिरवून गाळून घ्या.

आता गरजेनुसार पाणी घाला. 

ताजे सरबत तयार आहे.


टीप: मला यात साखरेची गरज वाटली नाही. जिरं पावडर, आलं पण चांगलं लागेल.

मी सगळ्यांसाठी केलं म्हणून घातली नाही पण एखादी बारीक गावठी मिरची 

लावलीत तर भारी लागते.. त्याला एक वेगळा वास असतो छान!



✍️ मीनल सरदेशपांडे

केळी पिठाची गूळ पापडी

 नमस्कार मंडळी😊

जे काहीही न खाता कडक उपास करतात त्यांनी ही पोस्ट महाशिवरात्री नंतर वाचावी😄😄

   आमच्यासारख्या मंडळींना काय होतं एखादा जिन्नस समोर आला की याचं काय काय करता येईल हेच सुचतं. जे उत्तम होईल ते शेअर करायचं... जे जे आपणासी ठावे या स्टाईल वर 😝 बाकी उपास करणाऱ्या मंडळींना पोटभर खाऊ घातलं की डायरेक्ट पुण्य संचय होत राहतो. 



साहित्य: एक वाटी केळी पीठ, पाऊण वाटी तूप, पाऊण वाटी सुकं खोबरं, राजगिरा लाह्या अर्धी वाटी, गूळ पाऊण  वाटी, वेलची पावडर 


कृती: सुकं खोबरं मंद आचेवर भाजून  बाजूला ठेवा. गूळ  बारीक चिरून घ्या. ( गूळ पावडर नको त्याची वडी चांगली होत नाही, माझा अनुभव )कढईत तूप घ्या त्यात केळी पीठ घालून छान तांबूस होईपर्यंत भाजा. तूप घातल्यावर मिश्रण सैलसर व्हायला हवं.  मिश्रण भाजत आलं की ताटाला तूप लावून घ्या. खोबरं किंचित बारीक करून आणि लाह्या तशाच मिश्रणात घाला. गॅस बंद करा. आता त्यात गूळ, वेलची पावडर घालून पटापट मिक्स करा. 

गूळ बारीक असेल की लगेच विरघळतो आणि मिश्रण घट्ट होते. 

ताटात थापून वरून राजगिरा लाह्या

पसरून सजवा. लगेच अलगद वड्या पाडा. गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. मस्त अलवार खुसखुशीत  होतात.


टीप: उपासासाठी म्हणून मुद्दाम केल्यात. गूळ आवडीप्रमाणे कमी जास्त करा. तूप व्यवस्थित लागतं.


✍️ मीनल सरदेशपांडे

नाचणी राजगिरा लाडू

 नमस्कार मंडळी, होळी जवळ आली की अंगाची काहिली व्हायला सुरुवात होते. अशावेळी आपल्या खाण्यात पण बदल करावा लागतो.

आज घेऊन आलेय उन्हाळा स्पेशल



 नाचणी राजगिरा लाडू:

साहित्य: दोन वाट्या नाचणी, दीड वाटी राजगिरा लाह्या, अर्धी वाटी पोहे, तूप दीड वाटी, पिठी साखर दोन वाट्या, वेलची पावडर, दोन चमचे तीळ, एक वाटी सुकं खोबरं 


कृती: नाचणी निवडून चाळून घ्या. 

नाचणी, एक वाटी राजगिरा लाह्या, अर्धी वाटी पोहे हे सगळं दळून घ्या.

आता कढईत तूप घेऊन त्यात तयार पीठ घाला. मध्यम आचेवर पीठ हाताला हलकं लागेपर्यंत भाजा. मिश्रण सैल पण होते आणि छान खमंग वास पण येतो. 

आता हे गार होईपर्यंत खोबरं किसून भाजून घ्या. भाजत आलं की तीळ आणि लाह्या(अर्धी वाटी दळल्या नव्हत्या त्या)

 घालून ते पण भाजा. 

गार होऊ द्या. आता भाजलेलं पीठ, पिठी साखर वेलची पावडर आणि खोबऱ्याचे मिश्रण सर्व एकत्र करा.

नीट मिक्स करून चव बघा. 

लाडू वळा आणि फस्त करा.


टीप: साखरे ऐवजी गूळ पण घालता येईल पण डायबेटिस साठी साखरेला गूळ हा पर्याय नाही. गूळ पावडर नामांकित कंपनीची सुद्धा मला 

कॅरॅमल केलेली साखरच वाटते... असेल पण गूळ पण ती सोपी वाटत असली तरी का कोण जाणे फारशी आवडत नाही मला. 


गूळ घातलात तर वेलची ऐवजी जायफळ छान लागेल.


आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे तीळ अगदी कमी मधेच दाताखाली छान लागतात म्हणून घातले. 

राजगिरा जास्तीत जास्त खाण्यात यावा म्हणून वापरते. तूप आणि साखर अंदाज बघून कमी जास्त करा.


बघा करून 😊


✍️ मीनल सरदेशपांडे