कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

काळ्या तिळातली गवार

 #रोजचास्वयंपाक 


नमस्कार मंडळी:

आज नेहमीची गवार थोड्या वेगळ्या पद्धतीने केलीय. मागच्या वेळी काळे तीळ फक्त श्राद्ध पक्षाला वापरतात त्यामुळे ते रोजच्या आहारात घ्यावेत का असे बऱ्याच जणांना वाटत होते.

पण खरच सांगते आमच्याकडे तेव्हा घरीच पिकायचे काळे तीळ त्यामुळे कदाचित जिथे पांढरे तीळ वापरले जातात तिथे खाण्याच्या पदार्थात पण तेच वापरले जायचे. तसे तर तांदूळ भात पण या कार्यात वापरला जातो पण तो असतोच रोजच्या आहारात.


काळ्या तिळाचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे, माझ्या लिस्ट मधील जाणकार 

अधिक प्रकाश टाकतीलच.


काळ्या तिळातली गवार:

साहित्य: गवार अर्धा किलो, काळे तीळ चार चमचे, दोन चमचे धने, एक चमचा जिरं, एक तुकडा दालचिनी, लसूण पाकळ्या तीन चार, आमचूर एक चमचा, साखर दोन चमचे, मीठ, 

फोडणीसाठी तेल, मोहोरी, हिंग, हळद, ओलं खोबरं, कोथिंबीर, लाल तिखट एक चमचा.


कृती: गवार  धुवून डेखं टोकं काढून मोडून किंवा चिरून घ्या.  त्यात थोडं दूध थोडं पाणी घालून वाफवून घ्या.

शिजली पाहिजे पण मोडता नये.

कढईत  धने जिरं दालचिनी तुकडा मंद गॅसवर भाजून घ्या. हे भाजत आलं की त्यात तीळ घालून तेही भाजून घ्या. 

भाजलेलं साहित्य, आमचूर, लाल तिखट, लसूण  हे सर्व बारीक करून घ्या.

आता कढईत तेल तापत ठेवा दोन तीन चमचे. ते तापलं की मोहोरी, ती तडतडली की हिंग, हळद घालून गवार घालून परता. चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करा. आता तयार मसाला, साखर, खोबरं, कोथिंबीर घालून परत एकदा परतून झाकण ठेवा. दोन मिनिटं वाफ येऊ द्या. तुमच्या चवीनुसार काही हवं तर वाढवा. छान लागते ही भाजी.


टीप: दिसायला रंग काळपट येत असला तरी भाजी चवीला अप्रतिम होते. तरीही काळे तीळ नकोच असतील तर पांढरे वापरा. 

खोबरं ऐच्छिक आहे पण परतलेल्या 

भाजीत छान लागते.

गवार दुधात शिजवून त्याचे पाणी काढून टाकले की उग्रपणा 

कमी होतो.


✍️मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा