नमस्कार मंडळी😊
जे काहीही न खाता कडक उपास करतात त्यांनी ही पोस्ट महाशिवरात्री नंतर वाचावी😄😄
आमच्यासारख्या मंडळींना काय होतं एखादा जिन्नस समोर आला की याचं काय काय करता येईल हेच सुचतं. जे उत्तम होईल ते शेअर करायचं... जे जे आपणासी ठावे या स्टाईल वर 😝 बाकी उपास करणाऱ्या मंडळींना पोटभर खाऊ घातलं की डायरेक्ट पुण्य संचय होत राहतो.
साहित्य: एक वाटी केळी पीठ, पाऊण वाटी तूप, पाऊण वाटी सुकं खोबरं, राजगिरा लाह्या अर्धी वाटी, गूळ पाऊण वाटी, वेलची पावडर
कृती: सुकं खोबरं मंद आचेवर भाजून बाजूला ठेवा. गूळ बारीक चिरून घ्या. ( गूळ पावडर नको त्याची वडी चांगली होत नाही, माझा अनुभव )कढईत तूप घ्या त्यात केळी पीठ घालून छान तांबूस होईपर्यंत भाजा. तूप घातल्यावर मिश्रण सैलसर व्हायला हवं. मिश्रण भाजत आलं की ताटाला तूप लावून घ्या. खोबरं किंचित बारीक करून आणि लाह्या तशाच मिश्रणात घाला. गॅस बंद करा. आता त्यात गूळ, वेलची पावडर घालून पटापट मिक्स करा.
गूळ बारीक असेल की लगेच विरघळतो आणि मिश्रण घट्ट होते.
ताटात थापून वरून राजगिरा लाह्या
पसरून सजवा. लगेच अलगद वड्या पाडा. गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. मस्त अलवार खुसखुशीत होतात.
टीप: उपासासाठी म्हणून मुद्दाम केल्यात. गूळ आवडीप्रमाणे कमी जास्त करा. तूप व्यवस्थित लागतं.
✍️ मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा