दुधीची साल तीळ चटणी:
नमस्कार मंडळी: आज नेहमीचेच घटक वापरून थोडी वेगळी चटणी केलीय.
लेकाचा पदवीदान समारंभ आणि भाच्याची मुंज करून आले नि आजारी पडले. त्यामुळे विणकाम, रेसिपी दोन्हीही बंद. आज गाडी बऱ्यापैकी रुळावर आलीय. मग काय दोन्हीही सुरू केलं.
साहित्य: एका दुधीच्या साधारण वाटीभर साली, दोन टेबलस्पून तीळ, दोन टेबलस्पून सुकं खोबरं, दोन चार लसूण पाकळ्या, सुक्या मिरच्या भिजवून पाच सहा किंवा लाल तिखट, दोन आमसुलं, मीठ, साखर, पाणी, एक चमचा तेल.
कृती : साली ओबडधोबड चिरून तेलात परतून घ्या. मिरच्या घेणार असाल तर गरम पाण्यात भिजत घाला.
साली परतत आल्या की त्यातच तीळ, खोबरं घालून तेही परतून घ्या.
सर्व मिश्रण गार झालं की त्यात आमसुलं, लसूण, मीठ साखर, मिरच्या किंवा तिखट घालून मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घ्या.
आता तुम्हाला सैल हवी असेल तसे पाणी घाला, कोरडी आवडत असेल तर पाणी न घालता वाटून त्यात वरून कच्चे तेल घालून पण छान लागते.
मी उगाच भाजलेले होतेच म्हणून वरून तीळ घातले.
तूप जिऱ्याची फोडणी पण घालता येईल.
चव बघून लागेल ते कमी जास्त करा.
टीप: ही चटणी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर अशी पण होते. आज थोडा वेगळा प्रकार!
दुधीची भाजी केलीय जाऊबाईने. नाहीतर उगीच वाटेल मुख्य गोष्ट सोडून टाकायच्या गोष्टीचीच कृती देतेय... 😄😄
आजच केलेली नवीन कॉम्बिनेशन ची doily पण फोटो शेअर करते.
✍️ मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा