पनीर पालक: नमस्कार मंडळी😊 आठ दिवस भाच्याच्या मुंजीच्या गडबडीत होते मस्त धमाल करून झाली. आता परत रूटीन सुरू!
पालक पनीर असतं मग हे काय बदलून नाव लिहिलं म्हणजे वेगळं काय?
तर पनीर केल्यावर त्याच्या येणाऱ्या पाण्यात केलेली पालकची
पातळ भाजी... ताकातली करतो तशीच.
साहित्य: पनीरचे पाणी एक लीटर, आमचूर, पालक जुडी,
सुक्या मिरच्या, लसूण, मेथी दाणे, तूप, लाल तिखट किंवा हिरवी मिरची वाटून, मीठ, साखर, बेसन,जिरं, ओले काजू(ऐश😝)
कृती: पनिरच्या पाण्यात दोन चमचे आमचूर, चार चमचे बेसन, मीठ, साखर, लाल तिखट घालून नीट मिक्स करा. ओले काजू गरम पाण्यात घालून सोलून यात घाला. पालक धुवून, चिरून पाच मिनिटं गरम पाण्यात उकळून घ्या. आता गार झाल्यावर हाताने कुस्करून घ्या. पनीरच्या पाण्यात मिक्स करा. तुपाची लसूण, सुक्या मिरच्या, मेथी, जिरं घालून फोडणी करून ती या मिश्रणाला घालून तयार पातळ भाजी उकळून घ्या.
चव बघून हवं
असेल ते वाढवा.
चविष्ट पातळ भाजी तयार आहे!
टीप: काजू यात घातल्यावर शिजतात तसेच छान लागतात. ओले नसतील तर सुके गरम पाण्यात भिजत घालावेत.
सुकी मिरची आहे म्हणून तिखटपणा साठी लाल तिखट पण तुम्ही ओली मिरची पण वापरू शकता.
पनीरचे पाणी नसेल तर
ताकातली होतेच अशी. या पाण्यात पण ताक आणि हे पाणी निम्मे निम्मे घेऊ शकता. ताक असेल तर आमचूर नको.
✍️ मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा