लेमन कोरीएंडर सूप: लिंबू कोथिंबीर सूप असं बरं नाही वाटत ना😄😄
थंडीत सूप प्रकार मस्त वाटतात गरमागरम प्यायला!
दोन गोष्टी एकत्र फोटो दिले म्हणजे मटार उसळ मध्ये घालायला घरचं पनीर केलं, त्याच्या पाण्याचा स्टॉक वापरून सूप केलं.
मटार उसळ नेहमीची मटार मीठ घालून शिजवून घेतले. कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण, ओल्या मिरच्या आणि थोडा पुदिना असं वाटप करून घेतलं.
तेल तापत ठेवून त्यात फोडणीत फक्त जिरं आणि हिंग घालून वाटप घातलं. ते परतून त्यात मटार घातले.
मीठ, किंचित साखर आणि थोडी आमचूर पावडर!
यातच एक लिटर दुधाचे पनीर करून वड्या वगैरे n करता तसच कुस्करून घातलं.
सूप:
साहित्य: दोन गाजर, दोन कांदे, दहाबारा लसूण पाकळ्या, आल्याचा छोटा तुकडा, मिरी पावडर, मीठ, साखर, दोन चमचे कॉर्न फ्लोअर, दोन छोट्या हिरव्या मिरच्या, भरपूर कोथिंबीर, एक लिंबू, पाणी, लोणी, एक तमालपत्र
कृती: माझ्याकडे पनीरचे पाणी होतं.
त्यात कॉर्न फ्लोअर घालून नीट मिक्स करून घेतलं.
कढईत लोणी घेतलं चमचाभर, त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण, आलं आणि गाजर घालून दोन मिनिटं परतून घेतलं. आता त्यात कॉर्न फ्लोअर चे मिश्रण घालून ढवळत राहिले. मीठ, साखर, मिरचीचे बारीक तुकडे , तमालपत्र आणि मिरी पावडर घालून थोडे पाणी घालून उकळी काढली. अगदी शेवटी चिरलेली कोथिंबीर घातली. गॅस बंद करून लिंबू रस घातला. गरमागरम सर्व्ह केलं.
टीप: स्टॉक नसेल तर नुसत्या पाण्यात पण कॉर्न फ्लोअर घालता येईल.
माझ्याकडे कॉर्न फ्लोअर नव्हतं पण आरारुट सत्व होतं ते लावलं मी.
आणि तमालपत्र ओलं होतं त्याचा स्वाद मस्त येतो म्हणून उकळताना एकच छोटं घातलं. बाकी गोष्टी प्रमाण तुमच्याकडे किती लागेल त्यावर कमी जास्त होईल. भाज्यांचा स्टॉक पण वापरता येईल.
✍️
मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा