कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, १७ डिसेंबर, २०१७

खजूर लोणचं

साहित्य:
 अर्धा की सीडलेस खजूर, 12 लिंबं, तीन चमचे लाल तिखट, दीड वाटी गूळ, अर्धा चमचा शेंदेलोण, अर्धा चमचा पादेलोण, एक चमचा जीरं पावडर, अर्धा चमचा साधं मीठ

कृती: 
खजुराचे चार तुकडे होतील असे तुकडे करावे. लिंबाचा रस काढून घ्यावा. गूळ बारीक चिरावा. स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात खजूर, गूळ, लिंबाचा रस, शेंदेलोण, पादेलोण, मीठ, तिखट, जीरं पावडर सर्व एकत्र करावे. एक दिवस तसेच ठेवून मुरू द्यावे. दुसऱ्या दिवशी खायला घेता येते. चव अप्रतीम!!!

सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

फ्लॉवरचा रस्सा:

साहित्य:
भाज्या: अर्धा की फ्लॉवर, अर्धी वाटी मटार, एक गाजर, एक बटाटा, दोन कांदे, दोन टॉमेटो

वाटपासाठी: एक वाटी ओलं खोबरं, दोन कांदे, सात आठ लसूण पाकळ्या, अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट, पाव चमचा आलं पेस्ट, एक चमचा लाल तिखट, एक चमचा कांदा लसुण मसाला

इतर साहित्य: पाव वाटी तेल, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा हळद, मीठ, एक चमचा गूळ( ऐच्छिक)

कृती:

 फ्लॉवर साफ करून तुरे कोमट पाण्यात मीठ घालून त्यात टाका.मटार सोलून घ्या. गाजर, दोन कांदे, दोन टॉमेटो, बटाटा चिरून घ्या. वाटपासाठी: कांदा उभा लांब चिरून घ्या. लसूण सोलून घ्या. आलं, सोलून घ्या. त्यात ओलं खोबरं आणि दाण्याचं कूट मिसळून थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
कढईत तेल तापत ठेवा. मोहोरी घाला, ती तडतडली की कांदा घालून परता. आता हळद, लाल तिखट घालून परता. आता त्यात गाजर, बटाटा आणि मटार घालून परता. मंद गॅसवर पाच मिनिटं वाफ काढा. आता फ्लॉवर घाला. परतून पाणी घालून उकळत ठेवा. फ्लॉवर शिजला की वाटप, कांदा लसूण मसाला, मीठ, गूळ, टॉमेटो सर्व घाला. पातळ हवा असेल तसे पाणी घाला. छान उकळू द्या. चव बघून काही हवे असल्यास वाढवा. यातले वाटप कच्चेच वापरले आहे. पण तुम्हाला हवे तर तेलावर परतून वाटू शकता.

फ्लॉवरची कोशिंबीर:


साहित्य: 
अर्धा की फ्लॉवर, दोन टॉमेटो, अर्धे लिंबू, मीठ, दोन ओल्या मिरच्या, अर्धा चमचा साखर, दोन चमचे तेल, पाव चमचा मोहोरी, अगदी थोडा हिंग, पाव चमचा हळद, कोथिंबीर.

कृती:
 फ्लॉवरचे तुरे काढून ते मीठ घातलेल्या कोमट पाण्यात दहा मिनिटं ठेवावेत. टॉमेटो बारीक चिरावा. मूठभर कोथिंबीर धुवून बारीक चिरावी. फ्लॉवर पाण्यातून काढून फूड प्रोसेसरला बारीक करावा किंवा किसणीवर किसावा. त्यात टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, साखर मिक्स करावे. कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, मिरच्या, हिंग, हळद घालून फोडणी करावी. ही फोडणी फ्लॉवरच्या मिश्रणात घालावी. लिंबू पिळावे. कोशिंबीर सारखी करावी. पोळीबरोबर मस्त लागते.

रविवार, १० डिसेंबर, २०१७

खव्याचे गुलाबजाम:

साहित्य:
अर्धा की खवा, 100 ग्रॅम मैदा, अर्धा की साखर, वेलची पावडर, तळणीसाठी तूप

कृती:
 खव्यात मैदा मिसळून चांगला मळून घ्यावा. अर्धा तास झाकून ठेवावे.  एक गोळा करून तूप तापवून तळून बघावा. व्यवस्थित झाला की बाकीचे गोळे करून घ्यावे. तूप गरम करून मध्यम आचेवर गुलाबजाम तळून प्लेन पेपरवर काढावे. साखर बुडेल इतके पाणी घालून एकतारी पाक करून त्यात वेलची पावडर घालावी. उकळत्या पाकात तळलेले गुलाबजाम घालून एक उकळी काढून गॅस बंद करावा. पाकात मुरू द्यावे.
कधी कधी खवा सैल येतो, अशावेळी मैदा जास्त झाला तर गुलाबजाम घट्ट होतात. खवा सैल असेल तर आधी भाजून घट्ट करून गार करून घ्यावा.

बीट पुरी/पराठा:


साहित्य: पाच वाट्या कणिक, अर्धी वाटी तांदूळ पीठ, अर्धी वाटी बेसन, लाल तिखट, मीठ ,हळद, अर्धी वाटी तेल, दोन मध्यम बीट, पाव चमचा लसूण पेस्ट

कृती:
 बीट स्वच्छ धुवावे, आणि शिजवून घ्यावे. गार झाले की साल काढून पेस्ट करून घ्यावी. कणिक, तांदूळ पिठी, बेसन एकत्र करावं. त्यात तिखट, मीठ, हळद घालावी. तेल घालावे. वाटलेलं बीट आणि लसूण पेस्ट मिक्स करून , चव बघून पीठ घट्ट मळावे. या पिठाचे पोळीसारखे लाटून पराठे करा किंवा पुऱ्या करा.

 दोन्ही छान लागते. बीट पराठा भाजताना मध्यम आचेवर भाजा, मुळात लाल रंग असल्याने पटकन काळे डाग पडायची शक्यता असते. चटणी, सॉस, लोणी कशाही बरोबर मस्तच लागतात. त्यानिमित्ताने बीट खाल्लं जातं!!

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

बुरा साखर बेसनलाडू:

बुरा साखर बेसनलाडू:

साहित्य: अर्धा की चणाडाळ, 400 ग्रॅम बुरा साखर, 250 ग्रॅम तूप, एक चमचा वेलची पावडर, काजूगर/बदाम काप, बेदाणे, पाव वाटी दूध.



कृती:
 चणाडाळ कोरडी खमंग भाजून घ्यावी. रवाळ दळून आणावी. कढईत 250 ग्रॅम तूप घ्यावे. त्यात भाजलेल्या डाळीचे पीठ मंद गॅसवर तांबूस रंगावर भाजावे. डाळ भाजल्याने पीठ कमी भाजावे लागते. आपल्याला हवा तसा रंग आला की त्यात पाव वाटी दूध शिंपडावे. गॅस बंद करावा. दुधामुळे पीठ छान फुलते. भाजलेले पीठ गार झाले की त्यात तयार बुरा साखर, वेलची पावडर, काजू बदाम काप घालावे. गरज असेल तर तूप किंवा साखर वाढवावी. बेदाणे लावून लाडू वळावे. बुरा साखरेचे लाडू छान रवाळ लागतात.

बुरा साखर:

बुरा साखर:
कोणीतरी भेट आणलेले बेसन लाडू खाल्ल्यावर लक्षात आलं यात काहीतरी वेगळं घातलंय. पिठीसाखर न वापरता बुरा साखर म्हणून रवाळ साखर मिळते बाजारात, ती वापरून लाडू केलेत हे कळल्यावर त्याचा आंतरजालावर शोध घेतला. तेव्हा ही रेसिपी मिळाली.
साहित्य: तीन वाट्या साखर, एक वाटी पाणी, दोन चमचे तूप

कृती: 
एका कढईत साखर आणि पाणी एकत्र करून मोठया आचेवर ढवळत राहावे. साखर विरघळली की त्यात तूप घालावे. एक वाटीत अर्धी वाटी पाणी घ्यावे. त्यात पाकाचा थेंब टाकून बघावा. गोळी झाली की गॅस बंद करून कढई खाली उतरावी आणि सतत ढवळत राहावे. हळूहळू पाक घट्ट होत जातो आणि त्याची रवाळ साखर तयार होते. गार झाली की डब्यात भरावी. ही साखर वापरल्याने लाडू खाताना चिकटत नाहीत.

कुरडई उपमा:

कुरडई उपमा:
साहित्य: दोन पसे भरून कुरडया, दोन कांदे, अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी गाजर किसून, दोन ओल्या मिरच्या, दोन चमचे तेल, मीठ, लाल तिखट, फोडणीचे साहित्य

कृती: कुरडया बुडतील एवढे पाणी चांगले गरम करावे. एका पातेल्यात कुरडया घेऊन त्यात हे पाणी ओतून पंधरा मिनिटं ठेवावे. पंधरा मिनिटांनी चाळणीवर काढून हाताने मोडून घ्याव्या. खूप जास्त बारीक करू नयेत. कांदा चिरून घ्यावा. गाजर किसून घ्यावं. मटार वाफवून घ्यावे. कढईत तेल घेऊन मंद गॅसवर तापवावे. तापले की मोहोरी घालावी. मोहोरी तडतडली की मिरच्यांचे तुकडे घालावे. कांदा घालून परतावे. किसलेलं गाजर, मटार घालावे. परतून घ्यावे. हळद घालावी. परतून चाळणीवर काढलेल्या कुरडया घालाव्यात. मीठ घालावे. एक वाटी पाणी घालून छान वाफ काढावी. मिरच्यामुळे तिखटपणा नाही आला तर लाल तिखट घालावे. गरमागरम उपमा मस्त लागतो.
यातच पाव चमचा गरम मसाला घालून आणि कुरडया न मोडता घातल्या की झाली घरगूती मॅगी!! मुलं ही मॅगी आवडीने खातात, आणि बाहेरच्या मॅगी पेक्षा चांगली! बघा प्रयोग करून!!!


रसगुल्ले:

रसगुल्ले:
साहित्य: अर्धा ली फुल क्रीम दूध, एक/दोन लिंबू, २२५ ग्रॅम साखर, ५०० मिली पाणी, वेलची पावडर, पाव टिस्पून आरारुट 

कृती: एका खोलगट भांड्यावर एक गाळणं आणि पातळ कापड ठेवावे. दूध पातेल्यात घेऊन उकळावे. पाच मिनिटं गार होऊ द्यावे. तोपर्यंत लिंबाचा रस काढून त्यात दोन चमचे पाणी मिक्स करून ठेवावे. आता दुधात हळूहळू लिंबाचा रस घालत ढवळावे. दूध फाटेल. आता हे फाटलेले दूध कपडावर ओतावे. लगेच गार पाणी ओतावे. आता कापड उचलून पनीर घट्ट पिळून त्यातलं पाणी काढून घ्यावं. खूप वेळ नाही तरी पंधरा मिनिटं  पाणी निथळू द्यावे..तयार गोळा ताटात घेऊन छान मऊ होईपर्यंत मळावे. मळताना त्यात आरारूट घाला. त्याचे आवडीप्रमाणे गोळे करावेत. गोळा करताना आत छोटा चौकोनी  खडीसाखरेचा खडा ठेवावा.
कुकरमध्ये 225 ग्रॅम साखर आणि 500 मिली पाणी एकत्र करून उकळत ठेवा.  पाण्याला उकळी आली की मध्यम गॅस करा, साखर विरघळली की अर्धा पाक बाजूला करून गार करायला ठेवा. उरलेला अर्धा पाक उकळायला लागला की गोळे त्यात सोडा, झाकण लावून दहा मिनिटं मध्यम गॅस वर ठेवा. कुकर बुडेल असं भांडं घेऊन त्यात कुकरचा तळ बुडवा. झाकण उघडेल.
दोन मिनिटांनी तयार रसगुल्ले अलगद काढून गार करायला ठेवलेल्या पाकात घाला.
या प्रमाणात सोळा रसगुल्ले होतात.
पनीर खूप मळून घेणे हे याच्या यशाचे रहस्य आहे.
  

रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

झटपट चटपटीत पनीर फरसबी:


साहित्य:
 पाव की फरसबी, पाव की पनीर, एक टॉमेटो, दोन कांदे, एक चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, दोन चमचे तेल, मीठ

कृती:
 फरसबी धुवून दोरे काढून आवडीप्रमाणे चिरावी. कुकरमध्ये फरसबीत पाणी न घालता फ़क्त खाली पाणी घालून वाफवून घ्यावी. पनीरचे तुकडे करावे. कांदे, टॉमेटो अर्धे लांब चिरून घ्यावे. कढईत तेल तापत ठेवावे. त्यात कांदा, टॉमेटो घालून मंद गॅसवर छान परतावा. त्यात पावभाजी मसाला, लाल तिखट, हळद घालून परतावे. आता शिजलेली फरसबी (पाणी सुटले असेल तरी ते न घेता) घालावी. पनीरचे तुकडे घालावे. मीठ घालून परतावे. पाच मिनिटं झाकण ठेवून छान वाफ काढावी. मुलांच्या आवडीची भाजी तयार आहे!

बेसन वडी:


साहित्य:
 बेसन एक वाटी, तूप एक वाटी, दूध एक वाटी, साखर दोन वाट्या, ओलं खोबरं एक वाटी, वेलची पावडर पाव चमचा, केशर सिरप एक चमचा, बदाम काप

कृती:
 खोबरं, बेसन, तूप, दूध आणि साखर सगळं कढईत एकत्र करून मंद गॅसवर ढवळत रहावं. घट्ट होऊ लागलं की वेलची पावडर, केशर सिरप घालावं. गॅस बंद करून खाली उतरून गोळा होईपर्यंत घोटावे. ताटाला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर गोळा थापावा, बदामाच्या कापांनी सजवावे.
मिनल सरदेशपांडे

टॉमेटो सूप

साहित्य:
अर्धा की टॉमेटो, दोन मध्यम कांदे, सात आठ लसूण पाकळ्या, 10/ 12 मिरी दाणे, दोन गाजर, एक इंच दालचिनीचा तुकडा, एक टी स्पून लोणी, पाव वाटी क्रीम (साय), मीठ, साखर

कृती:
 टोमॅटोचे चार भाग करावे. कांद्याचे चार भाग करावे. गाजराचे काप करावे, लसूण सोलून घ्यावी. चिरलेला टॉमेटो, गाजर, कांदा, लसूण, मिरी दाणे, दालचिनी यात थोडे पाणी घालून कुकरला दोन शिट्या कराव्या. गार करावे. मिक्सरला वाटून गाळून घ्यावे. आपल्या चवीनुसार मीठ, साखर घालावी. साय मिक्सरला एकजीव करून घालावी. गरम झाले की लोणी घालावे. गरमागरम प्यावे.
आमच्याकडे सूप थोडे तिखट आवडते म्हणून मी लाल तिखट घालते.

पालक पनीर


साहित्य:
चार जुड्या पालक, तीन कांदे, एक चमचा गरम मसाला, दहा बारा लसूण पाकळ्या, एक ली दूध, अर्धी वाटी क्रीम, चार ओल्या मिरच्या, दोन चमचे लोणी, मीठ
कृती:
 पालक निवडून धुवून घ्यावा. पाणी उकळून त्यात धुतलेला पालक दहा मिनिटं बुडवून झाकून ठेवावा. मग बाहेर काढून चाळणीवर निथळत ठेवावा. कांदे बारीक चिरावे. लसूण, मिरची पेस्ट करून घ्यावी. लाल तिखटही वापरू शकता पण रंग थोडा बदलेल. एक ली दूध गरम करायला ठेवावे. दूध उकळू लागले की त्यात लिंबू पिळावे. दूध फाटेल. आता त्यातील पाणी काढून, ते पनीर धुवावे आणि कुस्करून घ्यावे किंवा दाबून ठेवून वडया पाडाव्यात. निथळलेला पालक मिक्सरला फिरवावा. कढईत लोणी घालून गरम करावे. त्यात कांदा, लसूण, मिरची घालून मंद गॅसवर खूप परतावे. आता त्यात गरम मसाला घालावा. फिरवलेला पालक घालावा. क्रीम फिरवून तेही घालावे. मीठ घालून नीट मिसळावे. आता पनीरचे तुकडे किंवा कुस्करून घेतलेले पनीर घालून पाच मिनिटं गॅसवर ठेवावे. पोळीबरोबर सर्व्ह करावे.
मिनल सरदेशपांडे

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

होममेड आलं लिंबू पाचक

साहित्य:

     पाव की आलं, सहा लिंबं, एक चमचा शेंदेलोण( सैंधव), एक चमचा पादेलोण, अर्धा चमचा हिंग
कृती: 
     आलं स्वच्छ धुवावे. सगळी माती निघण्यासाठी पाण्यात तासभर भिजत ठेवावं. काचऱ्या करून मिक्सरला बारीक फिरवावे. पाणी अजिबात घालू नये. फिरवलेल्या आल्याचा रस गाळून घ्यावा. लिंबं धुवून, पुसून रस काढावा. आल्याचा आणि लिंबाचा रस एकत्र करावा. त्यात शेंदेलोण, पादेलोण आणि हिंग घालून मिक्स करावे. चव बघून लागल्यास मीठ घालावे. हे तयार पाचक फ्रीजमधे महिनाभरही टिकते.
आता जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा एक चमचा पाचक ताकात किंवा पाण्यात घालून घ्यावं. या पाचकला फिकट गुलाबी रंग येतो. आलं लिंबू एकत्र केलं की तो येतो.

पंचामृत: कोकणातील पारंपरिक तोंडीलावणं

साहित्य:
 पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, पाव वाटी शेंगदाणे, सात आठ ओल्या मिरच्या, अर्धी वाटी तिळाचं कूट, पाव वाटी शेंगदाण्याचे कूट, पाव वाटी चिंचेचा कोळ, अर्धी वाटी गूळ, मीठ, दोन चमचे तेल, पाव चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, दोन चमचे गोडा मसाला लागल्यास लाल तिखट, दोन वाट्या पाणी

कृती:
खोबऱ्याचे चिवड्याला करतो तसे काप करावेत. शेंगदाणे भाजून सालं काढून घ्यावेत. कढईत तीळ घेऊन मंद गॅसवर फक्त गरम करावेत. आमच्याकडे काळे तीळ वापरले जातात, पण तुम्ही पांढरेही वापरू शकता. काळ्या तिळाचं जास्त खमंग लागतं पंचामृत! तिळाचं कूट करून घ्यावे. चिंच भिजत घालून कोळ काढावा. मिरच्या धुऊन तुकडे करावेत. कढईत तेल घ्यावे. मंद गॅसवर ठेवावी. तेल तापलं की मोहोरी घालावी. ती तडतडली की मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. खोबऱ्याचे काप घालावे. दोन मिनिटं परतावे. शेंगदाणे घालावे. हिंग, हळद घालून छान परतून घ्यावे. आता त्यात चिंचेचा कोळ घालावा. दोन वाट्या पाणी घालावं. तिळाचं कूट, दाण्याचं कूट, मीठ, गूळ आणि गोडा मसाला घालून उकळी आणावी. लागल्यास अजून पाणी घालून, चव बघून काही हवं असेल तर वाढवावं. मला लाल तिखट घालावं लागलं. आंबटगोड अप्रतिम तोंडीलावणं तयार आहे!

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

गहू भाजून कणकेचे पौष्टिक लाडू

साहित्य: पिठासाठी: सहा वाट्या गहू
लाडू: चार वाट्या भाजलेले गव्हाचे पीठ, एक वाटी खारीक पावडर, पाऊण वाटी खसखस, दीड वाटी भाजलेले सुके खोबरे, तूप सव्वा दोन वाट्या, पिठी साखर चार वाट्या, एक चमचा वेलची पावडर, डिंक तळून एक वाटी, बेदाणे, बदाम अर्धी वाटी

कृती:
कढईत गहू घेऊन मध्यम गॅसवर खमंग भाजावे. गहू भाजताना लाह्या फुटल्याचा आवाज येइपर्यंत भाजावे. गार झाले की रवाळ दळावे.
     सुकं खोबरं किसून भाजून घ्यावे. खसखस भाजून घ्यावी. थोड्या तुपावर डिंक फुलवून घ्यावा. बदाम गरम करून अर्धेबोबडे फिरवून घ्यावे. खोबरं, खसखस, डिंक सर्व मिक्सरला थोडे फिरवून घ्यावे.
    भाजलेल्या पीठापैकी चार वाट्या मोजून घ्यावे. पिठात खारीक पावडर( मी तयार वापरली), सुकं खोबरं, खसखस, फिरवलेले बदाम, डिंक सर्व पिठात एकत्र करावे. पिठीसाखर, वेलची पावडर मिसळावी. आता पातळ तूप घालून सर्व मिश्रण एकत्र करावे. गरज असेल तर साखर, तूप घालावे. बेदाणे लावून लाडू वळावे.
गहू भाजून घेतल्याने परत तुपावर भाजावे लागत नाही आणि लाडू जास्त खमंग लागतात.
           हेच भाजलेले गव्हाचे पीठ दुधात भिजवून साखर किंवा गूळ घालूनही छान लागतं.

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

गाजर हलवा


साहित्य:
एक की गाजरं, 350 ग्रॅम खवा, एक ते सव्वा वाटी साखर, वेलची पावडर अर्धा चमचा, तूप तीन चमचे, सजावटीसाठी बदाम काप, काजूगर, बेदाणे
कृती:
 गाजरं स्वच्छ धुवावीत. धुतलेली गाजरं किसून घ्यावीत. कढईत तूप तापत ठेवावे. गाजराचा किस घालून तुपावर परतावा. दहा पंधरा मिनीटं परतला की त्याचा रंग बदलतो. खव्यातील गुठळी मोडून घ्यावी. परतलेल्या किसात साखर, खवा मिक्स करून पुन्हा मंद गॅसवर परतावे. साखरेमुळे मिश्रण थोडे सैल होईल . घट्टपणा आला की त्यात वेलची पावडर, काजू बदाम काप, बेदाणे मिक्स करावे. चव बघून लागल्यास साखर वाढवावी.तयार हलवा गार व्हॅनिला आईस्स्क्रीमचा गोळा घालून किंवा गरम आपल्या आवडी प्रमाणे सर्व्ह करावा.
मिनल सरदेशपांडे

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

सालासह मुगाचे डोसे


मेतकूट:

: हाही पारंपरिक चविष्ट प्रकार आहे. अनेक पदार्थांची लज्जत वाढवण्यासाठी मेतकूट उपयोगी आहे. सकाळच्या मऊभातापासून भरीत, भडंग,किंवा दह्यात नुसते कालवूनही मेतकूट छान लागते. ही माझ्या आज्जेसासूबाईंची रेसिपी आहे.

साहित्य:

 चणाडाळ पाव की, उडीदडाळ पाव की, वाटाणा हिरवा पाव की, तांदूळ 100 ग्रॅम, गहू 100 ग्रॅम, धने अर्धी वाटी, जीरे अर्धी वाटी, सुंठ पावडर दीड चमचा, हिंग एक चमचा, मोहोरी दीड चमचा, मेथी दीड चमचा, तिखट एक चमचा, हळद एक चमचा

कृती: चणाडाळ, उडीदडाळ, गहू, तांदूळ, हिरवा वाटाणा सगळं वेगवेगळं छान खमंग भाजून घ्यावे. जीरं, धने, मेथी ही तसेच वेगवेगळे भाजावे. मोहोरी गरम कढईत गॅस बंद करून गरम करावी. सर्व एकत्र करून बारीक दळून आणावे. दळून आणल्यावर त्यात हिंग पावडर, हळद पावडर, तिखट, सुंठ पावडर हे सर्व नीट मिसळावे. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावे.


भाजणीचे थालीपीठ:


भाजणीसाठी: एक की तांदूळ, अर्धा की चणाडाळ, पाव की उडीद, एक वाटी पोहे, एक वाटी साबुदाणा, एक वाटी धने, अर्धी वाटी जिरे
सर्व वेगवेगळे भाजून एकत्र करावे आणि दळून आणावे.
साहित्य : थालीपीठ: चार वाट्या भाजणी, दोन तीन कांदे बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, एक चमचा लाल तिखट, मीठ, पाव चमचा हळद, दोन चमचे तेल पिठात घालायला, थालीपीठ लावताना सोडायला पाव वाटी तेल, पाणी
कृती: परातीत भाजणी घ्यावी. त्यात तिखट, मीठ, हळद, दोन चमचे तेल , कांदा, कोथिंबीर घालून थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे. केळीच्या पानावर किंवा प्लॅस्टिक पिशवीवर तेलाचा हात लावून थालिपीठ थापावे. त्याला मधे भोकं पाडावीत म्हणजे तेल सोडता येतं. बीडाचा किंवा निर्लेप तवा तापत ठेवावा. त्यावर थापलेले थालिपीठ टाकावे. बाजूने व्यवस्थित तेल सोडावे. आधी तेल घातले तर थालिपीठ तव्यावर टाकताना भोकातून तेल हातावर उडण्याची शक्यता असते. झाकण ठेवून एक वाफ काढावी. थालिपीठ उलटून दुसरी बाजू खमंग भाजून घ्यावी. लोण्याचा गोळा आणि थालिपीठ अहाहा!
थालिपीठ हा असा गुणी पदार्थ आहे की आदल्या दिवशीचा भात, भाजी, कोशिंबीर आपल्यात इतका छान सामावून घेतो ...सगळे न कळता खातात!

रवा खोबरं लाडू

साहित्य:
 रवा दोन वाट्या, साखर दीड वाटी, ओलं खोबरं एक वाटी, पाव चमचा वेलची पावडर, बेदाणे, अगदी थोडं मीठ, तूप पाव वाटी, पाणी एक वाटी
कृती:
 रवा कढईत घेऊन मंद गॅसवर थोडा भाजावा. त्यात खोबरं आणि तूप घालून परत खमंग भाजावा. त्यात वेलची पावडर घालावी. एका पातेल्यात दीड वाटी साखर, चवीपुरतं मीठ आणि एक वाटी पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. एक तारी पाक करावा. पाक तयार झाला की रव्यात मिक्स करून थोडावेळ मुरू द्यावे. वळण्या इतपत घट्ट झालं की बेदाणे लावून लाडू वळावेत.

अळवाचा पळवा: अळूवडी

कोकण स्पेशल अळूवडीचा प्रकार! भाजणी घालून केलेली अळूवडी मस्त परतून तोंडीलावणं म्हणून घ्या किंवा खोबरं, कोथिंबीर घालून नुसती खा.

साहित्य:
पाच अळूची पाने, पाव वाटी चिंच, पाव वाटी गूळ, दीड चमचा लाल तिखट, मीठ, पाव चमचा हळद, तीन वाट्या पाणी, दोन वाट्या थालिपीठ भाजणी, अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी ओलं खोबरं.


कृती:
अळूची पानं स्वच्छ करून पुसून घ्यावीत. त्याच्या मधल्या शिरा काढून घ्याव्या. चिंच पाण्यात भिजवून कोळ काढावा. गूळ बारीक चिरून घ्यावा. तीन वाट्या पाणी घ्यावं. त्यात गूळ, मीठ, चिंचेचा कोळ, तिखट, हळद घालावं. चव बघावी. आता भाजणी मिसळावी. पीठ पानावर पसरून लावता येईल इतपतच सैल करावे. लागल्यास पाणी घालावे. अळूचे पान उलट करावे. त्यावर पीठ लावावे. त्यावर दुसरे पान ठेवावे. समोरची बाजू आणि कडा आत दुमडून परत पीठ लावावे. आता वडी घट्ट गुंडाळून घ्यावी. त्याला दोरा गुंडाळावा.

 मोदकाप्रमाणे 20 मिनीटं वाफ काढावी. गार झाल्यावर दोरा काढून गोल कापून तळावे किंवा तव्यावर लावावे.
     पण आमच्याकडे तळण्यापेक्षा फोडणीत परतून जास्त आवडतात. उंडे छोट्या चौकोनी फोडी करून चिरावे. कढईत तेल तापत ठेवावे. मोहोरी, हिंग, हळद आणि थोडे तिखट घालून त्यात चिरलेल्या अळूवड्या घालाव्यात. ओलं खोबरं घालावं. छान परतावं. तयार आहे अळवाचा पळवा! चला आता पळवा पटापट!


शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

चिंच गुळाची भोपळी मिरची :

चिंच गुळाची भोपळी मिरची :
साहित्यः अर्धी कि. भोपळी मिरची, अर्धी वाटी दाण्याचे कूट, अर्धी वाटी ओले खोबरे, एक चमचा लाल तिखट, एक चमचा गोडा मसाला, दोन चमचे चिंचेचा कोळ, दोन चमचे गूळ, तेल, फोडणीचे साहित्य, मीठ
कृती : भोपळी मिरची स्वच्छ करून बिया काढा. चौकोनी मध्यम फोडी करा.कढईत दोन चमचे तेल तापवा. मोहोरी, हिंग हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करा. चिरलेल्या भोपळी मिरच्या घालून छान परता. झाकण ठेवून १० मिनिटे वाफ काढा. अधून मधून ढवळत रहा. मिरच्या शिजल्या की मीठ गूळ चिंचेचा कोळ, गोडा मसाला, दाण्याचे कूट, खोबरे घाला. नीट मिसळा. आता तुम्हाला पातळ हवी असेल तसे पाणी घाला. उकळी येऊ द्या. चवीनुसार तिखट, मीठ, गूळ, आंबट वाढवा. पोळीबरोबर गरमागरम फस्त करा.

कोयाडं:

कोयाडं:
तसा थोड्या फार फरकाने सारख्याच गोष्टी वापरून केलेला पण लगेच खाण्याचा पारंपरिक प्रकार, हे नाव बहुदा कोई सह वापरल्याने पडलं असावं.
साहित्य: रायवळचे छोटे पिकलेले आंबे 10, पाव वाटी गूळ, दोन चमचे लाल तिखट, फोडणीचे साहित्य, मीठ.
कृती: रायवळचे पिकलेले आंबे स्वच्छ धुवा, त्याची फक्त साल काढा. कोयी रसासह तशाच ठेवा. कढईत तीन चमचे तेल गरम करा, तापले की मोहोरी, हिंग, हळद आणि थोडे लाल तिखट घाला. आता मगाशी साल सोलून ठेवलेल्या कोयी या फोडणीत घाला. मंद आचेवर ठेवा. सालींचा जो रस असेल तो काढून यात घाला. तिखट, मीठ, गूळ घाला. नीट मिक्स करा. चवीनुसार जे लागेल ते वाढवा. रसाला ताटात घेता येईल एवढा घट्टपणा आला की गॅस बंद करा. गार झाल्यावर डब्यात भरा, चार दिवस फ्रीजमधे टिकते. चव अप्रतिम!!! फक्त आंब्याच्या आंबटपणावर गुळाचे प्रमाण कमीजास्त करा.

मेथी कॉर्न राईस:

मेथी कॉर्न राईस:
साहित्य: दोन वाट्या तांदूळ, दोन वाट्या मेथीची पाने, एक वाटी कॉर्न, तीन मसाला वेलची, सहा लवंगा, चार ओल्या मिरच्या, एक चमचा आलं, तीन कांदे, एक वाटी दही, एक चमचा गरम मसाला, दोन तमालपत्र, मीठ, चार चमचे तूप, पाणी
कृती: तांदूळ धुवावेत, चाळणीत निथळत ठेवावेत. कांदा अर्धा लांब चिरावा. मेथी निवडून चिरून घ्यावी. मक्याचे कणीस मीठ घालून छान वाफवून त्याचे दाणे काढून घ्यावे. कढईत दोन चमचे तूप तापत ठेवावे. त्यात तांदूळ घालून परतावे. परतलेले तांदूळ दुप्पट पाणी घालून आणि मीठ आणि तमालपत्र घालून कुकरला दोन शिट्या कराव्यात. कढईत दोन चमचे तूप घ्यावे. तापल्यावर त्यात मसाला वेलची, लवंगा टाकून परताव्यात. आता त्यात कांदा परतावा. कांदा दोन मिनीटं परतला की चिरलेली मेथी घालून परतावी. पाच मिनिटं छान परतावे. त्यात आलं पेस्ट, गरम मसाला घालावा. परतून घ्यावे. आता त्यात दही मिक्स करावे. या मिश्रणात त्याच्या चवीपुरते मीठ घालावे. तोपर्यंत भात परातीत मोकळा करून ठेवावा. पाच मिनिटं मिश्रण परतत रहावे. त्यात मक्याचे दाणे घालावेत. आता तयार भात मिसळावा. दहा मिनिटं छान वाफ येऊ द्यावी. गरमागरम भात टॉमेटो सूप बरोबर सर्व्ह करावा. परतल्याने मेथीचा कडूपणा अजिबात येत नाही. चव अप्रतिम!!!

तूर डाळीचे सार:

तूर डाळीचे सार:
साहित्य: अर्धी वाटी तूरडाळ , दोन वाट्या ओलं खोबरं, सुक्या मिरच्या दोन तीन, तेल दोन चमचे, जीरं, मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट एक चमचा, चिंचेचा घट्ट कोळ एक चमचा , दोन चमचे साखर, मीठ, कोथिंबीर, कढिलिंबाची पाने.
कृती: डाळ नेहमीप्रमाणे दुप्पट पाणी घालून शिजवून घ्या. ओल्या खोबऱ्याचे दूध काढा. डाळ घोटून घ्या. त्यात काढलेले दूध, चिंचेचा कोळ, तिखट, मीठ, साखर मिसळा. गरजेनुसार पाणी घाला. तेलाची जिरं, मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. आता फोडणीत कढिलिंबाची पाने घाला, तयार फोडणी साराला द्या. छान उकळी काढा. वाढताना कोथींबीर बारीक चिरून घाला. नेहमीच्या सारा एवढं पातळ करा. मस्त खमंग लागते!!

फणसाचे सांदण:

फणसाचे सांदण:
साहित्य: 15/20 बरके गरे,(म्हणजे एक वाटी तयार रस) एक वाटी गूळ, सव्वा वाटी तांदळाचा रवा( इडली रवा वापरू शकता) , चिमुटभर हळद, एक वाटी पाणी, पाव वाटी ओले खोबरे, दोन चमचे साजूक तूप, 1/2 चमचा खायचा सोडा
कृती: गरे आठीळा काढून मिक्सरला फिरवावेत. तांदुळाचा पूर्वी तांदूळ धुवून वाळवून जात्यावर रवा काढला जाई. आता तयार इडली रवा मिळतो. एक चमचा तुपावर रवा भाजून घ्यावा. एक वाटी रस घेऊन त्यात एक वाटी गूळ चवीला मीठ, ओले खोबरे घालावे. चिमुटभर हळद घालावी. आता भाजलेला रवा, एक वाटी पाणी मिसळून दोन तास ठेवावे. एखाद्या पसरट डब्याला तुपाचा हात लावावा. तयार मिश्रणात एक चमचा तूप घालावे. तूप लावलेल्या डब्यात किंवा इडलीसारखे लावून 20 मिनिटे वाफवावे. तूप आणि नारळाचे दूध हवेच, सांदण खायला!

हिरव्या मिरचीचा ठेचा:

हिरव्या मिरचीचा ठेचा:
ही माझ्या आत्तेसासूबाईंची स्पेशल रेसिपी आहे. मी त्यांच्या कृतीनुसार करायचा प्रयत्न केलाय.
साहित्य: 250 ग्रॅम ओल्या मिरच्या, 50 ग्रॅम मोहोरी फेसण्यासाठी, एक चमचा भरून मेथी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, एक चमचा मोहोरी फोडणीसाठी, पाच चमचे तेल, तीन लिंबं, मीठ अंदाजे एक छोटा चमचा
कृती: मिरच्या स्वच्छ धुवाव्यात, पुसून कोरड्या कराव्यात. तुकडे करून मिक्सरला भरडसर वाटून घ्याव्यात. मोहोरीत लिंबाचा रस घालून मिक्सरला लावून फेसून घ्यावी. मोहोरी फेसताना गरज लागली तर पाणी घालावे. छोट्या कढईत तेल तापवून मेथी तळून घ्यावी. तळलेल्या मेथीची पावडर करावी. आता त्या तेलाची मोहोरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. गार करावी. फेसलेली मोहोरी, वाटलेली मिरची, मेथी पावडर, मीठ सगळं नीट मिक्स करावं. गार झालेली फोडणी तयार ठेच्यात मिसळावी. झणझणीत ठेचा तयार आहे. एखादया लिंबाचा रस कमी निघतो त्यामुळे लागल्यास अजून लिंबू पिळावे.

भाजलेल्या कैरीचे रायते

साहित्यः
२/३ कच्चे रायवळ आंबे (ही आंब्याची जात विशेषतः कोकणात दिसते. त्या ऐवजी कोणत्याही कैय्रा घ्या.), ३ चमचे तेल, मीठ, गूळ, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, २ चमचे लाल तिखट


कृती: कैय्रा धुवा, पुसून कोरड्या करा. निखाय्रात किंवा मध्यम आचेवर कैय्रा भाजून घ्या. गार होऊ द्या. साल सोलून गर काढून घ्या. गर हातानेच कुस्करून घ्या. जेवढा गर असेल त्याच्या दुप्पट गूळ घेऊन दोन्ही एकत्र करून घ्या. कढईत तेल तापवा. मोहोरी, हिंग आणि लाल तेखट घाला. गॅस मंद ठेवा. आता त्यात गर आणि गूळाचे मिश्रण घाला. ढवळा. मंद आचेवर गूळ विरघळू द्या. चवीनुसार मीठ घाला. साधारण सॉस इतपत झाले की गॅस बंद करा. गार झाल्यावर अजून थोडे घट्ट होते. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवा. कैरीच्या आंबटपणावर गूळ जास्त लागू शकतो.
चव अप्रतिम लागते.

उकडांबा:

उकडांबा: ही पारंपरिक रेसिपी आहे, माझी आजी, आजेसासूबाई करायच्या. पूर्वी कोकणात पावसात फार भाज्या मिळत नसत. तेव्हा या बेगमीच्या पदार्थांचा उपयोग व्हायचा. हे करायला ठराविक झाडाचे रायवळ आंबे वापरले जायचे. फक्त आंबे उतरून काढायचे, पडलेले नको.

साहित्य:
दहा रायवळ आंबे थोडे पिकलेले, एक वाटी मोहोरी, 300ग्रॅम गूळ, दोन चमचे मीठ, दोन चमचे मेथी पावडर, दोन चमचे हिंग, चार चमचे लाल तिखट, अर्धी वाटी तेल, थोडी हळद


कृती:
थोडे पिकायला लागलेले आंबे स्वच्छ धुवावेत. पाण्यात घालून दहा मिनिटे उकडावेत. पाण्यातून काढून गार करायला ठेवावेत. 300ग्रॅम गूळ एका पातेल्यात घ्यावा, त्यात पाऊण ली पाणी घालून पाक करावा. एक वाटी मोहोरी बारीक करून घ्यावी. अर्धी वाटी तेलाची मोहोरी, हिंग, हळद, थोडे तिखट घालून फोडणी करावी, गार करायला ठेवावी. गुळाचा पाक गार करावा. त्यात मेथी पावडर, मोहोरी पावडर, मीठ, तिखट नीट मिसळून घ्यावे. गर झालेली फोडणी मिसळावी. आंब्याची साल देठाकडून सोडवून घ्यावी. काचेच्या बरणीत कैऱ्या ठेवाव्यात, त्यावर तयार मिश्रण घालावे. हे लोणचं छान मुरलं की खायला घेताना आंबा सोलून खारात कुस्करून खायला घ्यावा. मुरलेला आंबा छान लागतो.

सुरणाच्या काचऱ्या:


साहित्य:
 सुरण अर्धा कि, तीन ओल्या मिरच्या, मीठ, साखर, पाव वाटी तेल, चार आमसुले, कढिलिंबाची पाने चार पाच, खोबरं, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य

कृती:
 सुरण घेताना पांढरा बघून घ्या, त्याला खाज कमी असते. सुरण स्वच्छ करा, साल काढा. थोडया जाडसर काचय्रा करा. काचय्रा बुडेपर्यंत पाणी घाला, आमसुले घाला. कुकरला दहा मिनिटे वाफवा. आता चाळणीवर काढून त्यातले पाणी आणि आमसुले काढून टाका, यामुळे खाज निघून जाते. कढईत तेल तापवा. मोहोरी, मिरचीचे तुकडे, हिंग, हळद, काढिलिंबाची पाने घाला. आता सुरणाच्या काचय्रा घाला नीट परता. चवीनुसार मीठ, साखर घाला. एक वाफ काढा. खोबरं, कोथिंबीर घालून पोळी बरोबर वाढा. अशा काचय्रा बटाट्यासारख्या लागतात, मुलंही आवडीने खातात.

तळलेले गरे अर्थात फणसाचे वेफर्स:


साहित्य:
 मोठ्या गऱ्याचा कच्चा फणस, खोबरेल तेल , मीठ, पाणी

कृती: फणसाचे चार भाग करा. चीक कागदाने पुसून घ्या. वरचे साल आणि मधला कडक दांडा काढून घ्या. गऱ्यावर असलेल्या पाती , आतली आठीळ काढून घ्या, आता उभे बारीक काप करा. एका बाऊलमध्ये अर्धा बाउल पाणी घ्या. पाणी चांगले खारट होईपर्यंत मीठ मिसळा. आता कढई तापत ठेवा. अर्धा ली खोबरेल तेल घाला. ओंजळभर गरे तेल तापल्यावर तेलात सोडा. थोडे तळले कि एक चमचा मिठाचे पाणी तळणीत गऱ्यांवर घाला. आता सावकाश तळा. गोल्डन कलर आला की गरे चाळणीत काढा. गार झाले की घट्ट झाकणाच्या डब्यात भरा. मिठाचा अंदाज एकदा तळले कि येईल. माझ्या बहिणीच्या प्रमाणानुसार 5 ली तेलात 12कि गरे तळून होतात.