कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

दुधीची खीर:

दुधीची खीर:

 
तसा अगदी साधा पदार्थ..करायला सोपा उगाच भारंभार वस्तू नाहीत.... पण आठवणी मात्र खिरी इतक्या गोड आहेत! माझे बाबा त्यांच्या असलेल्या अर्ध्या हाताचा शंभर टक्के उपयोग करीत. त्याच हातात धरता येत नसल्याने  बाबांच्या खांद्याला आईने मुद्दाम मोठे बंद शिवलेल्या पिशव्या असायच्या... एक कधी दोन सुद्धा! या पिशवीत खजिनाच असायचा..बाबा रत्नागिरीत जाऊन आले की हमखास येणाऱ्या वस्तूंमध्ये यायचा तो कुंड्या दुध्या...  हा बाबांचा खास शब्द...म्हणजे तांब्याच्या आकाराचा दुधी भोपळा ..ही जात माम्यांकडे हमखास मिळायची...यात गर जास्त असायचा! आज अनेक वर्षांनी भावाने हा दुधी भोपळा आणला तेव्हा बाबांची आठवण आली...त्यांनी हा दुध्या आणला की दुधीची खीर हमखास असे. पुढे मी त्याचा रुचिरात वाचून हलवा केला तेव्हा गिरगावात असताना द्रोणात मिळणाऱ्या दुधी हलव्याच्या आठवणी रंगून सांगितलेल्या आजही आठवतात मला!


. या दुध्याची खीर मस्त लागते असं ते सांगताना त्यांच्या घाऱ्या डोळ्यांत खिरीची मिठास स्पष्ट दिसत असे. घरचं दूध मस्तपैकी आटवून, घरच्या तुपावर  दुधी किसून  परतून केलेली खीर कोणताही सुकामेवा न घालता प्राजक्ताच्या केशर काड्यांनी सजत असे..खीर होईपर्यंत नवीन हिरकुटात दुध्याच्या कोवळ्या बिया ओवून त्या चुलीत भाजून तूप मीठ लावून फस्त करायचं काम आम्हा भावंडांचं.. सालींची किसून घेऊन चुरचुरीत केलेली चटणी आणि भाकरी बरोबर दुधीची आटीव खीर...अहाहा! आता आमच्याकडे घरचं दूध नसलं तरी  बाबांच्या आठवणी आठवत आटवलेल्या दुधाची खीर आणखी सुमधुर होणार हे नक्की!☺
✍🏻मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा