कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

बटाटा तीळ चणाडाळ चटणी

बटाटा, तीळ, चणाडाळ चटणी:
नऊ दिवस गोड खाऊन कंटाळला असाल म्हणून खास घेऊन आलेय चमचमीत, सणसणीत चवीची कुरकुरीत चटणी!
साहित्य: एक बटाटा, दोन टीस्पून चणाडाळ, दोन टीस्पून तीळ, एक टीस्पून शेंगदाणा कूट, चार ओल्या मिरच्या( तिखटपणावर कमी/जास्त), मीठ, पाव टीस्पून साखर, तेल दोन टीस्पून, मोहोरी पाव टीस्पून, जीरं पाव टीस्पून, हिंग चिमूटभर, हळद अर्धा टीस्पून
कृती:  चणाडाळ दोन तास कोमट पाण्यात भिजत घाला. बटाटा धुवून घ्या, सालासह छोट्या फोडी करा, खलबत्यात फोडी थोडया चेचून घ्या. मिरच्यांचे धुवून तुकडे करा. शक्यतो लोखंडी कढई तापत ठेवा, त्यात तेल घाला, तेल तापलं की मोहोरी, जीरं घालून ते तडतडल्यावर हिंग, हळद घाला. मिरच्यांचे तुकडे घालून बारीक गॅसवर दोन मिनिटं परता. आता ठेचलेला बटाटा घाला, दोन मिनिटांनी  पाणी काढून चणाडाळ त्यात घालून परतत रहा, झाकण ठेवू नका. बारीक गॅसवर दहा मिनिटं ठेवून परतत रहा. आता मीठ चवीनुसार आणि साखर घाला, तीळ आणि दाण्याचं कूट घालून परतत ठेवा.
बऱ्यापैकी कुरकुरीत होईल, चव  बघून लागेल ते वाढवा.
टीप: ही चटणी टिकाऊ नाही.
मिरची न वापरता लाल तिखट वापरू शकता.
 मस्त चव येते तोंडाला या चटणीने!
✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा